सामना हरलो, पण मालिका जिंकलो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघ उदार मन असलेला एक संघ आहे. वन डेच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकल्यानंतर हिंदुस्थानी संघाला कॅनबेराला ‘रिटर्न गिफ्ट’ दिलं होतं. टी-20 च्या मालिकेत हिंदुस्थाननं ते ‘रिटर्न गिफ्ट’ दिलं. सामना 12 धावांनी गमावून परतफेड केली.

या औदार्याची गरज नव्हती, पण या सामन्यामध्ये हिंदुस्थानी संघाने औदार्य दाखवायचं क्षेत्ररक्षणापासूनच ठरवलेलं दिसत होतं. मॅक्सवेलचे दोन झेल सोडले. क्षेत्ररक्षण करताना काही धावा ढिसाळपणे दिल्या गेल्या. त्यात मॅक्सवेलची पाठ दिसत असताना चहलने नो बॉल टाकला. गोलंदाजाला नो बॉल टाकणं भूषणावह कधीच नसतं. आणि फिरकी गोलंदाजाला तर नसतंच नसतं. छोटय़ा स्टार्टने चेंडू टाकताना नो बॉल पडावाच का? ते पट्टीच्या गायकाने सुरात चुकण्यासारखं आहे. चहल सुरात चुकला आणि मॅक्सवेलला सूर सापडला.

संजू सॅमसनने स्वेपसनच्या फुलटॉसवर खेळलेला फटका हाही औदार्याचाच भाग होता. गेल्या मॅचमध्ये त्याने झेल देताना लाँग ऑफला हेरलेलं, यावेळेला त्याने लाँग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे जबाबदारी सोपवली. टी-20ची संधी ही ऐश्वर्या रायसारखी असते. ती प्रत्येकाच्या नशिबात नसते. ती मिळाल्यानंतर तुम्ही जर संधीचा फायदा उठवला नाही तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच. समोर विराट खेळत असताना तुम्ही शिकणार नाहीत तर मग कधी शिकणार?

मॅथ्यू वेड आणि मॅक्सवेलच्या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या 186 धावांची आलिशान बिल्डिंग उभी राहिली. त्यात मॅथ्यू वेडने त्याच्या लाडक्या ऑनला अप्रतिम फटकेबाजी केली. अधूनमधून ऑफलाही फटके मारून आपल्याकडे ऑफचेही फटके आहेत हे त्याने दाखवलं. चेंडू कुठे फेकावा, पुठला फटका निवडावा याचे त्याचं प्लॅनिंग उत्तम होतं आणि म्हणूनच तो ही इमारत उभी करू शकला. मॅक्सवेलचं तंत्रज्ञान वेगळच आहे. तो ‘लिव्ह डेंजरसली’ या तत्त्वाप्रमाणे जगतो. कुठला चेंडू कुठे फेकणार हे त्याच्याशिवाय कुणालाच शेवटच्या क्षणापर्यंत ठाऊक नसतं आणि कळतही नाही. त्याच्या फटक्याच्या अदमास घेणं कठीण आहे. फटक्यांच्या इप्रोव्हायजेशनच वेगळचं पुस्तक त्याने लिहायला घेतलंय. पूर्वीच्या सर जॅक हॉब्स, सर लेन हटन, विजय मर्चंट यांनी हे जर फटके पाहिले असते तर पुन्हा जन्म नको असं म्हटलं असतं. कारण असे फटके ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात कल्पनेतसुद्धा नव्हती. त्याने एका ऑफ स्टंपच्या बाहेर असलेल्या वाईड चेंडूवर पुल मारला आणि तो चेंडू थेट षटकाराला गेला. त्यावेळेला तो ऑफ स्टंपच्या बाहेर इतका होता की त्याने पुढे एक पाऊल टाकलं असतं तर पॉइंटला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षणाशी त्याने शेकहॅण्ड केला असता. टी-20मध्ये अनेक फलंदाज गोलंदाजांना चकवण्यासाठी क्रीझमध्ये आधीच हालचाल करतात. कोण पुढे जातो, कोण ऑफला जातो, कोण ऑनला जातो. याची हालचाल नसते. तो हल्लकल्लोळ असतो. मला कधीकधी अशी भीती वाटते की, तो शिर्षासन घालूनसुद्धा एखादा फटका खेळेल. इतकी जोखीम घेतल्यावर त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य कमीच असतं. पण जेव्हा तो यशस्वी होतो, क्षेत्ररक्षक औदार्य दाखवतात त्यावेळी तो जिंकून देतो. क्रिकेट कसा दात पाडणारा खेळ आहे पाहा, गेल्या मॅचमध्ये मॅक्सवेलला पॉवर प्लेमध्ये आणून कर्णधार वेडने लग्नात अक्षता वाटाव्यात तशा 19 धावा वाटल्या होत्या. हिंदुस्थानी संघ आणि यश यांच्या लग्नाची मंगलाष्टकं त्याच चेंडूपासून सुरू झाली होती. अनेकांनी त्या गोष्टीवर टीका केली. या मॅचमध्ये सर्व टीका टोपलीत टाकून कर्णधाराने पुन्हा त्याच्याच हातात नवीन चेंडू ठेवला आणि तो चक्क फॉर्ममध्ये असलेल्या राहुलची विकेट देऊन गेला. क्रिकेट ही अशी कधीकधी तुमची टोपी उडवते.

