लेख – हिंदुस्थानी सैन्याचे स्फूर्तिदाते

1785

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

ब्रिटनचे त्यावेळचे पंतप्रधान लॉर्ड अ‍ॅटली यांनी हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा ठराव मांडताना कबूल केले की, ‘हिंदुस्थानी सैन्य ब्रिटनशी एकनिष्ठ राहिलेले नसल्यामुळे हिंदुस्थानला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत.’ म्हणून म्हणावेसे वाटते की, वीर सावरकर ‘स्वतंत्र हिंदुस्थानी सैन्याचे स्फूर्तिदाते होते तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे आद्य सरसेनापती. ‘लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या’ हे सावरकरांचे आवाहन एक प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या हिंदुस्थानी लष्कराची नांदीच ठरली.

हिंदुस्थानी लष्कराला 19-20 व्या शतकात आधुनिक म्हणजे सांप्रत काळातील ब्रिटिशांनी जरी आकार दिला तरी त्याला बाळसे दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्राला एक शिस्तबद्ध प्रत्ययकारी सैन्य उभारावे लागणारच या विचाराने सावरकरांनी सैनिकीकरणावर भर देऊन त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे ठरविले. तेव्हा त्यांना हिणवण्यात आले. आजही त्यावरून सावरकरांवर टीका करणारे महाभाग आहेतच. अर्थात, या टिकेला भीक न घालता स्वा. सावरकरांनी तत्कालीन तरुणांना ‘सैन्यात भरती व्हा’ असे आवाहन केलेच. ब्रिटीशांनी मंगल पांडे याच्या हौतात्म्यानंतर काही जातींना सैन्याची दारे बंद केली होती. पण दुसर्‍या महायुद्धातील ब्रिटीश सैन्याची पडझड होताच पुन्हा सैन्यभरती सुरू केली. त्याचा फायदा हिंदुस्थानी तरुणांनी घ्यावा व राष्ट्राला भविष्यात एक प्रशिक्षित सैन्य प्राप्त व्हावे हाच यामागचा स्वा. सावकरांचा उदात्त हेतू होता. 15 एप्रिल 1938 या दिवशी मुंबई मुक्कामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात वीर सावरकरांनी संदेश दिला, ‘लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या’ ही एक प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या हिंदुस्थानी लष्कराची नांदीच ठरली.

लाहोर काँग्रेस अधिवेशनापासून पाकिस्ताननिर्मितीचे डोहाळे सुरू झाले. तेव्हा तत्कालीन रॉयल इंडियन आर्मीत तीन चतुर्थांश संख्या मुस्लिम बांधवांची होती. तेव्हा सैन्यामधले हे प्रमाण विषम असून धोक्याचे ठरू शकते हे ओळखून सावरकर यांनी आवर्जून सैनिकीकरणाचा विषय उचलून धरला. यात रोजगाराबरोबर सैन्यातील सर्वसमावेशकता निर्माण व्हावी हा उद्देश होता. तो योग्यही होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटच्या पुनरुस्थापनेसाठी व नेताजींनी आझाद हिंद सेनेचे स्वीकारलेले सरसेनापतीपद हे क्षात्रतेजाला उजाळा व उत्तेजन देण्यासाठी होते.

खरे तर तेव्हा ब्रिटीश सैन्यात दाखल होणार्‍या हिंदुस्थानींची स्थिती ‘न घरका, ना घाटका’ अशी होती. स्थानिक एतद्देशीय (Native) सैनिकाला देशद्रोही म्हणून शिव्याशाप देत तर ब्रिटीश म्हणून हिणकस वागणूक देत होते. अशाप्रसंगी वीर सावरकरांनी हिंदुस्थानी सैनिकांना भावनिक, नैतिक आधार देत ब्रिटीश सैन्य कौशल्य आत्मसात करण्याचा उपदेशवजा आदेश दिला. अहिंसा, शांती, बंधुभाव या गोड वाटणार्‍या, पण अव्यवहार्य तत्वज्ञानात  गुंतलेल्या सरकारला सावरकरांनी चीनच्या विश्वासघातकी व राक्षसी विस्तारवादी सुप्त आकांक्षेची जाणीवदेखील करून दिली होती. फक्त नवनिर्मित पाकिस्तान हा पश्चिमोत्तर शत्रू नसून सैन्यादलाची उभारणी करताना सप्तभगिनी (Seven Sister) म्हणजे पूर्वोतर सीमा भागाकडे-विशेषत: अक्साई चीन (अरुणाचल प्रदेश) भागात संरक्षणसिद्धतेवर भर द्यावा, असे ते वारंवार प्रतिपादित होते. मात्र त्यावेळच्या हिंदुस्थानी नेतृत्वाने सरदार वल्लभभाई पटेल व सावरकरांच्या या आग्रहाकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिपाक म्हणून 1962 चे चीनचे आक्रमण म्हणता येईल. स्वा. सावरकरांच्या सूचना, सल्ला सरकारने मानला असता तर चीनच्या आजही चालू असलेल्या घुसखोरीला वेसण बसून सैन्यातले सीमा प्रहरी बलदंड झाले असते. रत्नागिरीत नजरकैदेत असताना व नंतरही अनेक दिग्गज सावरकरांना भेटले. त्यातील नेताजी सुभाषचंद्र भोस यांची भेट फार गाजली. या भेटीने इतिहास नुसता घडवला नाही तर ब्रिटीशांना कळून चुकले की हिंदुस्थानची सत्ता आपणास सोडणे अपरिहार्य आहे. या भेटीतच स्वतंत्र हिंदुस्थानी लष्कराची मुहूर्तमेढ रोवली जाऊन नाविकांचे बंड जन्माला आले आणि ब्रिटीश सेनाधिकारी हतबल झाले.

