ठसा – काकासाहेब चितळे

791

प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे नुकतेच निधन झाले. दुधाच्या व्यवसायापासून सुरू झालेल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यात काकासाहेब चितळे यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. मेकॅनिकल इंजिनीअरचे शिक्षण घेतल्यानंतर वडील बाबासाहेब चितळे व भाकंडांसोबत ते ‘चितळे उद्योग समूहा’मध्ये कार्यरत राहिले. प्रसिद्ध ‘चितळे डेअरी’ ही दुग्धोत्पादक संस्था सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलकडी गावात 1939 मध्ये सुरू झाली. भास्कर चितळे यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या सोबतीला दुसऱ्या पिढीतील भाऊसाहेब व काकासाहेब चितळे यांनी हा व्यवसाय आणखी वृद्धिंगत केला. भाऊसाहेब चितळे यांनी 1950 मध्ये ‘चितळे बंधू मिठाईवाले’ या कंपनीची स्थापना केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे बंधूंनी व्यवसाय आणखी वाढवला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले. चितळ्यांच्या खमंग बाकरवडीची चव सातासमुद्रापलीकडे गेली आहे. काकासाहेब चितळे हे सध्या सांगलीतील भिलकडी येथील चितळे डेअरीचे कामकाज पाहत होते. चितळे डेअरी म्हटले की श्रीखंड आणि बाकरवडी हे दोन पदार्थ समोर येतातच. पुण्यात चितळे डेअरीची अनेक उत्पादने प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय मुंबई, ठाणे, डोंबिकली, कल्याण या शहरांमध्येही चितळे डेअरीजचे पदार्थ मिळतात. काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे चितळे उद्योग समूह वाढला. हा उद्योग समूह महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला नाही तर हिंदुस्थानसोबतच जगातही पसरला आहे. या सगळ्या व्याप्तीचे श्रेय काकासाहेब चितळे यांना जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध आणि प्रक्रिया, विविध दुग्ध उत्पादने तयार करण्याचे काम ही कंपनी करते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या