अंतराळात ‘उतरण्याचे’ ठिकाण!

>> दिलीप जोशी

परवाच्या 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर, अवकाशात स्थानापन्न होऊन बावीस वर्षे पूर्ण झाली. अगदी काटेकोर हिशेब मांडायचा तर आता या अंतराळ स्थानकाचे वय बावीस वर्षे सहा दिवस इतके आहे आणि आणखी काही काळ ते कार्यरत असणार आहे.

पूर्वी अनोळख्या जागी काही कामानिमित्त जाण्याची वेळ आली तर चार दिवस ‘उतरायला’ म्हणजे काम होईपर्यंत राहायला, कोणी नातेवाईक अथवा परिचिताचं घर आहे का याचा शोध घेतला जायचा. मुंबईतल्या आमच्या घरी ‘चार दिवस उतरायला’ नात्याचीच नव्हे, तर त्यांच्याही परिचयाची मंडळी यायची. काळ बदलला आणि आधी लॉजिंग, बोर्डिंग मग साधी हॉटेल आणि नंतर ‘स्टार’ हॉटेलं सर्वत्र शहरीकरणाबरोबर वाढली. मग ‘उतरणारी’ मंडळी कंपनीच्या खर्चाने वगैरे तिथे जाऊ लागली. देश-विदेशातील प्रवासात कुठे राहाल याची जाहिरात पर्यटकांना खुणावू लागली.

परंतु ही सारी औटघटकेच्या पाहुणचाराची किंवा वस्तीची वार्ता पृथ्वीवरची. तिकडे दूर अंतराळात ‘आपलं’ म्हणजे माणसाचं कोण असणार? तसं कोणी नाहीच. त्यामुळे तिथे राहायचं तर आपली सोय आपल्यालाच करायला हवी हे माणसाला उमगलं. 1958 मध्ये युरी गागरीन समस्त मानवजातीचं प्रतिनिधित्व करत अंतराळात जाणारा पहिला माणूस ठरला आणि चंद्र पादाक्रांत करण्याचा मान नील आर्मस्ट्राँग यांना मिळाला. ही केवळ सुरुवात होती.

आता अंतराळ माणसाला साद घालत होतं आणि आव्हानही देत होतं. अंतराळात पृथ्वीभोवती ‘चक्कर’ मारून येणे याचे अप्रूप राहिले नव्हते. मानवरहित कृत्रिम उपग्रह ती कामगिरी बजावतच होते. आता चंद्रावर, मंगळावर मोठी यानं पाठवून तिथली दगड-माती आणून आणि त्या नवभूमीचा अभ्यास करून तिथे उद्याची वस्ती निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा माणसाच्या मनात निर्माण झाली होती.

या दुर्दम्य इच्छेला जोड होती अथक वैज्ञानिक संशोधनाची. रशिया, अमेरिका या देशांप्रमाणेच युरोपीय स्पेस एजन्सी तसेच चीन, जपान, हिंदुस्थान, इंडोनेशिया असे अनेक देश हळूहळू अंतराळ स्पर्धेत आपले स्थान निर्माण करत होते. सुरुवातीच्या काळात फक्त रशिया आणि अमेरिकेत याबाबतची चढाओढ होत असताना अंतराळ स्थानकाची कल्पना पुढे आली. पृथ्वीपासून जवळच्या परंतु वजनरहित कक्षेत एखादं कृत्रिम यान काही दिवस राहण्यासाठी वापरावं या कल्पनेला मूर्त स्वरूप प्रथमतः तत्कालीन यूएसएसआर पिंवा आजच्या रशियानेच दिले. त्यांची ‘सॅल्यूत’ ही अल्मॅझ मालिकेतली सात यानं अंतराळात काही काळ स्थिरावली. त्यावर काम करणाऱया अंतराळयात्रींसह काही संशोधक अंतराळयात्रीही ‘चार दिवस उतरून’ म्हणजे राहून, काम करून आणि पाहुणचार घेऊन गेले. ही 1973 मधली गोष्ट. त्यावर कधी सहा तर सॅल्यूत-2 वर चोवीस दिवसांचा मुक्काम अंतराळयात्रींनी केला. शेवटी सॅल्यूत-7 वर बावीस जणांची वस्ती झाली. रशियाच्याच मीर अंतराळ स्थानकाने तर 1986 ते 2001पर्यंत साडेचार हजार दिवसांत तब्बल 125 अंतराळयात्रींचं स्वागत केलं.

अमेरिकेचं ‘स्कायलॅब’ अंतराळ स्थानक 14 मे 1973 रोजी अंतराळात गेले. अडीच हजार दिवस तिथे राहिले. त्यावर 171 दिवसांत नऊ अंतराळयात्री राहून आले. बूस्ट न करता आल्याने स्कायलॅब कक्षाक्षय (ऑर्बिट डिके) होऊन पश्चिम ऑस्ट्रेलियाजवळ हिंदी महासागरात 11 जुलै 1979 रोजी कोसळलं. याशिवाय इतर काही अंतराळ स्थानपंसुद्धा अवकाशात पाठवली गेली.

मात्र गेली बावीस वर्षे उत्तम कामगिरी करणारं ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ 20 नोव्हेंबर 1998 रोजी अंतराळात गेले. 73 मीटर लांबी, 109 मीटर रुंदीचं हे यान ताशी 27 हजार 600 किंवा सेकंदाला साडेसात किलोमीटर या वेगाने पृथ्वीभोवती अव्याहत फिरत आहे. पृथ्वीला रोज 16 परिक्रमा करणाऱया या स्थानकावर 7325 दिवसांत सुमारे 90 अंतराळयात्री विविध वैज्ञानिक प्रयोग करून आलेत. त्यात सुनीता विल्यम्सही आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोप आणि कॅनडा या पाच देशांच्या संयुक्त प्रकल्पाने तिथे शैक्षणिक, जैविक, शेतीविषयक, थ्रीडी प्रिटिंगसारखे तंत्रज्ञानाचे असे शेकडो प्रयोग केलेत. हे माणसांचं मोठं यश आहे. हिंदुस्थानही 2030पर्यंत आपलं अंतराळ स्थानक अवकाशात पाठवणार आहे. आता या स्पर्धेत कोणालाच मागे राहता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या