
>> शिरीष कणेकर
भल्या भल्या भविष्यवेत्त्या तज्ञांना तोंडघशी पाडण्यात क्रिकेटच्या खेळाला काय विकट आनंद मिळतो क्रिकेटदेवाला माहीत! डॉन ब्रॅडमन धुमकेतूसारखा उगवला तेव्हा जुना इंग्लिश वेगवान गोलंदाज मॉरिस टेट म्हणाला होता, ‘इंग्लिश विकेटस्वर ब्रॅडमनला एकेका धावेसाठी रक्त आटवावे लागेल.’ कोणाला किती काळ रक्त आटवावेच नव्हे, तर सांडावे लागले याचा रक्तरंजित इतिहास सर्वश्रुत आहे.
काल हिंदुस्थानी संघानं ऑस्ट्रेलियाच्या व आपल्या दोन्ही देशांतील अनुभवी जाणकार व तज्ञ क्रिकेट भाष्यकारांना धूळ चारली. सामना क्रिकेटचा आणि हे सर्वनाशाची ग्वाही देणारे आखाडय़ात मातीत लोळले. (यांच्यात मीही मोडतो, पण स्वतःला तज्ञ जाणकार म्हणवून घेण्याइतका उन्माद अजून तरी माझ्या डोक्यात गेलेला नाही. क्रिकेटवर जीव पाखडणारा मी एक अतिसामान्य जीव आहे) आदल्या ऑडिलेडच्या कसोटीत छत्तीस धावांत खुर्दा उडाल्यावर संघाचं व आपलं सगळय़ांचं ‘मोराल’ साहजिकच रसातळाला गेलं होतं. सेहेचाळीस वर्षांनंतर 42 धावांचा नीचांक मोडून आपण 36 धावांचा नवीन विक्रम (!) प्रस्थापित केला होता. त्यानंतर विजयाची भाषा बोलायलाही जीभ रेटत नव्हती. इतक्या दारुण, अपमानास्पद पराभवानंतर मेलबोर्नचा पराभव कमी दारुण व कमी अपमानास्पद असावा एवढंच भयभीत मन चिंतत होतं.
आता बघा हं, पार चोळामोळा करून टाकणारा पराभव पाठीशी. कर्णधार व जगातील सर्वोत्तम म्हटला जाणारा फलंदाज विराट कोहली बायकोच्या पहिल्यावहिल्या बाळंतपणासाठी स्वदेशी परतलेला. (रोहित व इशांत हे शर्मा काही करणार नाहीत. अनुष्का शर्मा काय ती डिलीव्हर करील, असे विनोदही पसरवले जात होते) हात मोडल्यामुळे आघाडीचा वेगवान गोलंदाज शमी मालिकेतूनच बाद झालाय. म्हणजे, मानसिक दृष्टीनंही पूर्णपणे पराभूत झालेला संघ नवीन बदली कर्णधाराच्या नेतृत्वाखाली दोन प्रमुख मोहऱयांविना लढायला, उतरणार. अगरवाल, पृथ्वी शॉ, पुजारा, बिहारी, वृद्धिमान साहा व स्वतः कर्णधार राहणे अपयशी ठरलेले. आशेचा कुठलाच किरण दिसत नाही.
त्यानंतर जे घडलं ते डोळय़ांवरचा विश्वास उडविणारे होते. आपल्या तोडमोड झाल्यासारख्या भासणाऱया संघात ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडविली. विशेष म्हणजे, त्यात कुठलाही फ्लूक नव्हता. त्यांच्या मातीत त्यांच्या बलाढय़ संघाला आपण खडे चारले. कोहलीच्या तुलनेत रहाणे अगदीच शांत व थंड निपजला. त्याला योग्य वाटतील ते गोलंदाजीत बदल तो करत होता. ते बदल यशस्वी ठरले तर नाचत नव्हता की स्वतःची पाठ थोपटून घेत नव्हता. उदाहरणार्थ,
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात बुमराह व अश्विन फलंदाजांवर जादू करून त्यांना जखडून ठेवत असताना अजिंक्यने एकाएकी महंमद सिराजला आणले. पहिल्याच षटकात त्याने स्लिपमार्फत डावऱया हेडला माघारी पाठवले. राहणेची चाल फार विचारपूर्वक केलेली असेल किंवा नसेल, पण तो यशस्वी झाला याची नोंद घ्यावीच लागेल.
बुमराहपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांची पळापळ होत असताना पाहणे हे नेत्रसुखद होते. सिराजने कमाल केली. (मी कदाचित त्याला संघात घेतलंही नसतं.) शमीची उणीव त्यानं भासू दिली नाही. बुमराहचा बंपर सलामीवीर वेडच्या हेल्मेटधारी टपुऱयात आदळल्यावर तो थोडा नरम पडलाच. दुसऱया डावात सलामीवीर वर्न्सला बाद करून ऑस्ट्रेलियन फलंदाजीला भगदाड पाडणारा उमेश यादव जखमी झाला, पण उर्वरित माऱयानं त्याची उणीव जराही भासू दिली नाही. जडेजा आता संघाचा महत्त्वाचा भाग झालाय. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण तिन्ही आघाडय़ांवर तो तळपतोय. ऑस्ट्रेलियन फलंदाज बुमराहला टरकून असतात याची जाणीव ऑस्ट्रेलियन काॅमेंटेटर्स ग्लेन मॅकग्रा, माइक हसी, शेन वॉन, मार्प वॉ यांच्या वक्तव्यावरून होत होती. स्मिथला दोन्ही डावांत टिकू न देणं हा हिंदुस्थानी माऱयाचा सर्वांत मोठा विजय होता. त्याच्या मागे विचारपूर्वक योजलेला सापळा होता हे जाणून जास्तच बरं वाटलं. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱया ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशातील चिरपरिचित विकेटवर धड दोनशे धावाही न करू देणं हा हिंदुस्थानी गोलंदाजीचा मोठा विजय होता. अश्विनमध्ये अजूनही दम आहे हे ऑस्ट्रेलियाला व आपल्यालाही कळले. सामन्यात एकच शतक निघालं आणि फॉर्मात नसलेल्या नेतृत्वाचं जोखड खांद्यावर आलेला, टीकेचा धनी झालेल्या अजिंक्य रहाणेने ते काढलं. प्राप्त बिकट परिस्थितीत काढलेल्या या शतकाचं मोल करता येणार नाही. कुठून आलं हे अवसान त्याच्यात? जबाबदारीने काही खांदे झुकतात, तर काही खांदे स्फुरण येऊन सरसावरतात. राहणेचे सरसावले. शुभम गिलच्या रूपानं आपल्याला गुणी, धडाकेबाज सलामीवीर गवसलाय असं म्हणायचं का? आपण अगरवालला जोडीदार शोधत होतो. आता गिलला जोडीदार शोधायची वेळ आलीय. अर्थात अगरवालच्या नावावर फुली मारण्याची इतक्यात घाई नको. तीच गोष्ट पृथ्वी शॉची. त्याची बॅक लिफ्ट त्याला गोत्यात आणत असेलही, पण एकवीस वर्षांचा कोवळा पोर आहे तो. शिकेल, गिव्ह हिम टाइम. राहुलही कामाचा माणूस आहे. त्याला विंगेत तयार राहू द्या.
मागल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवाचं सावट झुगारून देऊन लढाऊ खेळ करून विजयश्री खेचून फरफटत आणणाऱया हिंदुस्थानी संघाचं आपण मनःपूर्वक अभिनंदन करूया. क्रिकेटच्या इतिहासात या विजयाला अनन्यसाधारण महत्त्व राहील. आता 7 जानेवारीला सुरू होणाऱया तिसऱया कसोटीत काय होणार? एवढं महाभारत घडून गेल्यावर मी भाकीत वर्तवण्याचा मूर्खपणा कसा करू? त्यापेक्षा जे होईल ते मी म्हणतच होतो हे सांगणं सोपं…





























































