तर्कसंगत खगोल शास्त्रज्ञ

131

>> शैलेश माळोदे

डॉ. जयंत नारळीकर. तर्कशुद्ध विचारांचे शास्त्रज्ञ. सामान्यांपर्यंत विज्ञान पोहचावे म्हणून विज्ञानकथा हा साहित्यप्रकार त्यांनी मराठीत रुजवला.

“मी शाळेत असताना गणित आणि विज्ञान हे माझे आवडते विषय होते, तर इतिहास आणि भूगोल हे खलपुरुषाची भूमिका बजावत. लहानपणापासूनची ही आवड पाहून तिला खतपाणी घालायचं काम केलं माझ्या वडिलांनी आणि दोन मामांनी – वसंतमामा आणि मोरूमामांनी. मला आठवतं, वसंतमामा केंब्रिजहून डॉक्टरेट मिळवून हिंदुस्थानात परतले तेव्हा आम्हा दोघा भावंडांसाठी अनेक गमती घेऊन आले. ते साल 1949 चं, दुसरं महायुद्ध संपून चार वर्षे उलटली असली तरी अजून सर्वत्र स्थिरस्थावर झालं नव्हतं. पण विध्वंसात्मक कारवायांची जागा रचनात्मक कार्यातून घेण्यास सुरुवात झाली होती.’’ प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांच्याशी झालेल्या गप्पा.

प्रा. जयंत नारळीकर आपणा सर्वांना परिचित आहेत. खगोल शास्त्रज्ञ, खगोल भौतिक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्याबरोबर ‘कॉनफॉर्मल थिअरी’ विकसित केली असून ती हॉयल नारळीकर सिद्धांत म्हणून सुपरिचित आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन यांची सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि मॅकचे तत्त्व यांचे एकत्रित संश्लेषणाच्या स्वरूपात तो असून याबद्दलचं त्यांचं संशोधन सर्वांना परिचित आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रात विज्ञान कक्ष सांभाळताना प्रा. नारळीकर यांचं ‘पुराणातील वांगी’ याविषयी दहा-दहा मिनिटांची दोन व्याख्यानांची संहिता मागविण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्याशी संपर्क झाला. त्यावेळी ते ‘आयुका’ पुणेच्या संचालकपदी होते. त्यानंतर विज्ञान प्रसारासंबंधीच्या कार्यात आणि चळवळीत नारळीकर सरांशी अनेकदा भेटण्याचा, चर्चा करण्याचा आणि रेडिओसाठी ध्वनिमुद्रण करण्याचा योग आला.

‘खासी स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी’ म्हणजे विश्वरचनेसंबंधीचा त्यांचा सिद्धांत आणि त्यासंबंधीचं त्यांचं संशोधन विविध परिषदांतून ऐकण्याचीही संधी लाभली. कोल्हापुरात 1938 साली जन्मलेल्या नारळीकर सरांचं विद्यापीठीय शिक्षण बी.एच.यू. वाराणसी आणि केंब्रिजमध्ये झालं व केंब्रिजमध्येच त्यांनी 1959 साली बी.ए. (ट्रायपॉस) पदवी मिळवली. ते रँग्लर झाले. 1960 साली त्यांना खगोलशास्त्रासाठी टायसन पदक देण्यात आलं. 1962 साली त्यांच्या पीएच.डी.साठीच्या संशोधनासाठी स्मिथ पारितोषिक देण्यात आलं. 1963 साली फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी मिळविल्यानंतर किंग्ज कॉलेजमध्ये फेलो म्हणून 1972 पर्यंत काम केलं. 1972 साली ते हिंदुस्थानात परतले. टी.आय.एफ.आर.मध्ये सैद्धांतिक खगोल भौतिकी गटाचे प्रभारी म्हणून त्यांनी 1988 पर्यंत प्राध्यापकपदी कार्य केलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. यशपाल यांनी व आयोगातर्फे स्थापन करण्यात येत असलेल्या आयुका (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी ऍण्ड ऍस्ट्रोफिजिक्स) पुणेच्या संचालकपदाची जबाबदारी घेण्याची गळ घातल्यावर प्रा. नारळीकर पुणेकर झाले. याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘प्रा. यशपाल यांना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे उच्च संशोधनासाठीच्या केंद्रासाठी मी पुण्याला यावं असं वाटत होतं. त्यावेळी मी टीआयएफआरमध्ये रुळलो होतो. प्रा. गोविंद स्वरूप यांचा रेडिओ खगोल शास्त्राचा गट पुण्याला कार्यरत होताच, परंतु प्रा. यशपाल यांनी मला पुणे येथे आयुकाचा चार्ज घेण्याची विनंती इतक्या आग्रहीपणे केली की मला ती नाकारताच आली नाही. आयुकाची संपूर्ण उभारणी करण्यासाठी चार्ल्स कोरिया या जगप्रसिद्ध वास्तुविशारदाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संशोधकांना विद्यापीठाच्या कठोर नियम जंजाळातून मोकळीक मिळून संशोधन वाढावं असं प्रा. यज्ञपालांचे मत होतं. ते आयुकात तरी मूर्त रूपात उतरवण्यात यश आलं याचा आनंद आहे.’’

