कथा जॅझ संगीताची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>>दुष्यंत पाटील

आजच्या आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त जॅझ या पाश्चिमात्य देशातील लोकप्रिय संगीताची माहिती देणारा लेख.

सतराव्या अठराव्या शतकातला काळ. या काळात पश्चिम आफ्रिकेत राहणाऱया लोकांच्या जीवनात त्यांच्या पारंपरिक संगीताला महत्त्वाचं स्थान होतं. वेगवेगळ्या निमित्तानं हे लोक एकत्र यायचे आणि अशा प्रसंगी मग त्यांचं संगीत सुरू व्हायचं. सामाजिक कार्यक्रमांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये (उदा. लग्न, अंत्यविधी) त्यांचं प्रसंगाला साजेसं संगीत चालायचं. बऱयाचदा तर लग्नातल्या जेवणानंतर रात्र-रात्रभर एकत्रित संगीताचा कार्यक्रम चालायचा!  अशा प्रसंगी गावातली सारीच मंडळी संगीतात सहभागी व्हायची. त्या लोकांची संगीत वाद्यं खूप प्रगत प्रकारची नव्हती. वाद्यं साधीच असल्यानं बहुतेक सारे लोक ही वाद्यं वाजवू शकायचे. त्यामुळं अशा प्रसंगी सारे लोक गायचे, वाद्यं वाजवायचे. काही वेळा संगीतासोबत नृत्यही चालायचं. काही विशिष्ट प्रसंगी समाजातले काही लोक जमातीचा इतिहास, जमातीचं तत्त्वज्ञान, पुराण हे सारं गाऊन दाखवायचे. हे लोक ‘ग्रिओट’ म्हणून ओळखले जायचे.

या संगीताचं एक ठळक वैशिष्टय़ होतं – ‘साद आणि प्रतिसाद’ (Call and Response). गाणाऱया मुख्य व्यक्तीनं एक ओळ गायल्यानंतर बाकीचे सारे लोक त्याला एकत्र गाऊन प्रतिसाद द्यायचे. त्यामुळे सर्वांनाच संगीतामध्ये सहभागी होता यायचं. बऱयाच प्रसंगांत नृत्याला मध्यवर्ती स्थान असल्यानं या संगीतात तालही येत गेले. एकाच वेळ बरेचसे ड्रम वादक वेळेचा नियम पाळत स्वतःच्या पद्धतीनं ताल देत सहभागी होत. त्यामुळे त्यांच्या संगीतात संगीतातला ‘पॉलीरिदम’ हा प्रकार विकसित होत गेला. या मंडळींना तालाची जाण खूप चांगली होती.

आपल्या मर्यादित विश्वात पारंपरिक पद्धतीनं जीवन जगणाऱया या आफ्रिकन कृष्णवर्णीय मंडळींना गोरे लोक या काळात पकडून, गुलाम बनवून अमेरिकेत नेऊन विकत असत. अठराव्या शतकाच्या शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा धंदा चांगलाच तेजीत चालू लागला. अक्षरशः लाखो आफ्रिकन लोकांना आपली भूमी, संस्कृती सोडून परक्या प्रदेशात जाऊन गुलामीचं भयानक आयुष्य जगावं लागलं. या लोकांची गुलाम म्हणून परक्या भूमीत अक्षरशः पिळवणूक होई. गुलामीच्या कठीण जीवनामध्ये त्यांना पारंपरिक संगीतामध्येच काय ते विसाव्याचे क्षण मिळायचे. जेव्हा जेव्हा या गुलाम लोकांना त्यांचे मालक रिकामा वेळ द्यायचे तेव्हा हे गुलाम लोक संगीतासाठी एकत्र येत. संध्याकाळी काम संपल्यावर बऱयाचदा ही गुलाम मंडळी चोरून संगीतावर नाचत!

