परीक्षण- मेंढपाळ संस्कृतीची ओळख

>>डॉ. व्ही.एन. शिंदे

[email protected]

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कर्मावरून जाती आल्या. कर्म इतके चिकटून बसले की इंग्रज आले, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे सर्व जाती-पंथांना खुली केली तरी परंपरागत व्यवसायाला चिकटून बसलेली मंडळी आजही तो सोडायला तयार होत नाहीत. धनगर समाज असाच एक समाज. आजही मेंढय़ा पाळणारा, शेळ्या पाळणारा, काही दिवस गावात आणि एरवी भटकंती करणारा हा समाज. मात्र या समाजातील तरुण आज या व्यवसायात उरलेले नाहीत. त्यातील अनेकांनी शिक्षण घेऊन नोकरी-धंद्यात आपला चांगला जम बसवला आहे. अशा या कालखंडात पन्नासेक वर्षांपूर्वीच्या एका मेंढपाळ समाजाची, या गावाची संघर्षगाथा सांगणारे पुस्तक रावसाहेब पुजारी यांनी लिहिलेले `कातरबोणं’ हे पुस्तक वाचावयास मिळाले. या पुस्तकाला कादंबरी असे म्हटले असले तरी या पुस्तकातून धनगर समाज, समाजातील रीतिरिवाज, चालीरिती, प्रथा, परंपरा यांचे दर्शन घडते.

प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. कातरबोणं म्हणजे मेंढय़ांची लोकर काढण्याचा विधी. या समाजाची मुख्य ओळखच जणू यातून व्यक्त होते. याखेरीज हिरवट, दरखदारी, खंडी, मेंढक, उसाबऱया असे अनेक शब्द येतात. ही कादंबरी तशी ठोकळेबाज साच्यातली नाही. यामध्ये अनेक कथानके येतात. पात्रे बदलत राहतात. सूत्र मात्र एकच आहे, मेंढपाळ समाज संस्कृतीचे दर्शन. यामध्ये आलेली बिरा धनगराची गोष्ट ही अशीच एक छान कथा. बिरा धनगराने घोंगडे भिरकावले की पाऊस पडतो आधी लोकांची धारणा होते. मात्र एकदा अनेक दिवस पाऊस पडत नाही. लोक त्रस्त होतात. त्यानंतर बिरा धनगर देवाची आळवणी करतो. तरीही पाऊस पडत नाही. तोही इरेला पडतो आणि पाऊस पडल्यावरच वसा सोडतो. धनगर समाजात असणारा बिरोबा देवाचा दरारा आजही तसाच कायम आहे.

अनेक कथांची अशी छान गुंफण या पुस्तकात केली आहे. धनगर समाज तसा काटक, रानावनात फिरणारा, अंगावर आले तर शिंगावर घेणारा. रामोशांनी मेंढरे चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हुशारीने ते त्यांचा डाव उधळून लावतात. त्या वेळी हातघाईची वेळ येते. रामोशी जखमी होतात, पण पळून जाण्यात यशस्वी होतात. या प्रकरणात धनगर समाज किती सावध असतो आणि प्रसंग किती हुशारीने हाताळतो, हे लक्षात येते.

किसनाचे लग्न हे एक असेच प्रकरण आहे. आई-बापालाही पोराचे लग्न व्हावे, असे वाटत होते. मात्र कोणीच मनावर घेत नव्हते. शेवटी कारभारी किसनाच्या लग्नाचे मनावर घेतो. तो सांगतो तेव्हा सर्वजण मुलगी पाहायला जातात आणि मुलगी ठरवून येतात. आठ दिवसांच्या आत मुलीकडचे येतात आणि लग्न होते. धनगर समाजातील लग्न कसे असते हे समजून घेण्यासाठी हे प्रकरण मुळापासून वाचायला हवे. पुढे किसना आपला व्यवसाय कसा वाढवतो, कातरबोणं झाल्यानंतर आपण दागिना घ्यावा, असे किसनाच्या बायकोला वाटत असते. कातरबोणं होते. भरपूर पैसे मिळतात. किसना आणि त्याची बायको दागिना घेण्यासाठी सराफाच्या दुकानात जातात. त्या वेळी किसनाच्या बायकोची द्विधा मन:स्थिती होते. दागिना घ्यावा की मेंढरे वाढवावीत हा विचार तिच्या मनात येतो. किसना तिची समजूत घालून दागिना घेतो. मात्र त्याची बायको टिंगरी उदास होते. एका संवेदनशील गृहिणीचे मन तिला अस्वस्थ करते.

