
>> विलास पंढरी
बहुतेक सण तिथीनुसार साजरे केले जात असल्याने तारखा बदलताना दिसतात तसेच विविध धर्मीयांचे सण अनेक वेळा एका दिवशी येतात. 28 आणि 29 मार्चला नुकतीच आपण होळी आणि धूलिवंदनाचा आनंद घेतला. याच दोन्ही दिवशी मुस्लिमांचा शब-ए-बारात हा सण होता. या रात्री मुस्लिम बांधव आपल्या चुकांची कबुली अल्लाहकडे देतात आणि भविष्यात सुख, शांती, यश, समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हिंदुस्थानातील धर्म, धार्मिक श्रद्धा आणि प्रथा भिन्न असल्या तरी त्यात समानताही पाहायला मिळते. यानिमित्ताने आज साजरे होत असलेल्या गुड फ्रायडे आणि रंगपंचमी या सणांची माहिती घेणे उद्बोधक ठरेल. अर्थात इतर सणांप्रमाणेच या सणांवरही कोरोनामुळे बंधने आहेतच.
प्रत्येक धर्मात उपास तापास, काही श्रद्धा-अंधश्रद्धा, आख्यायिका असल्याचे दिसून येते. तरीही सर्वच धर्मांचे अंतिम ध्येय मानवकल्याण हेच आहे. आज ख्रिश्चन धर्मीयांचा गुड फ्रायडे म्हणजेच येशूच्या बलिदानाचा दिवस. सुळावर चढवण्याच्या आधी एक दिवस येशू आपल्या शिष्यांसोबत शेवटचे जेवण म्हणजे ‘लास्ट सपर’ करत होते तेव्हा या शिष्यांपैकीच एक शिष्य आपला विश्वासघात करेल, पण लोकांच्या पापांसाठी मला बलिदान द्यावेच लागेल असे प्रभू येशूंनी आपल्या शिष्यांना सांगितले होते व तसेच घडले अशी आख्यायिका आहे. अशा आख्यायिका सर्वच धर्मात आढळून येतात. त्यावेळच्या कायद्यानुसार पवित्र सणाच्या दिवशी एका कैद्याला सोडण्यात येई. तेव्हा जनता योग्य न्याय करत येशूला मुक्त करेल अशी आशा गव्हर्नर पिलातासहित येशूच्या अनुयायांना होती, पण अखेर धार्मिक दबावाखाली असलेल्या जनतेने येशूला सुळावर चढवण्याची मागणी केली. पिलाताने मात्र माझ्यालेखी हा माणूस निर्दोष असल्याचे सांगितले आणि जनतेने दिलेल्या निर्णयानुसार त्याला सैनिकांच्या ताब्यात दिले. सैनिकांनी डोक्यावर काटय़ाचे मुकुट ठेवून चाबकाचे फटके देत त्याची धिंड काढली. येशूचे अनुयायी आक्रोश करत होते, तर कर्मठ लोक मात्र त्याची अवहेलना करत होते. या सगळ्यांना माफ करत त्यांच्या पापांसाठी त्यांना क्षमा कर असे स्वर्गातल्या आपल्या पित्याला सांगत येशूने प्राण सोडला तेव्हापासून येशूच्या बलिदानाचा हा दिवस गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो. गुड फ्रायडेच्या आधी चाळीस दिवस ऍश वेन्सडे येतो. या काळात ख्रिस्ती बांधव आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करतात. हिंदू धर्मीयातही आपली जवळची व्यक्ती मृत झाल्यास तिला आवडणाऱया वस्तूचा एक वर्षभर किंवा कायमस्वरूपी त्याग करण्याची प्रथा आहे. नंतरचा रविवार म्हणजे ईस्टर संडे हा येशूचा परत प्रकटण्याचा दिवस असतो. त्यामुळे ईस्टर संडे मोठय़ा आनंदात ख्रिस्ती बांधव साजरा करतात. जसे हिंदू आत्मा अमर आहे व पुनर्जन्म मानतो तसेच हे थोडेसे आहे.
फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱया वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.
द्वापारयुगात गोकुळात कृष्ण आपल्या गोपाळ सवंगडय़ांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तीव्रता कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. मध्ययुगात संस्थानिक, राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत.
रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याचे शास्त्रीय कारण त्यामागे आहे. महाराष्ट्रात पूर्वी रंगपंचमी मोठय़ा प्रमाणावर साजरी होत असे. पण जसजसे राज्यात उत्तर हिंदुस्थानी, गुजराती, राजस्थानी लोकांचे प्रमाण वाढत गेले तसतसे रंगपंचमीची जागा धूलिवंदनाने घेतल्याचे दिसते आहे. आता महाराष्ट्रीयन लोक पहिला दिवस होळी पेटवून गोडधोडाचा नैवेद्य दाखवून धार्मिक वातावरणात साजरा करतात. दुसऱया दिवशी आपणही रंगोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करू लागलो आहोत. शासकीय सुट्टीही दुसऱया दिवशीच असल्याने या उत्सवातील दुसऱया दिवसाचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी रंगपंचमीला शाळांना सुट्टी असायची. ती आता बंद झाली आहे.
हिंदू लोक एकादशी, शिवरात्र, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार वगैरे भक्ती असणाऱया दैवताप्रमाणे उपवास करतात. मुस्लिम रमजानच्या महिन्यात उपवास करतात. जैन धर्मीय पर्युषण पर्व पाळतात. बौद्ध धर्मीय बुद्ध पौर्णिमा हा गौतम बुद्धाचा जन्मदिवस पवित्र मानून त्या दिवशी उपवास करतात. धर्म भिन्न असले तरी अशी आश्चर्यकारक साम्ये विविध प्रकारच्या धर्मात आढळतात. म्हणूनच हिंदुस्थानात विविध धर्म गुण्यागोविंदाने आचरण करताना दिसतात.



























