याच दरम्यान आफ्रिकेतून आलेल्या गुलामांचा संबंध अमेरिकेमधल्या मूळच्या लोकांशी म्हणजे रेड इंडियन लोकांशी आला. या दोघांच्या संगीतांमध्ये तसं बरंचंसं साम्य होतं. आफ्रिकन लोकांसारखंच रेड इंडियन लोकांच्या संगीतात पाच स्वरांची पट्टी (pentatonic scale), साद-प्रतिसाद पद्धत, ड्रमसारख्या वाद्यांचा तालासाठी वापर अशा गोष्टी होत्या. या दोघांच्या नृत्य पद्धतीमध्ये, संगीतामध्ये खूप फरक होते, पण एकत्र आल्यावर दोघांच्या संगीतांचा मिलाफ झाला.

पुढं काळाच्या ओघात कृष्णवर्णीय मंडळींचे गोऱया लोकांशीही संबंध वाढत चालले. आपल्या मूळच्या आफ्रिकन संस्कृतीपासून ते हळूहळू दूर चालले होते. परक्या संस्कृतीमधल्या बऱयाचशा गोष्टी स्वीकारणारी अशी त्यांची एक नवीन संस्कृती आकार घेत होती. गोरी आणि काळी मुलं वयात येईपर्यंत एकत्रच खेळत. त्यामुळे त्या पिढीला एकमेकांच्या संस्कृतींचा परिचय लहानपणीच होऊ लागला. आफ्रिकन भाषेतून आलेले काही शब्द गोरे लोकदेखील वापरू लागले. गोऱया लोकांच्या चर्चमधल्या संगीतामध्ये कृष्णवर्णीय मंडळीही सहभागी होऊ लागली. त्यामुळे युरोपमधल्या संगीतातल्या हार्मनीसारख्या गोष्टींचा त्यांना परिचय झाला. पुढे कृष्णवर्णीय लोकांची स्वतःचे असे वेगळे चर्च अस्तित्वात आले. तेथील गायनावर कृष्णवर्णीय आणि गोऱया लोकांच्या अशा दोन्ही संगीतांचा प्रभाव होता. आता कृष्णवर्णीय लोक युरोपमधली संगीत लिहिण्याची लिपी, युरोपमधलं संगीत आणि वाद्यंही शिकू लागले होते. एकूणच कृष्णवर्णीयांच्या संगीतावर आता गोऱया लोकांच्या संगीताचा प्रभाव वाढत होता.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये छापील संगीत खूप कमी प्रमाणात प्रकाशित व्हायचं. बहुतेक सारं छापील संगीत युरोपमधूनच यायचं. 1812 मध्ये सुरू झालेल्या ब्रिटनसोबतच्या युद्धामुळे मात्र हे छापील संगीत बाहेरून येणं थांबलं. त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना संगीत रचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन मिळू लागलं. दळणवळण विकसित झाल्यानं हे छापलेलं संगीत सर्वत्र चांगल्या प्रकारे वितरितही होऊ लागलं. याच काळात मध्यमवर्गीय लोकांना पियानो परवडू लागला. या साऱयाचा एक परिणाम म्हणजे आता कृष्णवर्णीयांच्या संगीताला चांगले दिवस येऊ लागले.

त्यानंतर बऱयाचशा वर्षांनंतर अमेरिकेतून गुलामी नष्ट झाली. गुलामीतून मुक्त झालेल्या कृष्णवर्णीय लोकांना आता वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळू लागल्या. संगीताशी संबंधित क्षेत्रांचा विचार करायचा झाला तर बऱयाच जणांना मनोरंजन क्षेत्रात (नाटकांमध्ये) नोकऱया मिळाल्या. काही लोक सैन्यात परेडमध्ये संगीत वाजवण्याचं काम करू लागले. बरेचसे कृष्णवर्णीय पियानो वादक बारमध्ये, क्लबमध्ये पियानो वादनाचं काम करू लागले. याचदरम्यान प्रामुख्यानं पियानोसाठी रचलं जाणारं ‘रॅगटाइम’ संगीत उदयास येऊ लागलं. या ‘रॅगटाइम’ संगीताची मुळे कृष्णवर्णीय समाजाच्या संगीतात होती. जवळपास सारेच ‘रॅगटाइम’ संगीतकार कृष्णवर्णीय होते. कृष्णवर्णीय समाजातल्या ‘केक-वॉक’ या नृत्याच्या संगीतात आणि ‘रॅगटाइम’ संगीतात खूपच साम्य आढळतं (केक-वॉक ही अमेरिकेमधल्या कृष्णवर्णीय मंडळींमध्ये चालणारी नृत्याची स्पर्धा असायची. त्यामध्ये विजेत्या जोडीला बक्षीस म्हणून केक मिळायचा!). या संगीताचा पुढच्या काळात जॅझ्झ संगीतावर बराच प्रभाव पडणार होता.

