
बेरोजगारीच्या समस्येने जगभरातले मोठे मोठे देश त्रस्त असतानाच सतत वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि नवनवे शोध मानवाच्या जागी तेवढीच कार्यकुशल यंत्रे निर्माण करून या बेरोजगारीत अधिकच भर टाकत आहेत. यंत्रे मानवाची जागा घेऊ शकणार नाहीत अथवा बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मानवच अग्रेसर राहील या सगळ्या विचारांना मागे टाकत या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रांनी आता विविध क्षेत्रांतील नोकर्या गिळायला सुरुवात केली आहे. या धोक्याचा विचार यापूर्वीदेखील व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यावर खोल चर्चा होत असतानाच तंत्रज्ञानाच्या अफाट वेगाने आपल्या कामाला सुरुवातदेखील केली आहे. इंडस्ट्री अर्थात निर्मितीच्या उद्योगात या यंत्रांनी आतापर्यंत आपली कार्यक्षमता सिद्ध करत मानवी कामगारांची गरज मोठ्या प्रमाणावर कमी करायला सुरुवात केली आहे. हे लोण आता चक्क टेली सर्व्हिसेस अर्थात कॉल सेंटरपर्यंत येऊन पोहोचले आहे.
गुगलचा नवा डुप्लेक्स हा आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा असिस्टंट कॉल सेंटरमधील मानवी हस्तक्षेपच संपवून टाकील का काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या असिस्टंटचा वापर यशस्वी ठरल्यास कॉल सेंटरमध्ये मानवी कामगारांची गरजच संपणार आहे. आजवर गुगलचे हे असिस्टंट फक्त एकमेकांशीच वार्तालाप करायचे. आता त्यांच्या नव्या अवताराची, अर्थात गुगल डुप्लेक्स असिस्टंटची चाचणी प्रत्यक्ष मानवी आवाजाबरोबर घेतली जात आहे. यापूर्वी गुगलने याच वर्षी झालेल्या आपल्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये या असिस्टंटचे प्रात्यक्षिक दाखवले होते. यावेळी हा असिस्टंट अगदी सहजतेने मानवी ग्राहकांशी हितगुज करून त्यांना हॉटेलमध्ये रूम बुक करायला मदत करत होता. आता या नव्या आणि अधिक गहन चाचण्यांमध्ये हा असिस्टंट कसा यशस्वी होतो आणि मानवी ग्राहकांच्या विविध समस्यांना कसे सामोरे जाऊन उत्तर देतो हे बघणेदेखील तितकेच मनोरंजक असणार आहे.





























