या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे या समाजातील मनोरंजन संसाधने. यामध्ये अनेक ठिकाणी धनगर गीतांचा संदर्भ येतो. अवजड धनगरी ढोल आणि त्याच्या जोडीला `सुंबरान मांडलं गा, सुंबरानं मांडलं…’ ही गीते. यामध्ये विविध देवांची आळवणी, विविध घटनांवर, प्रसंगावर भाष्य येते.

धनगर समाजातील सर्व टप्प्यांचे या पुस्तकामध्ये सविस्तर दर्शन वाचावयास मिळते. अगदी मेंढय़ांच्या गणतीपासून, शेळीच्या बाळंतपणापर्यंत सर्व काही समजून घेता येते. जिवबा चव्हाणाच्या म्हातारीची शेळी अडते आणि म्हातारी काळजीत पडते. अडलेल्या शेळीची सोडवणूक सोमण्णाशिवाय कोणीच करू शकत नाही, हे तिला माहीत असते. शेळी पाहताच तिच्या पोटात दोन पिल्ले आहेत हे सोमण्णाची अनुभवी नजर ओळखते. पहिलटकरीण, त्यात दोन पिल्ले पोटात असणाऱया पाटीची सोडवणूक कसब असलेला हात कशी करतो हे समजून घ्यायला पुस्तकच वाचायला हवे.

पुस्तकामध्ये कथासूत्र सलग असते तर हे पुस्तक आणखी वाचनीय झाले असते असेच वाटते. तसे नसले तरी या पुस्तकाला ललित लेखनाचा बाज आला आहे. मेंढपाळ समाजावरील एक प्रदीर्घ ललित लेख, धनगरवाडी या गावाचे ललित वर्णन असेच या पुस्तकाचे स्वरूप बनले आहे. मात्र एका समाजाचा पट, त्या समाजाची बोली, प्रथा, परंपरा, त्यांचे निसर्गाशी जोडले गेलेले नाते, भावभावना, त्यांची फिरस्ती, दैनंदिन व्यवहार या सर्वांची तपशीलवार माहिती या पुस्तकातून आपणास समजून घेता येते. त्यांचे विश्व हे शेतीपासून जनावरांपर्यंत जोडले गेले आहे. जनावरात शेळ्या आणि मेंढय़ाच्या जोडीला घोडी व कुत्रीही येतात. विशेषत: ग्रामीण शेतकरी जीवन ज्यांनी अनुभवले आहे, त्यांचे या पुस्तकासोबत जोडले जाणे, अत्यंत स्वाभाविक बनते.

यामध्ये मेंढपाळ समाजाचे खऱया अर्थाने जीवन चित्रीत केले आहे. हा कालखंड ऐंशीच्या आधीचा आहे. यामध्ये मोबाईलसारख्या आधुनिक संवाद साधनांचा उल्लेख नाही. अगदी ऐंशीनंतर अनेक मेंढपाळांच्या हातात दिसणारा रेडिओही आलेला नाही. लेखकानेही ही धनगरवाडय़ाची गाथा असल्याचे नमूद करून कालखंड हा 1972 च्या दरम्यानचा असल्याचे मनोगतामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे अस्सल मेंढपाळाच्या संस्कृतीचे दर्शन हे पुस्तक घडवत राहते. भाषा अभ्यासकांना, बोली अभ्यासकांना हे एक सुंदर पुस्तक आहे.

कातरबोणं 

लेखक : रावसाहेब पुजारी

प्रकाशक : तेजस प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे : 160 ह मूल्य ः 300 रुपये