गृहकर्ज घेताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घर घेणे हे स्वप्न असते. लोक आपल्याजवळ साठवलेली जमापुंजी खर्चून, गृहकर्ज काढून घर घेतात. यावेळी त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे होम फर्स्ट फायनान्सचे मनोज विश्वनाथन यांनी दिली.

गृहकर्जाचे व्याजदर उच्च पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत कर्जदारांना परवडत असल्यास त्यांनी त्यांच्या कर्जाच्या काही भागाची पूर्वपरतफेड करावी का?

–  होय, तुमच्याकडे काही अतिरिक्त निधी असल्यास तो तुमच्या कर्जाच्या पूर्व परतफेडीसाठी वापरणे हा नेहमीच एक ‘स्मार्ट’ निर्णय ठरू शकतो. कारण त्यामुळे भविष्यात गृहकर्जाच्या इतक्या रकमेवर व्याज देण्यापासून तुमची बचत होऊ शकते. तुमच्याकडे पर्याय असल्यास, लहान परंतु नियमित पूर्व परतफेडीच्या पर्यायाची निवड करा. पण त्या आधी अचानक कोणत्याही मोठय़ा नजीकच्या आपत्कालीन खर्चासाठी काही निधी बाजूला ठेवला आहे की नाही याची प्रथम खात्री करा.

देशात ग्रीन हाऊसिंगच्या भविष्याबद्दल तुमचे मत काय आहे? येणाऱ्या काळात ही एक मोठी बाजारपेठ असेल असे तुम्हाला वाटते का?

–  आपले स्वतःचे घर असावे हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे ध्येय असते आणि लोक अजूनही आपलं घर स्वतः बांधण्यास प्राधान्य देतात. घरमालकांसाठी खर्चात बचत करण्यापासून ते आरोग्यदायी जीवनशैलीपर्यंत अनेक फायदे असूनही, संभाव्य घरमालकांमध्ये आणि स्वतंत्र घरांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये अद्यापही ग्रीन हाऊसिंग फारसे लोकप्रिय नाही. वास्तविक घरबांधणी इकोसिस्टममध्ये गुंतलेल्या विविध संस्थांना ग्रीन होम्सच्या फायद्यांचा शोध आणि प्रचार करण्याची ही एक मोठी संधी आहे.

परवडणाऱ्या घरांच्या बाजाराबद्दल  काय सांगाल ? 

–  परवडणाऱ्या घरांचे वर्गीकरण बरेच वैविध्यपूर्ण आहे. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांनी 5 ते 25 लाख रुपये किमतीच्या श्रेणीत घरे खरेदी केली असल्याने हीच परवडणाऱ्या घरांची व्याख्या सर्वसाधारणपणे मानली जाते. बहुतांश लोकसंख्येचा विचार करता मेट्रो शहरांची उपनगरे ही परवडणाऱ्या घरांसाठी मोठी पेंद्रे मानली जातात.

येणाऱ्या काळात व्याजदरात कितपत बदल होईल? रिझर्व्ह बँक मुख्य व्याजदरात आणखी वाढ करेल असे तुम्हाला वाटते का?

–  हिंदुस्थान आणि अमेरिका देशात महागाईची स्थिती सारखी आहे. परिणामी व्याजदर काही काळ स्थिर राहण्याची शक्यता आहे. तरीही व्याजदरात पाव टक्के (25 बेसिस पॉइंट) वाढीची शक्यता आहे.