दुसर्‍या महायुद्धात पडझड होत असताना ब्रिटीशांनी हिंदुस्थानी तरुणांकडे मदतीची याचना करून सैन्यभरती केली. संथ गतीने सुरू असलेले किंवाग कमिशन प्रवेशांनासुद्धा गती प्राप्त झाली. तेव्हा स्वा. सावरकर यांनीही पर्वणी समजून सैनिकीकरणाचा उपक्रम सुरू केला. त्यामागील हेतू हाच होता की, आधुनिक सैनिकी प्रशिक्षण हिंदुस्थानी तरुणांनी आत्मसात करून ते स्वातंत्र्योत्तर काळात वृद्धीगंत करावे. डॉ. धर्मवीर मुंजे, मामाराव दाते, शांताबाई गोखले, ल. ग. उर्फ भालाकार भोपटकर आदींनी याबाबत समाजप्रबोधन सुरू करताच रंगरुट, देशद्रोही अशा शेलक्या विशेषणांनी सावरकरांची निर्भत्र्सना करण्यात आली. मात्र सावरकरांच्या या उपक्रमामुळेच वीस लाख हिंदुस्थानी हिंदू-मुस्लिम-शीख सैन्यात भरती झाले हे लक्षात घेतले पाहिजे.

वीर सावरकरांच्या या उपक्रमाचा फायदा असाही झाला की, ब्रिटनचे त्यावेळचे पंतप्रधान लॉर्ड अ‍ॅटली यांनी हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा ठराव मांडताना कबूल केले की, ‘हिंदुस्थानी सैन्य ब्रिटनशी एकनिष्ठ राहिलेले नसल्यामुळे हिंदुस्थानला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत.’ म्हणून म्हणावेसे वाटते की, वीर सावरकर ‘स्वतंत्र हिंदुस्थानी सैन्याचे स्फूर्तिदाते होते तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे आद्य सरसेनापती. याबाबत जपानी ग्रंथकार जे. पी. ओहसावा यांचे गाजलेले पुस्तक ‘दी टू ग्रेट इंडियन्स इन जपान’ हे अभ्यासकांनी जरूर वाचावे. आझाद हिंद सेनेला पन्नास हजारांच्या जवळपास प्रशिक्षित सैन्य लाभले. त्यात सावरकरांचा बहुमोल वाटा होता यात संशय नाही.

माझ्यासारखा शिपाईगड्याला हा इतिहास आठवला कारण आजच्या घडीला हिंदुस्थानी सशस्त्र सेनादलाला पंधरा हजारांपेक्षा जास्त सैनिकी अधिकार्‍यांची कमतरता भासते आहे. चीनची घुसखोरी थांबत नसून पाकिस्तान कश्मीरचा वाद सतत उकरून काढत आहे. हिंदुस्थानच्या सीमेला पेटत ठेवणे हा एक आंतरराष्ट्रीय कट तर शिजत नाही ना, असे एवंâदर चित्र आहे. चीनला ग्वादार बंदर पाकिस्तानने पन्नास वर्षाच्या कराराने भाडेपट्टीवर दिल्याचा अर्थ काय? चीनने गेल्या दोन वर्षात ऐंशीपेक्षा जास्त पाणबुड्या त्यांच्या नौदलात तैनात केल्या असून एक विमानवाहू नौका सामील वेâली आहे. हिंदुस्थानी सैन्याची त्यामुळेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आकलन करून बांधणी करावी लागेल. सैनिकी धोरण निश्चित करून सैन्याची सुयोग्य रचना करण्यासाठी लष्कराचे अंदाजपत्रक बळकट करावे लागेल. या सर्व बाबींचा यथायोग्य विचार करणे हे विद्यमान केंद्र सरकारपुढील आव्हान आहे.

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या