स्वागतयात्रा आणि नावीन्य

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक अशा विविध क्षेत्रांत डोंबिवली या शहराने आपला वेगळाच लौकिक निर्माण केला आहे. डोंबिवली म्हटली की, प्रवास, गर्दी, सेवासुविधा यांच्या तक्रारी नागरिकांना सोसाव्या लागत असल्या तरी या शहराबद्दलचे प्रेम, ओढ, आपुलकी असे एक वेगळे नाते जडले आहे. डोंबिवली म्हटली की, नववर्ष स्वागतयात्रा हे जणू समीकरणच झाले आहे आणि त्याचे प्रतिबिंब राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशावर पडले आहे हे सत्यसुद्धा नाकारून चालणार नाही. ‘डोंबिवली गणेश मंदिर संस्थान’ आणि ‘डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार’ या दोघांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रम आयोजित होत असतात. त्यामध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण आविष्कारांचा ध्यास असतो. केवळ हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने नव्हे, तर दैनंदिन व्यवहारी कॅलेंडर वर्षानिमित्त म्हणजेच डिसेंबरअखेरीस मागील पाच-सहा वर्षांपासून नववर्षनिमित्ताने सर्वत्र पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून जो धागडधिंगा सुरू असतो, त्याच वेळेला युवकांसाठी कार्यक्रम, संगीतातील आवड, रुची लक्षात घेता तसे कार्यक्रम, अंतराळक्षेत्र, सुरक्षा दल याविषयी व्याख्यान असे कार्यक्रम होत आहेत. त्याला दरवर्षी नागरिक मोठय़ा प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. या सर्व कार्यक्रमात सातत्याने वैविध्यता असते. जात, धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या सीमारेषा पुसून मोठय़ा प्रमाणावर येथील विविध संस्थांचा सहभाग व पुढाकार असतो. ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने संपूर्ण तरुणाई फडके रोडवर एकवटलेली असते. त्यामुळे डोंबिवली आणि फडके रोड यांचे एक अतूट नाते जडले आहे. डोंबिवली गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, संगीत, आरोग्य, वाचनालयासारखे विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यात दरवर्षी नावीन्यपूर्ण विचारांची जोड असते, कायम नावीन्याचा ध्यास असतो. त्याच बरोबरीने ‘डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवारा’नेसुद्धा एक आगळावेगळा उपक्रम आखून एका नव्या पायंडय़ाला सुरुवात केली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या परिवाराने या वर्षी होळी, रंगपंचमी या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवनात रंगांचे एक वेगळे महत्त्व आहे आणि त्या रंगातून होणारे विद्रुपीकरण थांबले गेले पाहिजे या उद्देशाने तुमच्यातल्या कलेने रंगांची उधळण करा. या धर्तीवर ‘रंगोत्सव’ या संकल्पनेवर स्केचेस, पोस्टर्स पेंटिंग, टॅटू याला लागणाऱया सर्व साहित्याचे वाटप करून तुमच्यातली कला प्रदर्शित करून रंगांची उधळण करा. रंगांनी चित्र रेखाटा आणि होळी साजरी करा. जोडीला अन्यही कार्यक्रम सुरू होते. त्यालासुद्धा डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वर्षी हा पहिलाच उपक्रम होता. ‘स्वागत यात्रे’प्रमाणे याही उपक्रमाची व्यापकता व लौकिकता वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यामधील नावीन्यता आणि जपले जाणारे सातत्य हाच तर खरा डोंबिवली शहराचा बाणा आहे.

pkathakekar@gmail.com