प्रासंगिक – सद्गुरूसारिखा असता पाठीराखा!

770

>> दिलीप देशपांडे

आपल्या जीवनात सद्गुरूंचे स्थान फार महत्त्वाचे आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला, साधकाला मोक्षाप्रत नेणारे सद्गुरू. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ शुक्ल पौर्णिमा अर्थातच  ‘गुरुपौर्णिमेला’ आपण सद्गुरुपूजन करतो.

आयुष्याचा पथ हा दुर्गम

अवघड डोंगरघाट

गुरुविण कोण दाखवील वाट

हा भवसागर तरून जायचे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. एकदा त्यांनी आपला हात हातात घेतला की, ते आपल्याला सोडत नाहीत. सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणांस जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की, ते स्वतःहूनही त्याला शोधत येतात. आपल्या पूर्वप्रारब्धकर्मानुसार आपल्याला सद्गुरूची भेट होत असते. सद्गुरूंकडून एकदा का अनुग्रह घेतला की, त्यांचे स्मरण अहोरात्र करावयाचे असते. सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर ‘गुरुसेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही शंका न ठेवता, त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने, प्रेमाने करावी तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे, त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे, कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये, नामावर, सद्गुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे, त्यांनी सांगितलेली साधना करणे, थोडक्यात सद्गुरूंचे होऊन राहणे हे महत्त्वाचे आहे. आपला सर्व भार सद्गुरूवर सोपवावा.

सद्गुरूसारिखा असता पाठीराखा

इतरांचा लेखा कोण करी

सद्गुरूंना जे शरण जातात, त्यांचा कार्यभार सद्गुरू उचलतात. त्यांच्या पाठी उभे राहून ते संकटकाळी त्यांना मदत करतात. सद्गुरू नावाड्याचे काम करतात. भरकटलेली नौका किनार्‍यावर लावतात.

सद्गुरूंचे ‘अनुसंधान’ राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सद्गुरूंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सद्गुरूंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सद्गुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान.

गुरुतत्त्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये आपले सद्गुरू आपल्याला पाहता आले पाहिजेत. हे सद्गुरू साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात बदल, फेरफार करत नाहीत, परंतु ते भोग सहजतेने भोगण्याचे बळ मात्र निश्चितपणे देत असतात.

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरुचरणाची सेवा करावी. जिथे गुरू आहे तिथेच सर्वकाही असते. तिथेच सर्व तीर्थे लोळण घेत असतात. देवांचे देवसुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात.

जेव्हा साधक अनुग्रह घेतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म होत असतो. त्याच्या साधना काळात सद्गुरू साधकाच्या जीवनाला, विचारांना दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. अध्यात्मज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सद्गुरूंचा सहवास हा आनंद देणारा  असतो.

गुरुपौर्णिमेला यथाशक्ती सद्गुरुपूजन करावे. गुरुसान्निध्यात राहावे. गुरुप्रसादे पावन व्हावे. आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत.

आपली प्रतिक्रिया द्या