
>> प्रसाद ताम्हनकर
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी जगभरातील सर्व देशांमध्ये सतत चढाओढ लागलेली असते. एखादे नवे तंत्रज्ञान हस्तगत करण्यासाठी प्रत्येक देशाकडून मोठे प्रयत्न चालू असतात आणि त्या त्या देशातील सरकार त्यासाठी प्रचंड पैसादेखील खर्च करत असते. ‘हायपरसॉनिक’ या तंत्रज्ञानाचा सध्या सगळीकडे जोरदार बोलबाला आहे. विशेषतः युद्धसामग्रीच्या क्षेत्रात या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाला विशेष मागणी आहे. हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर आधारलेली विमाने ही कोणत्याही देशाच्या लष्करी ताकदीला कैक पटीने मजबुती देतात असे युद्ध विषयातील तज्ञ सांगतात.
चीनसारखा कुरापती देशदेखील सध्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि इंजिन बनवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च करतो आहे आणि अनेक शास्त्रज्ञ केवळ याच कामाला जुंपले गेले आहेत. मात्र, नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार चीनने आपल्या या ‘हायपरसॉनिक प्रोजेक्ट’चा आकार कमी करण्याचे ठरवलेले दिसते. मिळालेल्या माहितीनुसार क्षेपणास्त्र व इंजिनाच्या आधी चीनने चक्क हायपरसॉनिक वेगाने धावणारी बंदुकीची गोळी अर्थात ‘बुलेट’ बनवण्यात यश मिळवले आहे. या बुलेटच्या प्रोटोटाइपची जिवंत लक्ष्यावर चाचणीदेखील घेण्यात आली असून तिचे रिझल्ट समोर आले आहे आहेत. जिवंत डुकरांवर या गोळीची चाचणी घेण्यात आली.
चीनच्या ‘चोंगकिंग’ प्रांतात असलेल्या आर्मी मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञांनी ही चाचणी घेतली. जिवंत डुकरांवरती ‘11 मॅच’ इतक्या प्रचंड वेगाने फायर होणारे 5 मिमी ‘स्टील प्रोजेल्टाईल’ डुकरांच्या दिशेने झाडण्यात आले. ‘11 मॅच’ म्हणजे आवाजाच्या वेगाच्या 11 पट जास्त वेग होय. आता ही गोळी नक्की किती वेगाने गेली असेल याचा अंदाज तुम्ही करू शकता. मानवावर या गोळीचा काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज घेण्यासाठी आधी डुकरांवर ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी घेताना डुकरांना बेशुद्ध करण्यात आले होते. यासंदर्भात ‘चायना ऑर्डनन्स सोसायटी’च्या ‘ऍक्टा आर्मामेंटरी पिअर-रिह्यूड जर्नल’मधील एका पेपरचा हवाला देण्यात आला आहे. त्यानुसार ही गोळी डुकराच्या मांडीवर झाडण्यात आली. या गोळीने डुकराला ताबडतोब मरण आले नाही. मात्र, शरीराला गंभीर दुखापत झाली.
1 किमी ते 3 किमी प्रति सेकंद अशा प्रचंड वेगाने या गोळीने मांडीत प्रवेश केला असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे, पण जेव्हा हा वेग 4 किमी प्रति सेकंद होतो, तेव्हा गोळ्यांच्या एंट्री पॉइंटवर मोठी जखम तयार होते. सामान्य बुलेट प्रति सेकंद 1.2 किमी वेगाने प्रवास करतात. मात्र हा प्रचंड वेगच या गोळ्यांच्या यशातील प्रमुख अडथळा बनला आहे. कारण हायपरसॉनिक वेगाने चालणाऱ्या बुलेट त्यांच्या वितळण्याच्या बिंदूपर्यंत पोहोचतात. म्हणजेच लक्ष्याच्या मार्गावर त्या वितळायला लागतात. त्यामुळे लक्ष्यावर मारा करण्याची गोळ्यांची क्षमता कमी होते. लक्ष्याच्या संपर्कात आल्यावर या गोळ्या जळत असल्याचे दिसून आले. लक्ष्याशी टक्कर होताना जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते त्याचा हा परिणाम असतो. पृथ्वीवर एखादे उल्कापिंड आदळल्यानंतर जशी विवरे बनतात, तशी अवस्था या वितळलेल्या गोळ्यांनी झालेल्या जखमेची दिसते.
अमेरिकन संसदेत सादर झालेल्या एका अहवालानुसार हिंदुस्थानदेखील काही काळापासून स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनवण्यात गुंतला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हिंदुस्थान असे एक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे की, ज्याच्या मदतीने पारंपरिक शस्त्रांसह अण्वस्त्रे डागण्याची क्षमता प्राप्त करता येईल. जून 2019 आणि सप्टेंबर 2020 मध्ये अशा तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आल्याची नोंद या अहवालात आहे. एकेकाळी तंत्रज्ञान क्षेत्रात नंबर वन असलेली अमेरिका सध्या हिंदुस्थान, चीन आणि रशियाच्या मागे पडत चालल्याची खंतदेखील व्यक्त करण्यात आली आहे.






























































