अभिप्राय- जगाचा कारभार

>> ओमकार संकपाळ

सोशल मीडियामुळे आजच्या जगात जागतिक घडामोडींचा अभ्यास करणे खूपच सोपे झाले आहे. जगभरात घडणाऱया घटना आणि त्यांचे परिणाम आपल्यावर कसे होतात, हे अगदी सहजपणे समजून घेता येते. युद्ध, जागतिक पातळीवरील राजकारण, करप्रणाली, स्थलांतर, गरिबी आणि अन्य सामाजिक-आर्थिक घटकांचा संपूर्ण जगावर प्रभाव पडतो.

जागतिक घडामोडींचा अभ्यास आणि त्यावरील वाचन किती महत्त्वाचे आहे, हे ‘जगातून फेरफटका – एक मागोवा’ हे लेखक अमोल केरकर यांचे पुस्तक वाचल्यानंतर स्पष्टपणे जाणवते. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांतील घडामोडी, तसेच इतर छोटय़ा देशांवर त्यांचा होणारा परिणाम, याबाबतची सविस्तर माहिती लेखकाने मांडली आहे. जगावर ओढवलेली युद्धाची सावटं, प्रगत राष्ट्रांचा मागास दृष्टिकोन, महामारीचे जागतिक संकट, श्रीलंकेत निर्माण झालेली अराजकता यांसह विविध विषय लेखकाने अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून जगभरात कमालीची अस्थिरता पसरलेली आहे. खरं तर, जगाच्या कानाकोपऱयात लहान-मोठी युद्धे नेहमीच सुरू असतात. मात्र, इस्रायलमधील असंतोषाने जगाला मोठा हादरा दिला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या न्यायव्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याविरुद्ध जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात महिलांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांच्या निदर्शनांचे स्वरूप याचे सखोल विश्लेषण वाचनीय वाटते.

‘अस्मानी आपत्ती’ आणि ‘सुल्तानी संकटे’ यांसारख्या प्रसंगांबरोबरच सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित लेखकाने मांडलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे, गर्भपाताच्या हक्कांवर गदा येत असल्याने ऑक्टोबर 2021 मध्ये स्त्रियांनी मोर्चा काढला. गर्भपाताच्या हक्कांसाठीच्या या चळवळीचे विस्तृत आणि सोप्या भाषेत वर्णन लेखकाने केले आहे.

जग विकासाच्या दिशेने पावले टाकत असले तरी आजही बरेचसे देश गरिबीच्या झळा सोसत आहेत. वातावरण बिघडेल आणि आक्रोश माजेल अशा गोष्टी घडत आहेत, किंबहुना तसे करणाऱयांना प्रोत्साहनही दिले जात आहे. अमेरिकेचे एकतर्फी निर्णय, गरीब देशांचे खच्चीकरण, कोटय़वधींचे स्थलांतर, विषमता, हमास-इस्राएल युद्ध आणि त्याचे परिणाम, जळून निघालेली जनता, कामाच्या ठिकाणी होणारे अन्याय अशा आशयाखाली लेखकाने जगाचा पडद्यामागील चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदुस्थानच्या शेजारील श्रीलंकेतील आपत्ती मनाला चटका देऊन जाते. तेथील जनता आर्थिक आणि राजकीय संकटांचा सामना करत आहे. महागाईने ग्रस्त असलेल्या श्रीलंकेतील जनतेला इंधनासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागले. हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. या संकटाचा फटका सर्वसामान्य नागरिकांपासून ते नामांकित क्रिकेटपटू आणि उद्योजकांनाही बसला. विजेच्या तुटवडय़ामुळे जनता पुरती अंधारात गेली. प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या राजकारण्यांविरुद्ध जनक्षोभ उसळला हेच श्रीलंकेतील या आंदोलनाचे वैशिष्टय़ ठरले.

कामाच्या ठिकाणी होणाऱया छळाबाबत लेखकाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीचा अगदी मुद्देसूदपणे उल्लेख केला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱया हिंसा व छळ याबाबत या संघटनेने 121 देशांमध्ये एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या आधारे कामाच्या ठिकाणी होणारा छळ थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने काही मानके तयार केली आहेत. याबाबतची सविस्तर माहिती ‘जगातून फेरफटका’ या पुस्तकातून मिळते.

जगातून फेरफटका एक मागोवा

लेखक ः अमोल केरकर प्रकाशक ः ग्रंथाली

पृष्ठे ः 299, मूल्य ः 400 रुपये