लेख – ‘आयसीयू’पेक्षा ‘पीसीयू’ चांगले!

>> विजय पांढरीपांडे 

आयसीयूमध्ये असलेल्या पेशंटचे सातत्याने मॉनिटरिंग होत असते. नर्स, डॉक्टर सारखे ते आकडे बघत असतात. त्यावर नजर ठेवून असतात. त्याप्रमाणे निदान करतात. औषधे, ट्रीटमेंट बदलतात. पण या सर्व आकड्यांपेक्षा खरे महत्त्व असते ते या आकड्यामागच्या शरीराच्या इतिहासाचे, भूतकाळातील घटनांचे.आपल्या मानसिक, भावनिक अवस्थेचे. आजचे आकडे वरवर बघून निष्कर्ष काढण्यापेक्षा जे काही घडले त्यामागची कारण परंपरा जास्त महत्त्वाची असते. आयसीयूपेक्षा पीसीयू म्हणजे पर्सनल केअर युनिट जास्त महत्त्वाचे.

काळाबरोबर जसजसे तंत्रविज्ञान विकसित झाले तसतसे आता प्रत्येक गोष्टीचे अर्थ बदलताहेत. आरोग्याची काळजी, स्वस्थ शरीर, आनंदी जगणे याकडेदेखील आता नव्या भिंगातून पाहणे गरजेचे आहे. आताशा आरोग्याचा संबंध शारीरिक डेटा, काही आकडे, काही आलेख (ग्राफ, चित्र) यांच्याशीच जोडला जातो. ताप किती, बीपी किती, साखरेचे प्रमाण (उपाशीपोटी, जेवल्यानंतर) किती, रक्ताच्या, लघवीच्या इतर तपासण्यांचे निष्कर्ष… असा हा केवळ नंबर गेम झाला आहे. आता तर प्रत्येकाच्या हाताला मेडिकल अॅप असलेले घड्याळ असते. त्यातून तुम्ही किती चाललात, किती झोपलात यांसह तुमच्या शरीराच्या आरोग्यासंबंधीचे अनेक आकडे असतात. त्यावरून आपण आपलेच ठरवतो… आपले  ऑलवेल आहे की नाही ते! पण हे आकडे खरे नसतात. अनेकदा ते फसवे असतात. त्या यंत्राला जसे शिकवले, प्रोग्राम केले, त्यानुसार ते निष्कर्ष असतात.

उदाहरण द्यायचे झाले तर झोपेचे घेऊ या. ही घड्याळं तुम्ही किती तास झोपलात हे सांगते. जर त्यात तुम्हाला दोनच तास झोप आली तर तुम्ही लगेच अस्वस्थ होता. ( खरे तर तुम्ही रात्री अकरा वाजता झोपलेले असता अन् सकाळी पाच वाजता उठलेले असता!) मग हे घड्याळ दोनच तास का सांगते? त्याचे कारण या घड्याळाला गाढ झोप म्हणजे निश्चल शरीर असे शिकवले जाते. झोपेत तुम्ही हातपाय हलवलेत तरी तो वेळ झोपेत गणला जात नाही! आपण झोपेतच कूस बदलतो, घोरतो. अनेक हालचाली करतो, पण याचा अर्थ आपण जागे नसतो. घड्याळ मात्र या हालचाली जागे असल्याचे गृहीत धरते. असे अनेक आकडे फसवे असतात. बीपी डाव्या हाताचे वेगळे, उजव्या हाताचे वेगळे येते. दोन लॅब तपासणीचे निष्कर्षदेखील वेगवेगळे येतात. एकच रिपोर्ट बघून दोन डॉक्टर (सेकंड ओपिनियन!) वेगवेगळे निष्कर्ष काढतात. वेगळे निदान करतात.

आयसीयूमध्ये असलेल्या पेशंटचे सातत्याने मॉनिटरिंग होत असते. नर्स, डॉक्टर सारखे ते आकडे बघत असतात. त्यावर नजर ठेवून असतात. त्याप्रमाणे निदान करतात. औषधे, ट्रीटमेंट बदलतात.पण या सर्व आकड्यांपेक्षा खरे महत्त्व असते ते या आकड्यामागच्या शरीराच्या इतिहासाचे, भूतकाळातील घटनांचे.आपल्या मानसिक, भावनिक अवस्थेचे. आजचे आकडे वरवर बघून निष्कर्ष काढण्यापेक्षा जे काही घडले त्यामागची कारण परंपरा जास्त महत्त्वाची असते. आयसीयूपेक्षा पीसीयू म्हणजे पर्सनल केअर युनिट जास्त महत्त्वाचे.

अनुभवी, निष्णात डॉक्टर तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात. काल काय झाले, काय खाल्ले, कसे कुठे पडले, नोकरीचे स्वरूप काय, किती तास झोपता, सवयी काय आहेत, घरचे कौटुंबिक वातावरण कसे आहे, तुमचा स्वभाव कसा आहे… आज तुम्हाला जो काही आजार जाणवतो आहे, त्यामागची कारणे शोधायची तर हा सगळा इतिहास, भूतकाळ माहीत असणे जास्त गरजेचे असते. तुमच्या हातातील तपासण्यांचे आकडे हा एंड रिझल्ट झाला. तो तिथपर्यंत आला कसा? हा प्रवास महत्त्वाचा असतो. म्हणूनच पर्सनल केअर युनिट, पीसीयूचे महत्त्व जास्त. म्हणजे तुमची पीसीयू चांगली असेल तर तुम्हाला आयसीयूमध्ये जाण्याची गरजच भासणार नाही!

