आभाळमाया – गुरूवरचे वादळ!

354

>> वैश्विक

आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह ‘गुरू’ हा त्याचे आपल्या संस्कृतीमधले नाव सार्थ करतो. पृथ्वीच्या 11 पट आकार असलेल्या गुरूचे सूर्यापासूनचे अंतर 75 कोटी किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत मंगळ आपल्याला खूपच जवळचा आणि कदाचित वस्तीला अनुकूल. म्हणून अनेक मोहिमांद्वारे लाल मंगळावर उतरण्याचे, पर्यटनाचे आणि कायमची वस्ती करण्याचे मनोरथ दौडत आहेत. एकविसाव्या शतकात त्याला यश आले तर ती माणसाच्या अंतराळ पराक्रमातली लक्षवेधक गोष्ट ठरेल. गुरू ग्रह मात्र वायूरूप वातावरणाचा असल्याने त्यावर उतरणे केवळ अशक्य. त्याची जवळून छायाचित्रे मात्र घेता येतात. त्याद्वारे या महाग्रहाच्या अंतरंगात डोकावण्याचे प्रयत्न आतापर्यंत अनेकदा झालेत.

पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशांनी कललेला असल्याचे आपल्याला बालपणापासूनच शालेय अभ्यासात समजते. गुरूचे अक्ष-कलणे केवळ तीन अंशांचे आहे. पृथ्वीवरून अवकाशात उड्डाण करायचे तर इथल्या गुत्वाकर्षण शक्तीविरोधी वेग धारण करायला प्रचंड ऊर्जा लागते. सेकंदाला 11 किलोमीटर वेगाने उड्डाण केल्यास पृथ्वीवरून अवकाशात जाता येते, रॉकेट तसेच उड्डाण करते. परंतु गुरूवरून अवकाशात झेप घ्यायची तर सेकंदाला 60 किलोमीटर एवढा वेग असावा लागेल. त्यावरून गुरूचे गुरुत्वाकर्षण किती प्रचंड आहे याची कल्पना येऊ शकते.

गुरूच्या या प्रचंड गुरुत्वाकर्षणाचा आणि प्रचंड आकाराचा फायदा पृथ्वीला होतो. अंतराळातील पृथ्वीवर येऊ शकणारे अनेक अशनी, धूमकेतू गुरू अडवू शकतो. शेमेकर लेव्ही-9 हा धूमकेतू 1994 मध्ये गुरूने खेचून घेतला. शनी, गुरूसारख्या बलाढय़ ग्रहांची ‘ढाल’ असल्याने पृथ्वीवरची जीवसृष्टी सुरक्षित राहण्यास मदत झाली.

अशा या गुरूचे जे वायूरूप कवच आहे. त्यात हायड्रोजन, हेलियम, मिथेन, अमोनिया, पाण्याची वाफ आणि इतर वायूंचा समावेश आहे. याच वायुमय कवचात एक प्रचंड मोठे वादळ सामावले असून त्याला गुरूवरचा रेड स्पॉट म्हणतात. उग्र लाल डोळय़ासारखे दिसणारे हे महावादळ हजारो वर्षे घोंगावत आहे.

गॅलिलिओची दुर्बिण सन 1609 मध्ये अवकाशाकडे रोखली गेली आणि त्यालाही गुरूचे चार चंद्र दिसले, पुढच्या लेखात आपण आपल्या सूर्यमालेतील एकूण (महत्त्वाच्या) ‘चंद्रा’ची माहिती घेणार आहोत. मात्र गॉलिलिओनंतरच्या काळात दुर्बिणी अधिक शक्तिशाली झाल्यावर गुरू व इतर ग्रहांवरच्या ‘जागा’ (स्पॉट) शोधण्याचा ध्यास खगोल अभ्यासकांनी घेतला. त्या काळात अर्थातच फोटोग्राफी नव्हती. रॉबर्ट हूक यांनी 1664 मध्ये गुरूवरच्या एका डागाचे निरीक्षण नोंदवले. गुरूवरच्या एका ‘स्पॉट’चे पेंटिंग डॉनॅटो क्रेती यांनी इटलीमधल्या प्रदर्शनात ठेवले ते 1711 मध्ये. त्यानंतर त्याविषयी चर्चा आणि संशोधनाला वेग आला. परंतु हे पहिले निरीक्षण गुरूच्या उत्तर गोलार्धातील एका स्पॉट असण्याचे म्हटले गेले. नंतर अनेक वर्षांनी आधुनिक साधनाद्वारे गुरूचा महानेत्र शोधला. गुरू, नेपच्युन या ग्रहांवर ‘डार्क’ स्पॉटसुद्धा आहेत.

1979च्या फेब्रुवारी महिन्यात व्हॉटजर-1 हे यान गुरूपासून 92 लाख किलोमीटरवरून पसार झालं. 2016 मध्ये आधुनिक ‘जुनो’ यानाने मात्र गुरूदर्शन खूपच जवळून म्हणजे 8 हजार किलोमीटरवरून घेतले आणि ‘रेड स्पॉट’चे खूप फोटो काढले. गुरूचा हा लाल- डाग घडय़ाळाच्या काटय़ांच्या उलट दिशेने (ऍण्टी क्लॉकवाइज) फिरतो. त्याचे अंक्षांवरचे स्थान स्थिर असले तरी रेखांश बदलतात. त्यातील हायड्रोजन सल्फर तसेच थोइलिन इत्यादी वायूंच्या रासायनिक प्रक्रियेतून त्याला लाल रंग आला असावा असे म्हटले जाते. त्याशिवाय सूर्याच्या अतिनील किरणांचा या वायूंवर परिणाम होऊन रंग निर्माण होत असावेत. याचे तापमान सुमारे 300 अंश सेंटिग्रेड एवढे आहे. त्यामध्ये तप्त वायूंच्या लाटा सतत उसळत असतात.

असे म्हटले जाते की 2019 पासून, त्याचे तेज कमी होत असल्याचे म्हटले जाते. त्याचे आकारमान 2040 पर्यंत लंबवर्तुळाऐवजी गोल होईल, असंही एक भाकित आहे. अर्थात अशी भाकितेही वारंवार तपासण्यावर त्यातील बदल लक्षात येतात. तर असा हा आपल्या सूर्यमालेतील महाग्रह आणि त्याचा ‘महा-अक्ष’ विश्वात अनेक नैसर्गिक विस्मय आहेत. त्याचा मागोवा घेण्यासाठी अभ्यास हवा आणि त्यासाठी आधी पृथ्वी अबाधित ठेवायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या