लेख – ठसा – जगदीश अभ्यंकर

>> प्रशांत गौतम

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि बहुआयामी लेखक, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी जगदीश अभ्यंकर यांच्या निधनामुळे आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. गंगापूर तालुक्यात नेवरगाव येथे 20 ऑगस्ट 1942 रोजी जन्म झालेल्या अभ्यंकरांचा प्रवास 79 व्या वर्षी थांबला. जगदीश यांनी गावी शिक्षणाची सोय नसल्याने आधी हैदराबाद आणि नंतर संभाजीनगर येथे आपले शिक्षण पूर्ण केले.

विद्यापीठात रुजू झाल्यावर आपल्यावरील कौटुंबिक जबाबदारी पार पाडत लेखनाची आवड जोपासली. लेखनासोबत पत्रकारिता असावी यादृष्टीने त्यांनी विद्यापीठात बी.जे.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. साहित्यात त्यांनी एम.ए. यशस्वी गुणांनी केले होते. साहित्य-पत्रकारितेची आवड जोपासत असतानाच त्यांनी आपल्यातील लेखक हा गुणविशेष जपला. नुसता जपला असे नाही, तर विविध वाचनांनी हा गुणविशेष बहुश्रुत केला. विविध विषयांवरील लेखनाची त्यांना आवड होतीच. याच आवडीमधून त्यांची अठरा पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील ‘निळय़ा नभाचे नायक’ या साहित्यकृतीस राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्य पुरस्कार लाभला. जगदीश अभ्यंकर यांच्या लेखनाचे विषय प्रामुख्याने ग्रामीण जीवन, शेतकरी, निसर्ग, पर्यावरण, पक्षी जीवन, सामाजिक विषय असेच राहिले.

संभाजीनगर मनपाने त्यांचा गुणवंत नागरिक म्हणून सन्मान केला होता. सेवानिवृत्तीनंतरचा बराच काळ त्यांनी आपल्या आवडीच्या छंदासाठी व्यतीत केला. शिवाय मित्रपरिवार हा विविध क्षेत्रांत होता. विविध सामाजिक कार्यक्रमांतही त्यांचा सहभाग सातत्यपूर्ण राहिला. या सर्वच गुणविशेषांसोबत अभ्यंकर यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक जलतरणपटू, खेळाडू, वक्ता, अभिनेता, फोटोग्राफी असे गुण त्यांनी जोपासले. कोरोना काळात मिळालेला बराच वेळ त्यांनी व्यंगचित्र रेखाटण्यात घालवला. अभ्यंकर यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सामाजिक कार्यकर्ता दडलेला होता.

सामाजिक कार्याची तर त्यांना आवड होतीच. मृत्यूपूर्वी अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मूळ गावी जाऊन गरजवंत लोकांना वस्तू स्वरूपात मदत केली. विविध सामाजिक घटकांत जाणीव ठेवून यथाशक्ती मदतीचा हात कुणाला काही कळू न देता पोहचवत असत. भगवद्गीतेतील कर्मयोग्याप्रमाणे त्यांनी मृत्यू स्वीकारला. त्यांनी आम्हाला सकारात्मकतेच्या मार्गावरून ज्याण्याचे संस्कार केले, असे त्यांची कन्या ज्योती थत्ते यांनी आपल्या बाबांसंदर्भात भावना व्यक्त करताना सांगितले. कोरोना काळात आपण आपल्या परिसरातील अनेक जिवाभावाचे, जवळच्या नात्यातील परिचित गमावले. विविध क्षेत्रांतील दिग्गज कोरोनाच्या तडाख्याने आपल्यातून गेले. अशातच जगदीश अभ्यंकर यांचे कोरोनामुळे झालेले निधन नक्कीच क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली ती मात्र भरून येणार नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या