आयुकाचे संस्थापक संचालक असलेल्या नारळीकरांनी ‘बिगबँग’ महास्फोटच्या लोकप्रिय प्रारूपाला पर्याय सुचवून विश्वरचना शास्त्रात एक महत्त्वाची भर टाकली आहे. एनसीआरटीच्या विज्ञान आणि गणिताच्या पाठय़पुस्तक समितीच्या सल्लागार गटाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. केवळ संशोधनपुरतंच आपण मर्यादित न ठेवता त्यांनी विज्ञान प्रसार करून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी खास प्रयत्न केले. विज्ञान कथा हा प्रकार मराठीमध्ये रुजविण्यासाठीचं त्यांचं योगदान उल्लेखनीय तर आहेच, पण त्यांनी तेवढय़ावरच न थांबता ‘पोस्टकार्डातून विज्ञान’ या अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे मातृभाषेतून (मराठीतून) विज्ञान प्रसार करण्याचं महत्त्वाचं कार्य केलं. त्यासंबंधीची हकीकत सांगताना ते म्हणाले, ‘‘एकदा भाषण झाल्यावर काही शाळकरी मुलं माझ्याकडे स्वाक्षरी (ऑटोग्राफ) मागण्यासाठी आली. त्यांना मी म्हटलं तुम्हाला स्वाक्षरी हवी असेल तर तुमच्या मनातला कोणताही विज्ञानविषयक प्रश्न एका पोस्टकार्डवर लिहून माझ्याकडे पाठवा. तेव्हा पोस्टकार्डाची किंमत 15 पैसे होती. म्हणजे मी त्यावर उत्तर लिहून पाठवेन. तुम्हाला शंकानिरसन आणि माझी स्वाक्षरी असा दुहेरी फायदा होईल.’’ त्यानंतर हा ओघ सुरू झाला. पुढे मराठी विज्ञान परिषदने त्यांच्या छोटय़ा पुस्तिका तयार केल्या.

प्रा. जयंत नारळीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षदेखील होते. त्याचबरोबर त्यांनी विश्वस्त म्हणूनही संस्थेसाठी कार्य केलं. अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे यासाठी नारळीकर नेहमी आग्रही राहिले. ‘यक्षांची देणगी’ हा त्यांचा प्रथम विज्ञान संग्रह होता. 2003 साली ते आयुकाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. जयंत नारळीकर हे नाव बहुपरिचित असण्याचं कारण म्हणजे विज्ञान बहुजनांपर्यंत पोहोचवून त्यांनी सिद्ध केलेली सामाजिक बांधिलकी. त्यांना विविध कार्यासाठी अनेक मानसन्मान मिळाले. सध्या जयंत नारळीकर आयुका केंद्रात निवृत्त प्राध्यापक म्हणून आपलं संशोधन, अध्यापन, लेखन कार्य करीत आहेत. त्यांना उर्वरित फलदायी आयुष्याकरिता शुभेच्छा!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या