
डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी ([email protected])
गजबजलेलं बौद्धिक आयुष्य जगलेली विदुषी, जिच्या नावाभोवती एक दूरस्थ कुतूहल दाटून राहिलेलं आजही दिसतं..अशा बुद्धिमती इरावती कर्वे!
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात किती बुद्धिमती स्त्रियांनी जन्म घेतला, ज्यांच्या बुद्धीचं तेज आणि व्यक्तित्त्वाची झळाळी आजही अम्लान आहे. इरावती कर्वे हे त्यातलं महत्त्वाचं नाव. कुणी त्यांचा उल्लेख ‘दीपमाळ’ असा केला, तर कुणी त्यांना ‘चैतन्याची समर्थ वेल’ म्हणून त्यांचा यथोचित गौरव केला. या नावाभोवती एक दूरस्थ कुतूहल दाटून राहिलं आहे. 1905 मध्ये ब्रह्मदेशातला जन्म. तिथल्या ‘इरावड्डी’ नदीवरून ठेवलेलं त्यांचं नाव. वयाच्या अवघ्या 6-7 व्या वर्षी पुण्यात शिक्षणासाठी राहणं. रँग्लर परांजपे यांच्या घरी झालेले साहित्य, संस्कृतीचे संस्कार आणि अभिरुचीची घडण 1928 मध्ये एम.ए. झाल्यावर थेट बर्लिन विद्यापीठात मानववंशशास्त्र विषयात पीएच.डी. (1931). हे सारं काळाचा विचार करता अद्भुत वाटावं असंच.
इथं जेव्हा मुलींच्या उच्च शिक्षणाच्या आणि अर्थार्जनाच्या गरजेच्या चर्चा चालू होत्या, विभावरी शिरुरकर ‘कळ्यांचे निश्वास’ लिहून प्रौढ कुमारिकांचे प्रश्न मांडत होत्या, तेव्हा ही समर्थ स्त्राr जर्मनीमध्ये अनोख्या विषयात संशोधन करत होती. ‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची अरूप प्रमाणता’ या विषयावर
पीएच.डी. करत होती भारतातली ही पहिली स्त्राr मानववंशशास्त्रज्ञ. पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्राध्यापक, नंतर विभागप्रमुख. स्त्राr-अभ्यास हे स्वतंत्रपणे ज्ञानक्षेत्र म्हणून उदयाला येण्यापूर्वीच स्त्राr-संवेदनेचा विचार करणारी लेखिका. त्यांची काही विधानं आजही चिंतन करावं अशी आहेत. ‘एकत्र कुटुंबाचे फायदे-तोटे फक्त विधवांना माहीत.’ ‘मुंडण केलेली विधवा एक प्रेत म्हणून वावरत असते…’ अशासारखी त्यांची वाक्ये स्त्राrविषयक कळवळ्यातून आणि समाजनिरीक्षणातून जन्मली आहेत. ‘बायांनो अगं, पुरुषांशी समान हक्कांसाठी काय भांडता…जास्त हक्कांसाठी भांडा’ असं त्या म्हणत तेव्हा त्यामागे स्त्राr-पुरुष नात्यातील गुंतागुंतीची त्यांना असणारी जाणीव दिसते.
माणसाविषयी त्यांना चौफेर कुतूहल होतं. संस्कृतीविषयी डोळस आस्था होती. त्यांना वेद, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी आणि प्रमुख पाश्चात्य तत्त्वज्ञ यांचा वैचारिक गाभा माहिती होता. महाभारत आणि रामायण यांचा सखोल व्यासंग होता. म्हणूनच ‘युगांत’सारख्या मौलिक ग्रंथ निर्माण झाला. ललित सौंदर्य, सामाजिक आणि सांस्कृतिक आशय आणि मूल्यविचार या पातळ्यांवरून केलेलं त्यातील विवेचन अत्यंत मौलिक आहे.
त्या महर्षी कर्व्यांच्या सुनबाई. घरात कर्वे घराण्याचा समाजकार्याचा वारसा असूनही त्या वाटेनं न जाण्याचा ठामपणा त्यांनी दाखवला. ‘मी समाजाचे जे देणे लागते, ते माझ्या विषयातील संशोधनाद्वारे फेडते’ असं त्या म्हणत.
‘ललितगद्य’ या साहित्यप्रकाराला त्यांनी नवा आकृतिबंध दिला. ‘जन्मांतरीची भेट’, ‘आजोबा’, ‘दुसरे मामंजी’ या त्यांच्या लेखांनी त्यांचं नाव ललितलेखिका म्हणून ठळक झालं. ‘परिपूर्ती’ हा त्यांचा लेख तर आजही वाचकप्रियता राखून आहे. इरावतींच्या अभ्यासक उषा कोटबागी यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच ‘ललितगद्याच्या उगमापाशी इरावती पाय रोवून डौलानं उभ्या आहेत.’ ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजल’ या त्यांच्या पुस्तकातून उत्कट संवेदना आणि अंतर्दृष्टी यांचा प्रत्यय येतो. विचार जिथे सुरू झाला तिथूनच थेट लेखाची सुरुवात. उगाच कृत्रिम, आकर्षक सुरुवाती वगैरे नाही. बाह्य सजावटी नाहीत. आस्वाद आणि चिंतन असं एकत्रच आहे तिथे.
लोक, त्यांच्या परंपरा, चालीरीती, भाषा या सर्वात त्यांना विलक्षण रस होता आणि सूक्ष्म निरीक्षण होतं त्यामुळे त्यांचं अभ्यास-लेखनही केवळ कोरडं संशोधनपर लेखन राहिले नाही. भारतीय संस्कृतीकडे डोळसपणे बघणाऱया विदुषी होत्या त्या. ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘धर्म’ इत्यादी पुस्तकं हा त्याचा अनुषंग. त्यात एक हृद्य उमाळा जाणवतो. त्यांच्या अभ्यास-विषयावर त्यांनी इंग्रजीमधून भरपूर लेखन केलं. असंख्य शोधनिबंध लिहिले.
हिंदू कोड बिलाबाबत भारत सरकारने त्यांचं मत आजमावलं होतं. ‘स्वतंत्र महिला विद्यापीठाची आता आवश्यकता नाही,’ असं त्यांनी परखडपणे म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रण ही अत्यावश्यक बाब आहे, हे त्यांनी कितीतरी वर्षांपूर्वी सांगितलं होतं आणि कुटुंब नियोजनाचं पहिलं केंद्र के.ई.एम. रुग्णालयात काढायला लावलं होतं. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या आपल्या संशोधन कार्यक्षेत्रात रमल्या होत्या. भरपूर प्रवास, त्यात परदेश प्रवासही आलेच, परिषदा, व्याख्याने, परिसंवाद यांनी गजबजलेलं बौद्धिक आयुष्य त्या जगल्या आणि मराठी वाचकांसाठी सुंदर लेखन करून ठेवलं.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)


























