खेळपट्टी चांगली होती आणि पाठलागही खूप कठीण नव्हता. ऑस्ट्रेलियाचं या सामन्यातलं वेगवान त्रिपूट म्हणजे टाय, अॅबट आणि सॅम हे धावांच एटीएम आहे. तरी त्यांनी तीन गोलंदाजांवर मॅच काढली. आणि ते तिघेही फिरकी गोलंदाज होते. स्वेपसन, झाम्पा आणि मॅक्सवेल. स्वेपसन तर प्ऱत्येक सामन्यात प्रगतीची काही पावलं पुढे चाललाय. या सामन्यात त्याने तीन महत्त्वाच्या विकेटस् घेतल्या. सेट झालेला शिखर धवन, उतावळा संजू सॅमसन आणि मग नुकताच आलेला अय्यर. त्यात सॅमसन व अय्यर लागोपाठ बाद झाल्यामुळे नवीन आलेल्या पांडय़ावर लगेच फटके मारायची जबाबदारी वाढली. कारण सर्व आता अवलंबून होतं ते त्याच्या आणि विराटच्या जोडीवर. योग्य वेळी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने झाम्पाला आणलं आणि झाम्पाने पांडय़ाला फसवलं. त्यामुळे पुढे विराटला जवळपास प्रत्येक चेंडूवर जोखीम घेण्याशिवाय पर्याय नव्हता. खरंतर कालचा दिवस हा विराटचा दिवस आहे असं वाटत होतं. मॅक्सवेलप्रमाणेच त्याचाही एक झेल सुटला, एक स्टम्पिंग सुटलं पण त्याच्याकडे पाठलाग करून मॅच जिंकण्याची एक वेगळीच ताकद आहे. त्यात टाय अन् अॅबटचे उरलेले चेंडू म्हणजे पाऊस कोसळत असताना ताटात पडलेली कांद्याची आणि बटाटय़ाची भजी होती. पण ती खाताना एका भजीला चटणी जरा जास्त लागली आणि ठसका लागला.

विराटची विकेट गेल्यावरही मी आशा सोडलेली नव्हती. कारण शार्दुल ठाकूरमध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडू होण्याची ताकद आहे असं मला नेहमी वाटतं. टी-20 अन् वन डेत खाली येऊन मोठे फटके मारण्याची क्षमता असणं ही अत्यंत महत्त्वाची आणि हवीहवीशी वाटणारी गुणवत्ता त्याच्याकडे आहे. त्याने प्रयत्न केला. तोपर्यंत टार्गेट खूप कठीण झालं होतं.

या टी-20च्या मालिकेत एक गोष्ट स्पष्टपणे दिसली. दरवर्षी असणाऱया आयपीएलच्या शिकवणीमुळे आपल्या सर्व खेळाडूंचा टी-20चा अभ्यास इतका पक्का झालाय की बुमराह, शमी, रोहित शर्मा वगैरे मंडळी नसली तरी आपण मालिका जिंकू शकतो.