
>> संजय कऱ्हाडे
बुमरा… एक अतिशय धारदार गोलंदाज. एखाद्या कोळ्याने पापलेट कापावा त्या सफाईने तो प्रतिस्पर्धी फलंदाजांचा बचाव कापून काढतो. ते अवघड होऊन बसलं तर फलंदाजाच्या बुंध्यात बाण मारतो. सामना कुठलाही असो, टी-ट्वेंटी, वनडे, कसोटी, त्याचा बाण रामबाण असतो. त्याच्या गोलंदाजीची पद्धत थोडी अपारंपरिक किंवा अनैसर्गिक आहे. पण त्यातच भलेभले जखडले जातात. 46 कसोटींत 19.6च्या सरासरीने 210 बळी! हे आक्रित अनाकलनीय आहे. आजच्या फलंदाजांवर वरदहस्त ठेवणाऱया खेळपट्टय़ांच्या काळात आणि टी-ट्वेंटीच्या धडाक्यात बुमराची कामगिरी अतुलनीय अशीच म्हणावी लागेल.
पण बुमराच्या त्याच अनैसर्गिक गोलंदाजीच्या पद्धतीमुळे त्याला त्रास झाला अन् त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून तो पार पडला अन् प्रश्न ठाकला, आता पुढे काय? त्याचे डॉक्टर म्हणाले, बुमराच्या पाठीवर, कंबरेवर अती ताण येणार नाही अशी खरदारी घेणं आवश्यक आहे. ठिकाय. आता, बुमरा नावाचं एक न सुटणारं कोडं नेमकं इथेच निर्माण होतं अन् परिस्थिती धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी होऊन बसते!
बुमरा संघात हवा. पण तो तीनच सामने खेळणार. त्याच्यावर अती ताण पडू शकत नाही. म्हणजे तो किंवा त्याचे डॉक्टर म्हणतील तेवढीच गोलंदाजी करणार. देशासाठी खेळणं हे अभिमानास्पद आहे. पण जमेल तेवढंच! कप्तान म्हणतो, बुमरा ‘उपलब्ध’ आहे. पण बुमरा दुसऱया कसोटीत एजबॅस्टनला खेळत नाही. पुढच्या लॉर्ड्स कसोटीत खेळेल. मग तुझ्या सर्व मागण्या मान्य केल्यावर तू लॉर्डसवर हिंदुस्थानला जिंकून देण्याची हमी देणार का? हमी नाही देऊ शकत, हा खेळ सांघिक आहे!
आता प्रश्न येतो, पहिल्या कसोटीत बुमरा खेळला, पहिल्या डावात पाच बळी घेतले. दुसऱया डावात शून्य बळी. उत्तर – ‘असं होऊ शकतं…’ थोडक्यात, बुमरा संघात असला किंवा नसला तरी सामन्याचा निकाल जय, पराजय आणि अनिर्णित असा काहीही लागू शकतो. हे सर्वांच्याच बाबतीत लागू पडतं. मोहम्मद सिराजच्याही!
सिराज आणि बुमरा तीन-चार महिन्यांच्या फरकाने वयाने सारखेच. वय वर्ष 31. गेल्या तीन वर्षांत बुमराने कसोटी सामन्यात 410.4 षटपं टाकली. सिराजने 586.2 षटकं टाकली. सिराजवर अती ताण पडला का? तुलना नाही करायची. पण तरीही… बुमराने पहिल्या कसोटीत 45 षटकं टाकली. सिराजने 41 षटकं… मग, सिराजला न्याय मिळाला का? आणि बुमराला दिलेल्या सवलतींमुळे कप्तान गिलला मिळालेली वागणूक योग्य ठरते का?
बुमराला सांभाळून वापरू नका असं माझं म्हणणं नाही. तो आपल्याला हवाच आहे. पण तो जर संपूर्ण मालिका हिंदुस्थानसाठी उपलब्ध राहू शकत नसेल तर त्याला पूर्ण फिट होऊन परतायला सांगा, अन्यथा बुमरा क्रिकेटपेक्षा मोठा आहे असं मान्य करा! इथेच निवड समिती आणि बोर्डाने माती खाल्ली. बाबा बुमरा, लवकर पूर्ण फिट हो! सोडव आम्हाला, तुझ्या चाहत्यांना या अवघड गणितापासून!!