‘रॅगटाइम’ संगीतासारखाच जॅझ संगीतावर प्रभाव टाकणारा दुसरा संगीत प्रकार म्हणजे ब्लूज संगीत. हे संगीत अमेरिकेच्या दक्षिण भागातून आलं. या संगीतात ‘रॅगटाइम’ संगीत आणि गोऱया लोकांचं लोकसंगीत यांचा मिलाफ होता. वाद्यांची साथ असली तरी ब्लूजमध्ये गायनाला जास्त महत्त्व असतं. या गायनामध्ये एखादी कथा सांगण्यापेक्षा भाव व्यक्त करणं जास्त महत्त्वाचं असतं. या संगीताचं एक वैशिष्टय़ म्हणजे यातला ‘साद-प्रतिसाद’ हा प्रकार. सहसा या संगीतात दुःखी किंवा आर्ततेचे भाव असतात. हा परिणाम साधण्यासाठी संगीतातली काही खास तंत्रं यात वापरली जातात.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी न्यू ऑर्लियान्स या ठिकाणी खऱया अर्थानं जॅझ संगीताला सुरुवात झाली. या ठिकाणी मूळचे स्पॅनिश, फ्रेंच असणारेही बरेच लोक राहायचे. इथं कृष्णवर्णीय लोकांचं प्रमाणही जास्त होतं. त्यामुळे कृष्णवर्णीयांना इथं वर्णद्वेषाची भीती नव्हती. सैन्यातल्या परेडमध्ये वाजवली जाणारी सारी वाद्यं एव्हाना कृष्णवर्णीय मंडळींच्या हातात पडलीच होती. कृष्णवर्णीय मंडळींचे मग इथं बरेचसे ‘ब्रास बॅंड’ बनले. हे  ‘ब्रास बॅंड’ पिकनिक, पार्टी यापासून ते अंत्यविधीच्या यात्रेपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी संगीत वाजवायचे. या संगीताचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे यातले वादक एखादं संगीत घेऊन ते संगीतातले काही नियम पाळत उत्स्फूर्तपणे ते त्या संगीतामध्ये विविधता आणत असत. या संगीतात रॅगटाइम आणि ब्लूज संगीतातून बराचसा भाग घेतला होता. हीच जॅझ संगीताची सुरुवात होती. न्यू ऑर्लियान्समध्ये सुरू झालेला हा संगीत प्रकार नंतर सगळीकडे लोकप्रिय होत गेला. 1920 आणि 1930 च्या दशकात जॅझ संगीत साऱया अमेरिकेमध्ये खूप लोकप्रिय झालं. जॅझमधल्या उस्ताद मंडळींनी हे युग गाजवलं. जॅझ संगीतात यापुढे अजून बरेच प्रकार विकसित होत गेले.

आज जॅझ संगीत साऱया जगभर लोकप्रिय आहे. जॅझ संगीताला अमेरिकेचं अभिजात संगीत मानण्यात येतं. युरोपच्या अभिजात संगीतामध्ये संगीत जसं लिहिलेलं असतं तसंच वाजवावं लागतं, पण जॅझ संगीतात मात्र वादकाला स्वतःची प्रतिभा दाखवण्यासाठी वाव असतो. चांगला जॅझ वादक बनण्यासाठी स्वतंत्र प्रतिभेसोबत वाद्यावर प्रचंड प्रभुत्व असणंही गरजेचं असतं. जॅझ हा जगातला सर्वात जास्त ‘हायब्रिड’ संगीत प्रकार असला तरी त्याच्या उच्च दर्जाबद्दल मात्र कुठेच दुमत दिसत नाही.

– [email protected]