रोजचा नियमित व्यायाम, शरीराला (जिभेला नव्हे!) हवे तितकेच, तितक्याच वेळा संतुलित खाणे, ज्याला आजकाल लाइफ स्टाईल म्हटले जाते, त्याकडे इन लेटर अँड स्पिरिट स्वरूपात लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे. बीपी म्हणा, साखर म्हणा, कॉलेस्टेरॉल म्हणा, वाढणारच नाही ( मर्यादित राहील) याची अगदी लहानपणापासून काळजी घेणे गरजेचे. आरोग्य हे व्यक्तिगत असते. प्रत्येकाचे शरीर वेगळे, कुटुंब वेगळे, कामाचे स्वरूप वेगळे, स्वभाव वेगळे. त्यामुळे आपला डेटा, आपली काळजी आपणच घ्यायची. आपली लाइफ स्टाईल ही आपली जबाबदारी. आपल्या शरीराचे मॉनिटरिंग करणे, आपल्या स्वभावावर, वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे ही आपलीच जबाबदारी. ते काम आपल्यासाठी दुसरे कुणी करणार नाही, करू शकणार नाही.

आपला व्यक्तिगत डेटा, आपली व्यक्तिगत स्टोरी, आपल्या खासगी घटना, आपल्या सवयी, आपला स्वभाव, आपले वागणे बोलणे…हे सगळे आपल्या आयुष्याशी, आरोग्याशी जास्त निगडीत असते. बीपी, साखरेचे प्रमाण, ईसीजी…हे शेवटचे टोक झाले. तिथपर्यंत पोहोचण्याआधी आपल्या शरीराची, मनाची डायरी आपणच नियमित लिहिली, मेन्टेन केली पाहिजे. ती व्यक्तिगत डायरी, तो रेकॉर्ड आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा असतो. शरीराचे तापमान, बीपी, शुगर लेव्हल हे आकडे फसवे असतात म्हणून निदान चुकते, ट्रीटमेंट भरकटते.

सारखा 100 डिग्री ताप येतो याचे वेगवेगळे कारण असू शकते वेगवेगळ्या व्यक्तीसाठी. साधे डोके दुखण्याचे उदाहरण घ्या. ते कितीही अॅनासिन, क्रोसिन घेऊन बरे होणार नाही! होमिओपॅथी उपचारांत चांगला डॉक्टर तुम्हाला आधी शंभर प्रश्न विचारतो. कारण खऱ्या डॉक्टरला कसेतरी तात्पुरते बरे वाटावे यापेक्षा रोगाचे  मूळ कारण शोधून ते नष्ट करण्यात इंटरेस्ट असतो. असे म्हणतात की, महात्मा गांधीचे बीपी ( वरचे, खालचे दोन्ही ) नेहमीच अबनॉर्मल असायचे. तरी ते बरेच जगले, निरोगी राहिले!

आपला आरोग्यासंबंधीचा पर्सनल डेटा रेकॉर्ड करण्यासाठी, आपल्या जीवनशैली, सवयी, घटना यांच्या नोंदीसाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा, अॅपचा निश्चित उपयोग करू शकतो. या नोंदीमुळे स्वतः स्वतःवर नियंत्रण ठेवणे, स्वतःचे  मॉनिटरिंग करणे, वेळ पडल्यास ती स्टोरी, त्या नोंदी डॉक्टरशी शेअर करणे हे खरे आरोग्य संवर्धन आहे. इथे एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. माणूसही एक यंत्र आहे असे म्हटले जाते, पण ते  पूर्णतः खरे नाही. यंत्राचे निदान हे किंवा ते अशा डिजिटल स्वरूपात होते. हे डिजिटल तत्त्व माणसाला लागू होत नाही. कारण आपल्या आयुष्याचे, जगण्याचे स्वरूप अनेकांगी आहे. सारखे बदलणारे आहे. काळसुसंगत आहे.आपल्यावर अनेक गोष्टींचे, घटनांचे बरेवाईट परिणाम होत असतात.ते सर्वांकरिता सारखे नसतात. ते व्यक्तीसापेक्ष असतात.शिवाय एकाच घटनेचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. अॅक्शन रिअॅक्शनदेखील स्थितीसापेक्ष, कालसापेक्ष असते.म्हणूनच प्रत्येक व्यक्ती वेगळी, व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो.आपल्या आरोग्यासंबंधी पर्सनल केअर युनिटचे महत्त्व आजच्या काळात जास्त! जपानी मंडळी एकेगाई नावाचे तत्त्व पाळतात. ते दुसरे तिसरे काही नसून हेच आहे. स्वतःला ओळखा. स्वतः स्वतःची काळजी घ्या. स्वतःच्या आयुष्याचे ध्येय ( परपज ) शोधा. अनेक प्रश्नांची उत्तरे बाहेर नसतात. ती आपल्या आतच असतात. यालाच इनर इंजिनीअरिंग असेही म्हणता येईल.

या विषयावरदेखील बरेच संशोधन सुरू झाले आहे. मला आयआयटीत एक वर्ष सीनियर असलेला, अमेरिकेत स्थायिक झालेला, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात बरेच नाव कमावलेला मित्र प्रा. रमेश जैन यावर काम करतो आहे. शरीराचे बरेच अवयव इकडे तिकडे झाल्यानंतर, हार्ट, पेसमेकर, गुडघे बदल…सगळे आटपल्यानंतर त्यालाही नवा विचार करावासा वाटला. तसेही एआय डॉक्टर महाशय येऊ घातले आहेत. बरीच क्रांती येऊ पाहते आहे.सगळे आपल्या भल्यासाठीच आहे असे समजून याकडे बघायचे.डॉ रमेश जैनचे विचार वाचून मलाही हे लिहिण्याचे शहाणपण सुचले.सर्वांनीच आरोग्याचा,आपल्याकडे बघण्याचा नव्याने विचार करावा असे वाटले.. म्हणून हा लेखन प्रपंच!