गडकोटांची हिरकणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुवर्णा क्षेमकल्याणी

आजवर त्यांनी महाराष्ट्रातले चारशेहून अधिक गडकिल्ले सर केलेत. हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. मनात जिद्द ठेवून इतिहासाबद्दल वाटणारी आपुलकी जपणाऱया या हिरकणीच्या वाटय़ाला अनेक चांगले वाईट अनुभव आले, पण त्यांची भ्रमंती मात्र सुरूच राहिली, सुरुवातीस समूहाने तर काही वेळा एकटय़ाने का होईना, पण या प्रवासात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. त्यांचा आजवरचा प्रवास समस्त स्त्रीवर्गाला प्रेरणा देणारा आहे.

गडकिल्ले भ्रमंती करणारे अनेक जण असतात, पण इतिहासापोटी वाटणाऱया निष्ठेने अनेक वर्षे दुर्गभ्रमंती करणारे तसे दुर्मिळच. त्यापैकीच एक म्हणजे हमिदा खान! आजवर त्यांनी महाराष्ट्रातले चारशेहून अधिक गडकिल्ले सर केलेत. हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. मनात जिद्द ठेवून इतिहासाबद्दल वाटणारी आपुलकी जपणाऱया या हिरकणीच्या वाटय़ाला अनेक चांगले वाईट अनुभव आले, पण त्यांची भ्रमंती मात्र सुरूच राहिली, सुरुवातीस समूहाने तर काही वेळा एकटय़ाने का होईना, पण या प्रवासात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. त्यांचा आजवरचा प्रवास समस्त स्त्रीवर्गाला प्रेरणा देणारा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हमिदा खान यांच्याशी केलेली ही खास बातचित.

हमिदा यांना लहानपणापासूनच निसर्गाची, गडकिल्ल्याची, इतिहासाची विलक्षण आवड होती. त्यामुळे अगदी शालेय जीवनात सुट्टीत गावाला जाताना गिर्यारोहकांना पाहून गडकिल्ल्यांविषयीचे त्यांचे आकर्षण वाढत गेले. त्यातूनच धुळ्याच्या (त्यांच्या गावाच्या) आसपासचे सोनगीर, लळिंग याशिवाय सहलीच्या निमित्ताने देवगिरी, दौलताबाद, पारोळा, मालेगाव असे किल्ले त्यांनी पाहिले. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या निमित्ताने त्या मुंबईत आल्या आणि 1990 साली युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया (Y.H.A.I) या संस्थेच्या त्या आजीव सभासद झाल्या आणि पुन्हा एकदा दुर्गभ्रमंतीला सुरुवात झाली. संस्थेमार्फत पदभ्रमण मोहिमेत, वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शिबिरात त्या सहभागी झाल्या. त्यात मुंबईच्या आसपासचे किल्ले त्यांनी पाहिले. 1998 मध्ये रायगड किल्ल्यावर आप्पा परब यांना भेटल्यावर त्यांनी घडवलेल्या रायगड दर्शनाने प्रेरित होऊन हमिदा भारावून गेल्या आणि त्यावेळी त्यांनी किल्ले गडकोट पाहण्याचा संकल्प केला आणि या संकल्पाचा श्रीगणेशा केला तो 1999 साली रायगड किल्ल्याला भेट देऊन त्यानंतर ठरवल्याप्रमाणे दर शनिवार, रविवारी एकदिवसीय सुट्टी आली की, त्यानुसार मोहीम आखून वर्षभरातला एकही रविवार वाया न घालवता ठरवलेला संकल्प त्यांनी पूर्ण केला. म्हणता म्हणता 1999 या एका वर्षात 100 तर सलग 3 वर्षांत त्यांनी 350 किल्ले सर केले.

किल्ल्यांना भेट देताना किल्ल्यांची माहिती, छायाचित्र, टिपणं, तिथे जाण्यायेण्यासाठी आवश्यक गाडय़ांचे वेळापत्रक, किल्ल्यावरच्या वास्तू, शिलालेख, आसपासची गावे ही सगळी माहिती त्यांनी संग्रहित केली. एकूणच गडकिल्ल्यांचा शक्य तितका अभ्यास त्यांनी केला. महाराष्ट्रातले जवळ जवळ 60-70 किल्ले त्यांनी एकटय़ाने प्रवास करून पाहिले. महाराष्ट्राव्यतिरिक्त त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही भटकंती केली. वेळप्रसंगी गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी गावात असलेले स्थानिक लोक, पाटील, सरपंच, शाळकरी मुले अशा वेगवेगळ्या लोकांची मदत त्यांना मिळाली आणि त्यांचा प्रवास सुकर झाला. हमिदा यांनी काही दुर्गम गड-किल्ल्यांनाही भेट दिली. त्यासाठी तिथे जाण्यापूर्वी तिथला आवश्यक तो अभ्यास केला आणि सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेले काही किल्ले त्यांनी शोधून काढले. त्यांनी शोधलेला एक किल्ला म्हणजे बारडय़ाचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा कारंजा किल्ला. आजवरच्या या प्रवासाच्या यशाचे श्रेय त्या त्यांच्या मित्रपरिवाराला तसेच कुटुंबाला देतात. हमिदा खान यांच्या म्हणण्याप्रमाणे, किल्ले गडकोट हे आपले वैभव असून त्यांचे संवर्धन झालेच पाहिजे यादृष्टीने काही पावले उचलली गेली तरच खऱया अर्थाने आपण प्रगल्भ झालो असे म्हणता येईल.

एक स्त्री म्हणून आजवर कसलीही तमा न बाळगता अविरतपणे सुरू असलेल्या त्यांच्या या दुर्गभ्रमंतीला मानाचा मुजरा म्हणून वेगवेगळ्या संस्थांनी हमिदा खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. नुकतेच त्यांना किल्ले लळिंग संवर्धन समिती, धुळे यांच्याकडून राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार (जानेवारी 2020) देण्यात आला. काही जण गडकिल्ल्यांना भेट देताना तिथे नासधूस, कचरा करतात. अशा गोष्टींना आळा बसायला हवा. तसेच दिवसाला किती पर्यटकांनी गडकिल्ल्यांना भेट द्यावी याचीही काहीतरी मर्यादा असावी, जेणेकरून लोकांना त्या वास्तूचे महत्त्व लक्षात येईल असेही त्या सांगतात. महिला दिनानिमित्त महिलांना संदेश देताना त्या म्हणतात, ‘‘खंबीर, सक्षम व्हा, कोणताही अडथळा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकत नाही.’’
हमिदा खान यांच्या भटकंतीने प्रेरित होऊन भावी पिढीने ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करायला हवे. तसेच आयुष्य जगताना एक ध्येय समोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करायला हवेत.

[email protected]