गांधारी

478

>> विद्या कुलकर्णी

खाटीक पक्षी. विचित्र वाटते आहे ना नाव… त्याच्या शिकार करण्याच्या पद्धतीवरून त्याला हे नाव पडले.

या पक्ष्यांची साद कर्कश असल्यामुळे इंग्लिश भाषेमध्ये ‘Shrike’ हे नाव दिले गेलेले आहे व त्यांच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे मराठी भाषेमध्ये ‘खाटीक’ नाव पडले आहे. शिकार केल्यानंतर हे पक्षी ‘भक्ष्या’ला बाभळीच्या किंवा तत्सम एखाद्या तीक्ष्ण काटय़ाला टांगून ठेवतात आणि मग सवडीने शिकारीवर ताव मारतात. गांधारीने महाराज धृतराष्ट्र यांच्याशी विवाह केल्यावर आपल्या डोळ्यावर आयुष्यभरासाठी काळी पट्टी बांधून घेतली होती तशीच गर्द काळ्या रंगाची पट्टी खाटीक पक्ष्यांच्या डोळ्यांवर बांधल्याचा भास होतो. म्हणूनच खाटीक पक्षी ‘गांधारी’ नावानेही परिचित आहेत.

नकल्या खाटीक
नकल्या खाटीक हे पक्षी लॅनिडी कुटुंबातील असून या प्रजाती आशिया खंडामध्ये कझाखस्तान ते न्यूगुनिआ व पूर्वेकडील द्वीपसमूह येथे मोठय़ा प्रमाणात आढळतात व प्रांतानुसार त्यांच्या रंगामध्ये थोडा फरक आढळतो. या पक्ष्यांचे निवासस्थान शेतजमीन, मोकळे, विरळ जंगल, काटेरी झुडुपांच्या प्रदेशात आणि पाणलोट भागात आढळते.

नकल्या खाटीक 
डोके राखाडी रंगाचे, खालील भाग व पंखातील काही भाग तांबूस-तपकिरी रंगाचा असतो. गळ्याखालील भाग पांढरा असतो. शेपटी लांब असून काळ्या रंगाची असते. डोक्यावरील टोपी व डोळ्याजवळील पट्टा काळा असतो. हे पक्षी बऱयाच वेळा फांदीवर किंवा इलेक्ट्रिक तारेवर ताठ बसलेले दिसतात. खाद्य पकडण्यासाठी खाली जमिनीवर तिरके सूर मारतात. छोटे साप, पाली,  लहान पक्षी, रानउंदरांची पिले हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. हे पक्षी संधी मिळाल्यावर गरजेपेक्षा जास्त प्राण्यांची शिकार करून झाडांमध्ये खोचून ठेवतात. कधी हे पक्षी झऱयामधले मासे पकडतात तर कधी दुसऱयांनी मारलेले, पकडलेले खाद्य पळवतात. हवेत उडून कीटकही पकडू शकतात. पकडलेले भक्ष्य खाण्याअगोदर तारेवर किंवा काटेरी फांदीवर काटय़ाने ठेचतात. नीम झाडांची पाने, काही फळेसुद्धा ठेचून खातात. हे पक्षी बऱयाच वेळा फांदीवरच एकमेकांशी खेळत किंवा कर्कश स्वरात भांडत असतात. नकल्या खाटीक टिटवी, कुत्रे, खार, छोटा पावशा या सर्व पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करू शकतात. त्यामुळेच हे पक्षी लोकांचे खूप लाडके आहेत.समशीतोष्ण प्रदेशात त्यांचा प्रजननाचा काळ उन्हाळ्यात असून त्यांचे घरटे खोलवर कपाच्या आकाराचे असते. ते पाम, खजूर अशा झाडात काटेरी फांद्या, चिंध्या, पिसे यांपासून बनविलेले असते. मादी 3 ते 6 अंडी घालते. नर व मादी दोघे मिळून ती उबवतात. साधारण 13 ते 16 दिवसांत पिले बाहेर येतात. नर व मादी त्यांना भक्ष्याचे बारीक तुकडे करून भरवतात. कधी कधी परत एकदा अंडी त्याच घरटय़ात घालून ती ‘पावशा पक्ष्याकरवी’ उबवून घेतात.

कवडय़ा माशीमार खाटीक
कवडय़ा माशीमार खाटीक झाडाझुडुपांमध्ये राहणारे पक्षी असून या पक्ष्यांचे वास्तव्य प्रामुख्याने उष्णकटिबंधीय दक्षिण आशिया, हिमालय आणि दक्षिण हिंदुस्थान ते इंडोनेशियापर्यंत जंगलात आढळते. कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. बहुतेक वेळा मिश्र प्रजातींबरोबर झाडाच्या फांद्यांमध्ये ते आपले खाद्य शोधत असतात. नराचा निळा रंग मखमली असून मादी राखाडी-तपकिरी रंगाची असते नर मादीपेक्षा अधिक चमकदार व उठून दिसतात.  श्रीलंकेत ‘नर व मादी एकमेकांना साद घालत जोडीने गाणे गात आहेत’ असा संदर्भ आहे.

लाल शेपटीचा खाटीक
स्पॅनिश भाषेत ‘Queen Elizabeth’ ला इसाबेलिन म्हणतात. त्यावरून या पक्ष्याला ‘Isabelline Shrike’ नाव दिलेले आहे असा संदर्भ आहे.लाल शेपटीचा खाटीक लॅनिडी कुटुंबातील स्थलांतरित पक्षी असून लांबी 16 ते 18 सें. मी., पंखाचा पिसारा 24 ते 27 सें. मी. व वजन 24 ते 38 ग्रॅम असते. ते झाडाझुडुपांमध्ये प्रामुख्याने काटेरी फांद्यांवर राहतात. त्यांचे खाद्य मोठे कीटक, लहान पक्षी, उंदीर आणि मांजरी इत्यादी असून ते झाडात लपवून ठेवतात. यांचे प्रजनन खुल्या मैदानात लागवडीच्या ठिकाणी, काटेरी झाडाझुडुपांमध्ये होते. या पक्ष्यांचा पिसारा राखाडी रंगाचा असून शेपटी लाल रंगाची असते. शिशू पक्ष्यांच्या अंगावर नागमोडी रेषा असतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या