पाऊलखुणा – शिलालेखाचा मागोवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

शिलालेखाचा मागोवा घेताना पुण्यातील वाकड येथील मुळा नदीकाठी असणाऱया श्री म्हातोबा देवाच्या मंदिर परिसरातील एका शिळेवर मंदिराच्या बांधकामाबाबत उल्लेख असणारा शिलालेख दिसून आला. श्री म्हातोबा हे कोथरुडपासून ते हिंजवडी वाकडपर्यंत अनेक गावांमधे अधिष्ठाता असणारी ही क्षेत्रपाल देवता आहे. या शिलालेखाच्या वाचनानंतर या ग्रामदेवतेच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱया गोष्टींचा, चालीरितींचा मागोवाही घेता आला.

गावोगावी असणाऱया क्षेत्रपाल देवता म्हणजेच ग्रामदेवता या विषयावर म्हणावे तसे संशोधन झाले नाही. या देवता आणि त्यांचे उत्सव, आचार-परंपरा यांनी संबंध ग्रामीण जीवनाच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचा मोठा अवकाश व्यापला आहे. या ग्रामदैवतांशी स्थानिक स्तरावर अनेक कथा, दंतकथा, चालीरिती, आचार निषेधही जोडलेले असतात तसेच त्यांनाही स्वतःचा असा मौखिक इतिहास असतो.

अशीच एक ग्रामदैवता म्हाणजे श्री म्हातोबा. पुणे शहरातील कोथरुडपासून ते हिंजवडी वाकडपर्यंत अनेक गावांमधे अधिष्ठाrत असणारी ही क्षेत्रपाल देवता. तिच्या उत्सव परंपरा व कथांनी इथले स्थानिक भावविश्व व्यापले आहे.

महाराष्ट्रातील या लोकदैवतांवर, ग्रामदैवतांवर सर्वांत आधी प्रकाश टाकण्याचे काम केले ते ज्येष्ठ संशोधक दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी. यानंतर ज्येष्ठ भाषा संशोधक विश्वनाथ खैरे यांनीही प्रयत्न केला, परंतु याबाबत ठोस माहिती वा इतिहास कुणाच्याच हाती लागला नाही. यामुळेच संशोधकांमध्ये या संकल्पना, रीती याबाबत कुतूहल होतेच. याच कुतूहलापोटी मीही या इतिहासाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला.

माझ्या या प्रयत्नांना बळ मिळाले ते रा. चिं. ढेरे यांच्या नावाने ग्रामदैवतांच्या अभ्यासासाठी मिळालेल्या संशोधनपर शिष्यवृत्तीने. या संशोधन प्रकल्पाअंतर्गत मी अनेक गावांना भेटी दिल्या. त्या वेळेस वाकड या मुळा नदीकाठी असणाऱया म्हातोबा देवाच्या मंदिरात जाण्याचा योग आला. त्यावेळेस मंदिराच्या बाहेर डावीकडे एका जुन्या मंदिराच्या बांधकामातील एक दगडी शिळा रंग देऊन उभी केल्याचे दिसले. या शिळेवर काहीतरी लिहिले असावे असे त्यावरील चिन्हांवरून वाटत होते. परंतु दगडावर दिलेला घट्ट सोनेरी ऑईलपेंट यामुळे काहीच समजत नव्हते. गेल्या वर्षी वर्षभर झालेल्या जोरदार पावसामुळे हा रंग फिक्कट पडत गेला आणि एक एक अक्षर दिसू लागले.

या शिळेवर शिलालेखच आहे हे एव्हाना स्पष्ट दिसत होते. मात्र याचे वाचन झाले तरच त्याचा नेमका संदर्भ लागणार होता. पुढे दोन-तीन वेळा भेट देऊन बारकाईने पाहून हा 16 ओळींचा शिलालेख वाचून काढला आणि आश्चर्याचा धक्का बसला. हा शिलालेख 1681 सालातील म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील असून मंदिराच्या बांधकामाविषयी माहिती यात नमूद केली आहे. मंदिराचे बांधकाम 1678 ते 1681 असे तीन वर्षं सुरू होते म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच जुन्या म्हातोबा मंदिराचे काम सुरू झाले होते, असे स्पष्टीकरण निश्चितच यावरून देता येते.

सदर शिलालेखानुसार हिंजवडी गावातील मुकादम पाटील असणाऱया जांभुळकर यांनी वाकडमध्ये येऊन हे मंदिर बांधले होते. या घटनेच्या स्पष्ट निर्देशामुळे मूळचा हिंजवडीचा असणारा म्हातोबा देव वाकड येथे कशाप्रकारे आला हे सांगणाऱया दंतकथा, मिथककथा यांची जळमटे दूर होऊन खरा इतिहास समोर येण्यास मोठी मदत झाली आहे. इतिहासाच्या संशोधन पद्धतींच्या अभ्यासामध्ये अनेकदा एक पुरातत्वीय साधन कशा प्रकारे इतर अनेक साधनांवर वरचढ ठरून इतिहासाची व मान्यतांचा प्रवाहच बदलू शकते हे यातून सिद्ध झाले आहे.

वाकड येथे सापडलेला हा शिलालेख 38 सें.मी. उंच व 11 सें.मी. रुंद असून लेखातील पहिल्या चार ओळींमधे डावीकडच्या बाजूस फुटलेला आहे. आयताकृती असणारी शिलालेखाची शिळा ही जुन्या मंदिराच्या चौकटीचा एक भाग होती. शिलालेखाची भाषा मराठी असून देवनागरी लिपीत लिहिण्यात आला आहे. सदर शिलालेखात ‘र’ हे अक्षर जुन्या वळणाचे आहे. तसेच अनेकदा ‘ल’ अक्षराऐवजी ‘ळ’ हे अक्षर वापरले आहे. शिलालेखात काही ठिकाणी चुकाही आढळतात.

शिलालेखात उल्लेख केल्याप्रमाणे म्हातोबा मंदिराचे बांधकाम फाल्गुन महिन्यात 1678 मधे सुरू झाले ते 1681 मध्ये संपले म्हणजे साधारण तीन वर्षं हे बांधकाम सुरू होते. सदर शिलालेखात सहा गावांचा उल्लेख येत असून यातील दोन नावे अस्पष्ट आहेत. खेड तालुक्यातील पाबळ, धामोनी, चास व मुळशी तालुक्यातील हिंजवडी ही गावे या शिलालेखात नमूद आहेत. या गावांतील गावकऱयांना आजही यात्रेच्या वेळी वेगवेगळे मान देण्याची प्रथा आहे. शिलालेखात नमूद असणाऱया जांभुळकर परिवारास वाकड-हिंजवडी गावातील यात्रेत बगाडाचा मान आहे. 17 व्या शतकात एका गावातील पाटील दुसऱया गावात जाऊन मंदिर बांधू शकतो, यावरून तत्कालीन आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवनाचे अनेक धागेदोरे आपल्यासमोर येतात.

शिलालेख हे इतिहास संशोधनामधील अतिशय महत्त्वाचे व प्रथम दर्जाचे साधन असल्यामुळे त्यामुळे ग्रामदैवतांच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडला आहे. ग्रामदैवतांचा काळ ठरवताना येणारी अडचण अशा पुरातत्वीय पुराव्यांमुळे दूर होते. शिलालेखात नमूद असणारा देव श्री म्हातोबा याच्याशी यात्रेतील बगाड प्रथेपासून ते अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत.