
>> मानसी मोहन जोशी
युरोपियन देशांसह अमेरिकेत 31ऑक्टोबर या दिवशी ‘हॅलोविन’ हा सण साजरा केला जातो. एकोणिसाव्या शतकात आयर्लंड व स्कॉटलंडमध्ये या सणांना प्रथम ओळख मिळाली असून किंवा हॅलोविन या सणाचा उगम झाला. हा ख्रिस्ती लोकांचा सण आहे असे मानले जाते. बहुतांशी स्पॅनिश लोक हा सण साजरा करतात. अलीकडे इंग्लंड, अमेरिका आणि काही युरोपियन देशांत हा सण साजरा केला जातो. सर्व चांगले मृतात्मे, पुण्यवान संत आत्मे, योद्धे, शूरवीर म्हणून जे मृत्यू पावले आहेत त्यांची आठवण म्हणून हा सण साजरा करतात. थोडक्यात, आपल्या हिंदुस्थानात पक्षपंधरवडा मृत आत्माच्या आठवणी व पूजेसाठी आपण मानतो आणि सर्वपित्री अमावास्या शेवटचा दिवस ज्या दिवशी सर्व पितरं जेवायला येतात असं आपण मानतो तसाच ‘हॅलोविन’ होय. या दिवशी सर्व मृतात्मे कुटुंबीयांना भेटायला येतात असा समज आहे याला सॅमहॅन असंही म्हणतात.
हे दिवस शेतातील धान्य कापणीचे असतात. त्यामुळे या दिवसात पूर्वजांचे आत्मे शेतातील कामात मदत करण्यासाठी पृथ्वीवर येतात, पिकांची नासाडी होऊ नये म्हणून राखण करतात असाही एक समज युरोपीय बांधवांमधे असतो. यासाठी भुतांचे मुखवटे, सांगाडे, विचित्र प्राण्यांच्या प्रतिकृती, घुबड, चेटकिणी, भुतांचा पोशाख घालून काही आकृत्या घराबाहेर आरास केल्याप्रमाणे सजवून ठेवतात. काही ठिकाणी स्मशानभूमीचा देखावा क्रुस, पुष्पचक्र घातलेले कॉफिन, लॅटिन भाषेतील शिलालेख, प्लॅस्टिकच्या छोटय़ा भोपळ्यांची लाइटच्या माळांची सजावट, पांढरी गॅस भरून केलेली भुते असे कितीतरी प्रकारे दाराबाहेर कलापूर्ण सजावट पाहायला मिळते.
भोपळ्याला डोळे नाक, तोंड कोरून त्यात लाईट वा मेणबत्ती लावतात आणि घरासमोर असे अनेक वेगवेगळ्या आकाराचे कोरलेले भोपळे सजवितात याला ‘जॅक-ओ-लॅण्टर्न’ म्हणतात. हॅलोविनच्या दिवशी ख्रिश्चन बांधव चित्रविचित्र पोशाख करतात यात विचित्र प्राणी, भूतं, वेगवेगळे मुखवटे, घाबरविणारा मेकअप केला जातो. लहान मुलांनाही भुतांचा किंवा विचित्र पोशाख घालतात ही मुलं आजूबाजूच्या घरात जाऊन लोकांना घाबरवतात, पण या दिवशी मुलांना माफ केले जाते. हॅलोविन नाइटमध्ये ही मुलं शेजारच्या घरात जाऊन ट्रिक-ऑर-ट्रीट असं म्हणतात. म्हणजे तुम्ही त्यांना चॉकलेट, मिठाई द्या किंवा त्यांच्यासारखा विचित्र पोशाख, चेहरा रंगवून त्यांना घाबरून सोडा असा आहे. त्या रात्री हॅलोविन पार्टीसुद्धा केली जाते. पार्टीमध्ये चेष्टा, खोड्या काढणे, ऍपल बॉम्बिंग, भीतीदायक कथा सांगणे, हॉरर फिल्म पाहणे, घरगुती गप्पा टप्पा यात पूर्वजांबद्दल कथा सांगणे इत्यादी प्रकारे हॅलोविन नाइट साजरी करतात. थोडक्यात, पूर्वजांच्या आठवणी आणि वाईट आत्म्यांना अटकाव करण्यासाठी भोपळा शुभ मानला जातो. हॅलोविन सणात वापरात येणारे भोपळ्याचे विविध चित्रविचित्र चेहरे, प्रेक्षणीय सजावट, भयावह आभास आणि जल्लोष असे सगळे सामावलेय या हॅलोविनमध्ये. हॅलोविनच्या दिवशी भोपळ्याच्या बियांचे पदार्थ भोपळा पाय, भोपळा केक बनवतात हे ऐकल्यावर मला हसू आलं. कारण आपल्याकडेही श्राद्धाला भोपळ्याचं भरीत लागतं. मला वाटतं, जगाच्या पाठीवर कुठेही जा, भले सण त्यांची नावं वेगळी असतील, साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या असतीलही, पण त्यांच्या मुळाशी असणारी मूळ संकल्पना साधर्म्य पाहता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे ‘हे विश्वचि माझे घर’ हेच किती खरं आहे ते हे सगळे पाहताना वाटते.





























































