मुद्दा – इंटरनेटच्या व्यसनाचा आरोग्यावर दुष्परिणाम

>> वैभव मोहन पाटील

आज आपल्या अवतीभवती जर आपण पाहिले तर लहान मुलांपासून ज्येष्ठांच्या, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याचे दिसून येते. इंटरनेटच्या मायाजालात अवघा देश गुंतला असल्याचे आपणांस पाहायला मिळते. दररोज मोफत इंटरनेट सेवा पुरविणाऱया कंपन्यांमधील चढाओढ व ते इंटरनेट वापरण्यामधील लोकांची चढाओढ यातच सर्वांचा अधिक वेळ खर्ची होत आहे. मात्र वेळ वाया जाण्याव्यतिरिक्त मोबाईल व इंटरनेटचा सर्वात जास्त परिणाम लोकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होत आहे. मोबाईल व घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे ‘इंटरनेट ऑडिक्शन’ अर्थात ‘इंटरनेट’चे व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. इंटरनेट सायबर कॅफेच्या मर्यादित वापराऐवजी मोबाईलमध्ये व घरोघरी इंटरनेट घेण्याचा कल वाढत आहे. इंटरनेटचा वाढता वापर चिंतेत भर घालणारा असून कॉम्प्युटर, मोबाईल अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिड, अतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन-चार वर्षांपूर्वी प्रतिदिन तीन-चार तास ब्राऊझिंग करणारी शाळा, महाविद्यालयीन मुले आज इंटरनेटच्या चक्रव्यूहात पुरती अडकली असून त्यांना आज ‘इंटरनेट’चे व्यसन लागले आहे. या व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ती पुरती अडकली आहेत. जिज्ञासेपोटी लागलेल्या आवडीचे रूपांतर हळूहळू व्यसनात झाल्याने अनेक तरुण मानसिक आजारांकडे झुकत असल्याचे चिंताजनक चित्र सर्वत्र आहे. सामान्यतः प्रत्येकाला ‘इंटरनेट’ची गरज भासते. मात्र, नोकरी अथवा उद्योगधंद्याच्या निमित्ताने वयाच्या विशीत अथवा तिशीत हे व्यसन लागण्याचे प्रमाण अधिक आहे.

‘स्टॅनफोर्ड विद्यापीठा’च्या अभ्यासात 14 टक्के तरुण ‘इंटरनेट’च्या व्यसनापायी शाळा, काम, कुटुंब, झोप आणि जेवण यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले, तर ‘इंटरनेट ऑडिक्ट’ झालेले तरुण एका आठवडय़ात तब्बल 40 तास ऑनलाइन राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजार आज डोके वर काढताना दिसत असून या आजारांचे रुग्ण आपल्याला अवतीभवती अधिक प्रमाणात आढळून येत आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक तणाव हा आयुष्यातील एक भाग बनला आहे. खासकरून दैनंदिन जीवनपद्धतीत विविध कारणांनी तणावाची स्थिती ही एक सामान्य समस्या झाली आहे. मात्र हाच तणाव आरोग्याशी संबंधित विविध आजार वाढण्यास मदत करतो. तणावामुळे मधुमेह, लठ्ठपणा, अस्थमा आणि पोटासंबंधित आजार बळावतात. काही अभ्यासातून असेही समोर आले आहे की, काही ठिकाणी कामाचा तणाव फार अधिक असतो. नुकत्याच एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, अन्य विकसित देशांच्या तुलनेत 82 टक्के हिंदुस्थानी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावाखाली जगत असतात. या कारणामुळे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कामकाजासह अन्य गोष्टीसुद्धा यामध्ये सहभागी आहेत. सार्वजनिक, व्यक्तिगत व कौटुंबिक कारणांनी तणाव निर्माण होत असण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचसोबत वाढत्या तणावाच्या कारणांमध्ये सोशल मीडिया, वर्क लाईफ आणि शेजाऱयांसोबत वादसुद्धा येतात. तज्ञांचे असे मानणे आहे की, इंटरनेट ऑडिक्ट लोकांमध्ये वायफाय अचानक बंद झाल्यास संताप व्यक्त केला जातो. फोन चार्ंजगवरून काढून टाकल्यास काही लोकांना खूप राग येतो. त्यामुळे अशा छोटय़ा-मोठय़ा कारणांमुळे तणावात अधिक वाढ होते. तज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या तणावाची मर्यादा विविध आहे. तणावाचा परिणाम आरोग्यावर भयंकर होतो. तणावामुळे चयापचय स्थितीतसुद्धा बिघाड होतो. मात्र जर तुम्हाला तणावापासून दूर राहायचे असेल तर सकाळी चालायला जाणे, मेडिटेशन करणे, आवडीच्या ठिकाणी प्रवास करणे किंवा योगासने करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मोबाईलचा गरजेपुरताच वापर करणे श्रेयस्कर आहे. अनावश्यक चॅटिंग, सार्ंफग, विविध ऑप्लिकेशनचा अतिवापर शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक आहे. येत्या काळात मोबाईल व इंटरनेटच्या मायाजालातून विद्यार्थी व तरुण पिढीला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. या समस्येवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर उद्याची संपूर्ण पिढी इंटरनेट ऑडिक्ट म्हणून गणली जाईल व त्याचा विपरीत परिणाम देशाच्या आरोग्यमानावर होईल एवढे नक्की.

आपली प्रतिक्रिया द्या