
>> महेश कोळी
आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा आरोग्य क्षेत्रातील वापर अलीकडील काळात वाढत आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया रोबोंच्या माध्यमातून यशस्वी होताहेत. ‘एआय’मुळे रोगनिदानात अचूकता वाढली असली तरी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील मानवतेचे नाते प्रस्थापित होईलच असे नाही. तंत्रज्ञानावर वाढती अवलंबिता ही आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि डॉक्टरांची कार्यकुशलता व दक्षतेवर परिणाम करू शकते. यासाठी सजग राहण्याची गरज आहे.
आर्टिफिशियल इंटिलिजिन्स ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित बातम्यांचे आकलन केल्यास आगामी काळात एआय हा डॉक्टरला पर्याय राहील का? असा प्रश्न निर्माण होत आहे. हा प्रश्न गैर नाही. कारण आर्टिफिशियल इंटिलिजिन्समुळे जगभरातील कोटय़वधी लोकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. विषय बातम्यांचा निघाला म्हणून इथे अमेरिकेचे उदाहरण देता येईल. तेथे एक चार वर्षांच्या मुलीच्या आजाराचे निदान 17 डॉक्टरांना करता आले नाही. मात्र एआय टू चॅटजिपिटीने मणक्याच्या हाडांशी संबंधित न्यूरोलॉजिकल सिंड्रोम ‘ट्रेथर्ड कॉर्ड’ नावाचा आजार शोधून काढला. दुसरी बातमी ही पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट पीजीआय चंदिगडची आहे. तेथे डॉक्टरांनी एक संशोधन केले असून त्यात एआय तंत्रज्ञानाने रुग्णात होणाऱ्या अत्यंत धोकादायक पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान केल्याचे म्हटले आहे. एखाद्या अनुभवी रेडिओलॉजिस्ट हा अनेक अहवालाच्या आधारे त्याचे निष्कर्ष काढतो. यानुसार एआयने त्याचे निदान केले. मेडिकल जर्नल द लॅन्सेटमध्ये प्रकाशित या संशोधनानुसार रुग्णाच्या वैद्यकीय अहवालाचा एआयचा आढावा घेतला, तर दुसरीकडे दोन अनुभवी रेडिओलॉजिस्टनेदेखील या अहवालाचे विश्लेषण केले. विशेष म्हणजे दोघांचे निष्कर्ष हे सारखेच निघाले. वैद्यकीय क्षेत्रात केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘एआय’ चे प्रमाण वाढलेले नाही, तर या क्षेत्रात रोबोटिक सर्जरीचे प्रस्थदेखील वाढत चालले आहे. आरोग्य विज्ञानात एआय आणि रोबोच्या वाढत्या हस्तक्षेपाकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
जगभरात ज्या रीतीने नवनवीन आजार आणि महासाथीचा शोध लागत आहे, तस तसे आरोग्य विज्ञानात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. आधुनिक आरोग्य विज्ञानाने सुरुवातीपासून ते आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात बऱ्याअंशी संशोधनात्मक विकास केला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आणि सामान्य आजारांवरदेखील निदान करता आले. आजाराचे निदान होणे ही आरोग्य क्षेत्रातील पहिली पायरी आहे. त्यानंतरच उपचार आणि रुग्णाचे आरोग्य अवलंबून असते. आरोग्य विज्ञानात लस अणि औषधांबरोबरच आरोग्य उपकरणांचादेखील बराच विकास झाला आहे. म्हणून आजघडीला डायग्नोस्टिक इक्यूपमेंट आणि पॅथॉलाजी तपासणीवरच रुग्णांचे उपचार अवलंबून राहत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजकालचे डॉक्टर वैद्यकीय शिक्षणाच्या काळात पुस्तकात वाचलेल्या माहितीच्या आधारे लक्षणांना ओळखण्याऐवजी उपकरणावर अवलंबून राहत आहेत. त्याच वेळी जुन्या काळातील डॉक्टर हे एखाद्या रुग्णाच्या आजारपणाचा शोध घेण्यासाठी पुस्तक आणि प्रशिक्षणाचा आधार घेत असत. डॉक्टरांची आजघडीला डायग्नोस्टिक टूल्सवरची अवलंबिता वाढली आहे. म्हणूनच एखाद्या डॉक्टराला रुग्णाची नाडी तपासण्याची गरज भासत नसावी.
एकेकाळी डॉक्टर आपल्या रुग्णाची लक्षणे, आहार आणि वांशिक आजाराची माहिती घेत उपचाराची दिशा निश्चित करत असत व पथ्यपाणी सांगत असत. मात्र आज या सर्व गोष्टी एका मशिनमध्ये आणि वेगवेगळय़ा वैशिष्टय़ांमध्ये विभागलेल्या आहेत. परिणामी उपचाराचा खर्च हा बराच वाढला आहे. मात्र या परिस्थितीला केवळ एकटा डॉक्टरच नाही तर वाढती लोकसंख्या, संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रभाव, संसर्गबाधित रुग्णांची वाढती संख्या, संक्रमणाची तीव्रता, तीव्रतेतील बदल, वैद्यकीय स्रोतांची कमतरता, त्याच वेळी रुग्णांचा डॉक्टरांवरचा अविश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत. साधारणपणे आजकालचे रुग्ण हे डॉक्टरांकडे जाण्याच्या ऐवजी स्वतःच पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजिकल तपासणी करून लक्षणाच्या आधारावर औषधांचे सेवन करत आहेत. काही वेळा गुगल सर्च इंजिनवर आजाराची लक्षणे पाहिली जातात आणि त्यानुसार औषधे घेतली जातात. काही ठिकाणी डॉक्टरच्या कक्षात ‘गुगल इज नॉट डॉक्टर’ अशा पाटय़ा पाहवयास मिळतात. अर्थात ही सवय घातक आहे आणि त्यामुळे रुग्णांनी अशा प्रवृत्तीपासून दूर राहिले पाहिजे.
वास्तविक जगभरात वैद्यकीय शास्त्र हे नेहमीच नावीण्यपूर्ण शोध, विकासाचे क्षेत्र राहिलेले आहे. त्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी लस, जिवाणू आणि विषाणूरोधक औषधांचा शोध, मानवी शरीरातील हार्मोन्स, जीनमधील बदल यावरील संशोधनापासून ते आजार निश्चित करण्यासाठी डायग्नोस्टिक उपकरण विकासित केले व त्यात आरोग्य शास्त्रज्ञांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. अलीकडच्या काळात शस्त्रक्रियेत रोबोटिक सर्जरीच्या रूपातून क्रांती झाली आहे. त्यात सर्जनच्या नियंत्रणाखाली रोबो हा किचकट ऑपरेशनदेखील सहजपणे करताना दिसून येत आहे. सर्जरीच्या क्षेत्रात ओपन सर्जरीचा पर्याय हा आतापर्यंत लॅप्रास्कोपिक सर्जरीचा होता. मात्र रोबोटिक सर्जरीने शल्य तज्ञांचे काम आणखीच सोपे झाले आहे.
नवे शोध आणि संशोधन हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यापासून कोणतेच क्षेत्र अपवाद राहिले नाही. भारताच्या दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रात एआय आणि रोबोटिक सर्जरीचे परिणाम पाहता अजूनही आपण द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येतो. कारण भारतात आरोग्य क्षेत्र हे नेहमीच सन्मानाचे क्षेत्र राहिलेले आहे. याठिकाणी डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधले जाते. डॉक्टरांनी मानवता आणि संवेदनाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण हे नव्या तंत्रज्ञानाबरोबर कितपत ताळमेळ बसवू शकतील? हे आगामी काळच सांगू शकेल. जगातील अनेक देशांत भारतीय डॉक्टर हे आपल्या कौशल्याच्या बळावर नाव उंचावत आहेत. अर्थात त्यांच्या मागे प्रत्यक्ष ज्ञान आणि अभ्यास याचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच ते आत्मनिर्भर झाले आहेत. कोणत्याही डॉक्टराला रुग्णाच्या आजाराची नस पकडणे हे महत्त्वाचे समजले जाते. यासाठी तो आपली बुद्धी आणि अनुभव पणाला लावत असतो. या गोष्टी एआय आणि रोबोला शक्य होतील असे नाही.
आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि रोबोचा शोध मानवाने लावला असला तरी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांच्या वेदनांचा ठाव घेणे आणि त्यांना धीर देण्याचे कौशल्य साध्य करता येणार नाही. ही बाब डॉक्टरांनाच करावी लागेल. तंत्रज्ञानावर वाढती अवलंबिता ही आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि डॉक्टरांची कार्यकुशलता व दक्षतेवर परिणाम करू शकते. यासाठी सजग राहण्याची गरज आहे. शेवटी एआय तंत्रज्ञान हे मानवी मेंदूप्रमाणे भावना समजू शकत नाही आणि जाणवूनदेखील घेऊ शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
(लेखक संगणक अभियंता आहेत.)




























































