भटकेगिरी – जोधपूरची शान, उमेद पॅलेस

12844

>> द्वारकानाथ संझगिरी

जोधपूरमध्ये मेहरानगढ किल्ल्यावरून दूर एक महाल दिसतो. तो तुम्ही चुकवू शकत नाही. तो चुकणं म्हणजे हसऱया माधुरी दीक्षितच्या चेहऱयावरचं हास्यच न दिसणं! त्या महालाचं नाव आहे उमेद पॅलेस. खरं तर उमेद भवन पॅलेस! एका कुटुंबाने निव्वळ राहण्यासाठी बांधलेला जगातला एक भव्य पॅलेस. या पॅलेसमध्ये 347 खोल्या आहेत. कोर्ट यार्डस्, बॅन्कवेट हॉल्स वगैरे वेगळे. थोडक्यात, वन बेडरूम हॉलमध्ये खुशीत राहणारी साडेतीनशे कुटुंबे तिथे राजासारखी राहतील. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की, बांधणाऱया राजाचं नाव महाराजा उमैदसिंग होतं. आज या महालाचा मालक आहे, गजसिंग! त्याच्या आजोबांची ही कर्तबगारी. 1928 साली सुरू झालेले काम 1943 साली संपलं. म्हणजे गर्भात असताना या महालाने महात्मा गांधींची दांडीयात्रा, भगतसिंगची फाशी, 1942 चळवळ वगैरे पाहिलं. पण त्या गर्भाला त्याबद्दल ममत्व असावं असं नाही. कारण या सर्व महालांच्या मालकांना देशाच्या स्वातंत्र्याबद्दल सोयरसुतक नव्हतं. ब्रिटिशांच्या राज्यात ते ऐषआरामात होते. ब्रिटिशांच्या तिजोरीत काही मोहरा फेकल्या की त्यांचे इतर हक्क अबाधित असत. पण या महालाला एक वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्याचा नाही, पण दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा.

या महालाची जन्मकहाणी वेगळी आहे. एका संताने त्या राज्याला शाप दिला होता की, ‘चांगल्या राज्या’नंतर तिथे मोठा दुष्काळ पडेल. त्यामुळे राठोड घराण्याच्या प्रतापसिंगने पन्नास वर्षे राज्य केल्यावर जोधपूरमध्ये लागोपाठ तीन वर्षं दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले. त्यांनी महाराजांकडे मदतीचं साकडं घातलं. महाराजांनी त्यांच्याकडून काम करवून घेऊन त्यांना रोजंदारी मिळवून द्यायचं ठरवलं. चांगली गोष्ट आहे. नुसती पैशाची मदत देण्यापेक्षा चूल पेटवायला ‘कामाचं इंधन देणं’ जास्त चांगलं. एखाद्या सामाजिक दृष्टिकोन असणाऱया राजाने प्रजेच्या हिताच्या कामात त्यांना गुंतवलं असतं. लोकशाहीत अशा वेळी लोकहिताची कामे काढली जातात. पण त्या वेळच्या राजांना एवढी सामाजिक जाणीव नव्हती.

असो, तर महाराज उमैदसिंगने एक अतिविशाल, सौंदर्यशाली महाल बांधायचं ठरवलं. त्याने हेन्री वॉन लॅकेस्टर या ब्रिटिश आर्किटेक्टकडे ते काम सोपवलं. हा आर्किटेक्ट एडविन ल्युटनचा समकालीन. ल्युटनने नवी दिल्लीच्या महत्त्वाच्या इमारती उभारल्या. नवी दिल्लीच्या इमारतीप्रमाणेच उमैद पॅलेसमध्ये घुमट आणि खांबाची (Columns) थीम मांडली आहे. तंत्रज्ञान पाश्चात्य आहे, पण आर्किटेक्चर हिंदुस्थानी आहे. 1928 साली सुरू झालेलं महालाचं काम 1943 साली संपलं. ते रेंगाळायला दिलं गेलं, कारण दुष्काळग्रस्तांना अधिक काम मिळावं हा उदात्त हेतू राजाचा होता. काय औदार्य! या औदार्यावर टीका झाली. कारण माझ्यासारखी नतद्रष्ट माणसं या काळातही होती. सवा कोटीच्या वर पैसे खर्च झाले. पण दोन ते तीन हजार माणसांना काम मिळालं. ते अन्नाला लागले. जोधपूर शहराच्या सीमेवरच्या एका डोंगराची या महालासाठी निवड केली गेली. पण तिथे जवळपास पाण्याचा साठा नव्हता. डोंगर अत्यंत दगडी असल्यामुळे झाडं वगैरे जास्त नव्हती. सॅण्डस्टोनच्या खाणी जवळ नव्हत्या. त्यामुळे जोधपूरपासून खाणीपर्यंत एक रेल्वे लाइन टाकण्यात आली. माती डोंगरावर नेण्यासाठी गाढवांचा उपयोग केला गेला. म्हणजे पहा, गाढवांनाही काम मिळालं. या पॅलेसमध्ये सोनेरी सॅण्डस्टोनचा उपयोग केलाय. मक्राना मार्बल (संगमरवर) सढळ हाताने वापरलाय. लाकडी काम ब्रह्मदेशातल्या लाकडाचं आहे. ज्याला ‘बर्माटिक’ असं म्हटलं जातं. एकंदरीत 26 एकरांत हा महाल बांधलाय. त्यात पंधरा एकराच्या बागा आहेत. अर्थात 347 खोल्यांखेरीज इतर सुखसोयी आहेतच. उदा. दरबार हॉल, बॅन्क्वेट हॉल, खासगी डायनिंग हॉल, बॉलरूम, लायब्ररी, अंतर्गत स्विमिंगपूल, बिलियर्डस् रूम, चार टेनिस कोर्ट, दोन स्क्वॅश कोर्ट वगैरे!

