
>> विनायक घाग
ग्वाल्हेरचे नरेश ले. जनरल हिज हायसेन्स सर जिवाजीराव माधवराव शिंदे यांचे 16 जुलै 1961 रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईकर जनतेतर्फे शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मराठा मंदिरच्या विद्यमाने मंदिर थिएटरमध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर शोकसभा भरली होती. यशवंतराव चव्हाण यांनी महाराजांना आदरांजली वाहताना, महाराजांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याचे अपरिमित नुकसान झाले आहे, असे सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, महाराष्ट्राच्या कुठल्याही प्रश्नात महाराज आपुलकीने लक्ष घालीत असत. त्यांचा स्वभाव अतिशय दिलदार व खिलाडूवृत्तीचा होता व जनतेवर त्यांचे खरेखुरे प्रेम होते.
दीडशे वर्षांच्या परकीय राजकीय सत्तेच्या वर्चस्वाखाली हिंदुस्थानी जनतेच्या कल्याणाकडे, इच्छा-आकांक्षाकडे जाणूनबजून दुर्लक्ष केले गेले. जनतेच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीची उपेक्षा झाली होती. स्वातंत्र्याचे वारे चौफेर खेळलेल्या महाराष्ट्रामध्येही हीच निराशाजनक परिस्थिती आढळून येत होती व महाराष्ट्रीय समाजाची दुःस्थिती अधिकाधिक तीव्र होत चालली होती.
अशा या विदारक वस्तुस्थितीची तीव्रतेने जाणीव झालेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 30 मार्च 1945 रोजी मराठा मंदिर या संस्थेची स्थापना केली. या पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान डॉ. टी. जी. शिरनामे यांनी स्वीकारले होते. महाराष्ट्रामध्ये एक आदर्श मध्यवर्ती संस्था निर्माण करावी या ध्येयाने प्रेरित होऊन, जीवनाच्या विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱयांना बरोबर घेऊन, मराठा मंदिरच्या 41 प्रवर्तकांनी कार्यास प्रांरभ केला. हे 41 प्रवर्तकच मराठा मंदिरचे संस्थापक होत. मंदिराच्या प्रवर्तकांनी ग्वाल्हेराधिपती हिज हायनेस ले. ज. सर जिवाजीराव महाराजांना या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारून समाजाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती जानेवारी 1946 मध्ये केली असता, त्या प्रजाहितदक्ष, पुरोगामी विचाराच्या नरेशांनी ही विनंती तत्काळ स्वीकारली. मंदिराच्या प्रत्येक कामामध्ये जातीने लक्ष घालण्यात महाराजांना आनंद होई. एवढय़ा मोठय़ा कार्याला पैसा तर लागणारच. महाराजांनी मराठा मंदिरासाठी स्वतः त्याकाळी दोन लाख रुपये देणगी म्हणून दिलेच, पण त्याशिवाय जी. डी. बिर्ला शेटकडून 1946 मध्येच दोन लाख रुपये वर्गणीरूपाने मिळवून दिले. शिवाय मंदिराला ग्वाल्हेर संस्थानमध्ये सभासद करून 50 हजार मिळवून दिले. अर्थात या आर्थिक योगदानामुळे महाराज कधी मालक असल्यासारखे वागले नाहीत. महाराज आजीवन अध्यक्ष होते व त्यांच्या 15 वर्षांच्या कार्यकालामध्ये महारांजानी केलेल्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आणि सक्रिय सहानुभूतीमुळे, मराठा मंदिराच्या कार्याचा नेत्रदीपक विस्तार केला. 12 मे 1953 रोजी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट अन्वये मराठा मंदिराची धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये नोंदणी झाल्यानंतर 31 मे 1953 रोजी मराठा मंदिराच्या इमारतीची कोनशिला माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या शुभ हस्ते बसविण्यात आली. मराठा मंदिराच्या या आलिशान इमारतीचे शिल्पकार जिवाजीराव महाराजच होते. या आलिशान थिएटर इमारतीचे उद्घाटन, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते झाले. मंदिराच्या कार्याचा जो त्यावेळी विस्तार झाला, तो सारा महाराजांच्या प्रेरणेमुळेच झाला.
मंदिराचे कार्य विविधांगी असावे अशी महाराजांची नेहमी इच्छा असे. महाराष्ट्रीय समाजाला मंदिराचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा या जाणिवेने महाराज नेहमी नवनवीन योजना आखीत. अशाच योजनांपैकी एका योजनेनुसार, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱया महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व विषयांचे शिक्षण देण्यासाठी एक टेनिंग सेंटरही सुरू करण्यात आले.
विश्वविद्यालयातून वरच्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱया अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची मनीषा असायची. परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे त्यांची मनीषा पूर्ण होत नसे. म्हणून महाराजांच्या प्ररणेने परदेशी शिष्यवृत्ती निधी तयार करण्यात येऊन काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जाण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले.
जिवाजीराव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या कार्यामध्ये सुरुवातीपासून सहभागी असलेले सरचिटणीस बाबासाहेब गावडे आणि दादासाहेब मोरे यांनी मराठा मंदिर ही संस्था चांगल्या प्रकारे सांभाळली.



























































