
>>राजेश वैद्य
‘जाऊ तिथं खाऊ ‘ म्हणणाऱ्या खव्य्यांना कुठेही गेलं की तिथली चव चाखण्याची वेगळीच हौस असते. तेच काय , अगदी आपणही नव्या ठिकाणी फिरायला गेलो की, तिथली खासियत आवर्जून विचारुन बघतो. मग ती पुण्याची मिसळ असो किंवा मुंबईचा वडापाव. नव्या ठिकाणच्या खास पदार्थांची लज्जत चाखण्याची आवड आपल्यामधील बऱ्याच जणांना असते. नाही का? अशा वेळी परदेशात जाण्याचा योग आल्यावर तिथल्या नव्या चवीची ओढ लागणं साहजिकच आहे.हिंदुस्थानातल्या खाद्यपदार्थांची जुजबी माहिती असल्यामुळे इथले पदार्थ आपण सहज चाखून बघतो. पण परदेशातल्या पदार्थांची आपल्याला फारशी ओळख नसते. म्हणूनच तर तिथे गेल्यावर इच्छा असूनही आपण हात राखून जमेल तेच मागवतो आणि नेमकं तिथल्या अस्सल चवीला मुकतो. मग अशा वेळी जपानसारख्या देशात जाण्याचा योग आला तर ?
जपानमधील टोकियो शहर तर ‘सर्वोत्कृष्ट फूड सिटी’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक बाबतीत परिपूर्णता आणणारे जपानी लोक खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी कसे काय मागे राहतील? वेगवेगळी खाद्यसंस्कृती आत्मसात करुनही जपानने आपल्या परंपरेची कास मात्र घट्ट धरुन ठेवली आहे. अशा देशाची खाद्यभ्रमंती करणं म्हणजे खव्य्यांसाठी पर्वणीच. पाहणाऱ्यालाही खावंसं वाटेल असं पदार्थांचं सादरीकरण तिथं केलं जातं. बऱ्याचश्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये तर तुमच्यासमोर पदार्थ बनवून वाढण्यात येतो. जपानच्या प्रत्येक गोष्टीत अशी खासियत पाहायला मिळते. बऱ्याचदा इतर देशांच्या खाद्यपदार्थांची नावं ऐकून आपण नाक मुरडतो. ‘ सुशी ’ हा जपानमधील असाच एक लोकप्रिय खाद्यप्रकार. मासे साठवता यावे म्हणून केलेली ही क्लुप्ती आज जपानमध्ये फास्ट फूडचा प्रकार म्हणून खास ओळखली जाते. व्हिनेगरमध्ये मुरवलेला भात एका विशिष्ट आकारात विविध भाज्यांसह आणि ताज्या माश्याच्या तुकड्यासहित तुमच्या ताटात सुशी म्हणून सर्व्ह केला जातो.+

आपल्याहिंदुस्थानी लोकांप्रमाणेच जपानी लोकांच्या जेवणातही सर्रास भात पाहायला मिळतो. तेथील भात थोड्याबहुत प्रमाणात चिकट असल्याने आपल्याला चॉपस्टिक्सशिवाय पर्याय उरत नाही. नानाविध तऱ्हेच्या ‘ जॅपनीज राईस ‘ सह खाण्यासाठी कितीतरी प्रकारच्या ‘जॅपनीज करींचे ‘ प्रकार तिथे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे ‘मासे आणि भात’ या भन्नाट कॉम्बिनेशनची सवय असलेलाहिंदुस्थानी माणूस जपानच्या खाद्यभ्रमंतीत नक्कीच रमेल. जपानी माश्यांविषयीची एक गंमत म्हणजे, तिथे ‘ फुगु ‘ नावाचा विषारी मासा जेवणात खाल्ला जातो. विशेष म्हणजे , मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तर ह्या माश्यापासून पदार्थ बनवण्यसाठी खास स्वयंपाकी नेमलेले असतात. तिथे धाडस अनुभवण्यासाठी म्हणून बरेच जण ह्या माश्याचे सेवन करतात.

हिंदुस्थानी माणसाला आपलेसे वाटतील असे क्वचित खाद्यप्रकार जपानमध्येही पाहायला मिळतात. जपानमध्ये असताना भजी खाण्याची लहर आली तर ‘ तेंपूरा’ नावाचा भजीसारखा अतिशय चविष्ट खाद्यप्रकार तिथे चाखायला मिळतो. आपल्यासाठी ती जपानी वांगी मुळ्याची भजीच म्हणता येईल. जपानी खाद्यपदार्थांविषयी सांगताना ‘रामेन’ चा उल्लेख आवर्जून करायला हवा. आपल्याकडील दोन मिनिटात बनणाऱ्या प्रचलित मॅगीसारखाच हा प्रकार. अर्थात ‘सूपी नूडल्स’. जपानी लोकांचं हे अगदी आवडीचं खाणं. जपानमध्ये बऱ्यापैकी मांसाहार खाल्ला जात असला तरी शाकाहारी लोकांची तिथे पंचाईत होत नाही. कारण भाज्यांचा वापर केलेले बरेचसे खाद्यपदार्थ तिथे सर्रास पाहायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ’ओकोनोमीयाकी ’. हा शाकाहारी खवय्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो. जपानी कंदमुळं वापरुन हा प्रकार बनवला जातो. भाजणीचं थालीपीठ तव्यावर टाकावं इतक्या सहजतेने ’ओकोनोमीयाकी’ खरपूस भाजली जाते. इथल्यासारखं चवीला लोणचं मिळालं नाही तरी तिथे मिळणाऱ्या विविध सॉससोबत तुम्ही ते आरामात खाऊ शकता.
जपानच्या खाद्यसंस्कृतीचा यथेच्छ आस्वाद घेतल्यानंतर जेवणावरुन उठताना ‘गोचीसोउसामा देश्ता’ म्हणायला विसरु नका. कारण परिभाषा वेगळी असली तरी ‘अन्नदाता सुखी भवं ‘ म्हणणं ही आपली संस्कृती आहे.
(लेखक जपानमध्ये पर्यटकांना घेऊन जाण्याचा 14 वर्षाचा अनुभव असलेले आहेत)




























