पण हा महाल त्या राठोड घराण्याला तेवढा फळला नाही. उमैदसिंग हा महाल फक्त चार वर्षं उपभोगू शकला. त्याचा तरुण मुलगा हनुमंत सिंग. 1952 साली लोकसभा निवडणुकीत जिंकला आणि घरी परतताना त्याचं विमान कोसळलं आणि तो मेला. आजचा राजा गजसिंग त्याचा मुलगा. त्याने 1971 साली या महालाचा काही भाग ताजला हॉटेलसाठी चालवायला दिला. एका भागात तो राहतो आणि लोकांसाठी एक छोटा म्युझियम तयार केला.

या हॉटेलमध्ये आता आधुनिक उमैद सिंग राहतात. नीता अंबानीचा पन्नासावा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला. त्या खर्चात अख्खा हिंदुस्थान आठवडाभर पोटभर जेवला असता. आपण म्युझियम पाहताना या जगातल्या एका उत्कृष्ट महालाला पदस्पर्श करू शकतो. तिथे जुनी घडय़ाळं आहेत. पण त्या घडय़ाळांना हैदराबादच्या सालारजंग म्युझियमची सर नाही. म्युझियममध्ये ज्या इतर गोष्टी सापडतात त्या सर्व गोष्टी या म्यझियममध्ये सापडतात. पण तिथली सर्वात खास गोष्ट आहे व्हिन्टेज गाडय़ा! तुम्हाला गाडय़ांचे वेड असेल तर ते वेड हा म्युझियम पाहिल्यावर द्विगुणित होईल. रोल्स रॉइस, मर्सिडीज वगैरे जुन्या मॉडेलच्या गाडय़ा पाहायला मिळतात. देशातल्या अनेक महाराजांकडे अशा गाडय़ा होत्या, पण पहिली गाडी ठेवणारा हिंदुस्थानी मात्र जमशेटजी टाटा आहे.

उमैद महाल पाहिल्यावर जाणवतं की, राजस्थान श्रीमंती आणि गरिबीचं, जाती व्यवस्थेचं एक अजब मिश्रण आहे. माझा मित्र अक्षय कोहोचकरने राजस्थानात एक मोठं काम घेतलं होतं. त्याने ठरवलं की, कामासाठी लागणारी माणसं तिथून घ्यायची. दोन महिन्यांच्या साध्यासुध्या कामासाठी म्हणजे कारकुनापासून सर्व्हमध्ये रॉड पकडणाऱया माणसापर्यंत शिकलेली माणसं त्याला मिळाली. ती प्रचंड आनंदी होती, कारण दोन महिन्यांसाठी का होईना, त्यांना ‘नोकरी’ होती. त्यांनी उत्साहात काम केले. माझ्या मित्राने सर्वांना चांगलं जेवण मिळावं म्हणून एक खानसामा ठेवला. सकाळ-संध्याकाळ जेवण सर्वांसाठी मोफत असे. तरीही काही मंडळी ते जेवण घेत नसत. का ठाऊक आहे? तो खानसामा त्यांच्यापेक्षा हलक्या जातीचा होता. तो नापित होता. तिथे जातीव्यवस्था इतकी रक्तात शिरलीय. पोटातली भूकसुद्धा त्यावर मात करते. त्यामुळे राजाने दुष्काळग्रस्तांच्या भल्यासाठी स्वतःचा महाल बांधणं ही गोष्ट त्या समाजव्यवस्थेला साजेशीच आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या