अंतराळ युगाचे जनक

121

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक, ’इस्रो’चे संस्थापक दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांची नुकतीच शंभरावी जयंती साजरी करण्यात आली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, विक्रम साराभाई स्पेस सेंटर अशा देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत विक्रम साराभाई यांचा मोलाचा वाटा होता. हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्याविषयी तमाम हिंदुस्थानींना नितांत आदर आहे. ज्येष्ठ अंतराळ संशोधक आणि इस्त्र्ााsचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी विक्रम साराभाई यांच्या कर्तृत्वाबद्दल व्यक्त केलेल्या या भावना…

चांद्रयान – 2 च्या निमित्ताने आता पुन्हा एकदा इतिहासाचे नवे पान हिंदुस्थान आणि इस्त्रोच्या नावाने लिहिले जाईल. असे नवे अध्याय लिहिले जाण्याची ही पहिली वेळ नसली तरी चांद्रयान मोहिमेची उत्सुकता अगदी वेगळी आहे. या चांद्रयान अभियानाची आणि पर्यायाने भारतीय संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली ती होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या पुढाकाराने.

हिंदुस्थानसारख्या मोठय़ा देशाचा विकास झपाटय़ाने करायचा असेल तर अवकाश तंत्रज्ञान आवश्यक आहे, हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांनी ओळखले होते. म्हणूनच 1947 साली त्यांना विरोध होऊनसुद्धा त्यांनी केरळमधील एका थुम्बा या छोटय़ा गावात पहिले रॉकेट सेंटर उभे केले. असे द्रष्टे, हुशार आणि उत्तम व्यवस्थापक आपल्या देशाला लाभले हे आपले भाग्य आहे. त्यांनी पाहिलेले अवकाश संशोधनाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्याचा फायदा आज हिंदुस्थानला होतो आहे. चांद्रीय आणि आंतरग्रहीय मोहिमांकडे आपण लक्ष वळविले आहे.

विक्रम साराभाई यांनी अवकाश संशोधनात जे काम केले त्यामध्ये पुढेही सातत्य कसे राहील यासाठी त्यांनी हिंदुस्थानातील शास्त्रज्ञांची खूप मोठी टीम उभी केली. त्यांचे खंबीर नेतृत्व आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आज देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा आहे असेच मी म्हणेन. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल जगाने घेतली आणि चंद्रावरील विवराला विक्रम साराभाई यांचे नाव दिले ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांचे योगदान जगाने मान्य केले आहे. त्यामुळेच त्यांना अंतराळ युगाचे जनक म्हणतात.

विक्रम साराभाई यांचे वडील उद्योजक होते. त्यांचा राजकारणी लोकांशी संबंध होता. मात्र विक्रम साराभाई यांना पहिल्यापासून शास्त्रज्ञ ह्यायचे होते. त्यांचे गणित आणि भौतिक शास्त्र हे आवडीचे विषय. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ते पुढे इंग्लंडमध्ये केम्ब्रिजला शिकायला जात. पण त्याचवेळी दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने त्यांना हिंदुस्थानात यावे लागले. बंगळुरूला सी. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. कॉस्पिक किरण असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. पुढे 1947 साली ते पुन्हा ब्रिटनला गेले. आपले संशोधन पूर्ण करून पीएच.डी. घेऊन ते मायदेशी आले. त्यांनी अहमदाबाद येथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. त्यानंतर विक्रम साराभाई यांनी वेगवेगळय़ा अशा सात संस्था स्थापन केल्या. पुढे मुंबईला डॉ. भाभा यांच्याकडे ते काही कामांसाठी गेले. तिथून त्यांच्या अवकाश संशोधनाची सुरुवात झाली. त्यांनी केरळजवळ थुम्बा या गावी पहिले रॉकेट सेंटर उभे केले. तिथून पृथ्वीची मॅग्नेटिक इक्विटेर लाइन जाते त्यामुळे हे ठिकाण त्यांनी निवडले. अवकाश क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी या लाँचिंग सेंटरची उभारणी केली. त्यांना केरळ सरकारची मदत मिळाली नाही. मात्र जवळच एका चर्चच्या बिशपकडून त्यांना मदत मिळाली. त्या चर्चमध्ये विक्रम साराभाई यांनी इस्रोचे ऑफिस थाटले. त्याकाळी ए. पी. जे. अब्दुल कलाम, वसंत गोवारीकर हे शास्त्रज्ञ त्यांच्यासोबत होते. शास्त्रज्ञ हेरण्याची कला त्यांच्याकडे होती. रॉकेट लाँच करण्यासाठी ते स्वतः सायकलवरून घेऊन जायचे. समुद्राच्या किनारी एका ठिकाणावरून ते 1963 साली आकाशात सोडले. त्यानंतर विक्रम साराभाई यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. तो दिवस इस्रोसाठी ऐतिहासिक ठरला.

अवकाश तंत्रज्ञानासाठी चार गोष्टी लागतात. त्या म्हणजे रॉकेट डेव्हलप, उपग्रह, भूकेंद्र, अवकाश तळ हे सर्व साराभाईंनी विकसित केले. अवकाश तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी असावे असे ते नेहमी म्हणायचे. त्याप्रमाणे त्यांनी ते तयार करून त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना करून दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे इस्रोचे स्वतःचे अवकाश तळ आहे. आज 40-45 उपग्रह कार्यरत आहेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रूप, विक्रम साराभाई स्पेस सेंटर या देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत विक्रम साराभाई यांचा मोलाचा वाटा होता. म्हणूनच त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी 1962 साली शांती स्वरूप भटनागर पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. असे हे विक्रम साराभाई खूप हुशार आणि द्रष्टे होते. ते एक मिनिटसुद्धा कधी वाया घालवत नसत. प्रवासात असले तरी त्यांच्या पीएला काहीतरी लिहून घ्यायला सांगायचे. मनात काम करत असायचे. विक्रम साराभाई, डॉ. भाभा आणि सतीश धवन ही देशाला मिळालेली महान रत्ने आहेत असेच मी म्हणेन.

– शब्दांकन: मेधा पालकर

(लेखक इस्रोचे माजी संचालक आहेत)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या