
>> अरुण जोशी
‘खुश है जमाना आज पहिली तारीख है’ हे गाणं आज रेडिओ सिलोनवरून वाजतं की नाही ठाऊक नाही, पण आमच्या लहानपणी प्रत्येक पहिल्या तारखेला हे गाणं ठरलेलं असायचं. गाण्याला साजेसे उमर जलालाबादींचे शब्द आणि त्याहून कहर म्हणजे किशोर कुमारचा भन्नाट आवाज… त्यातही कदाचित आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे या उडत्या गाण्याचं संगीत चक्क आपल्या बाबूजींचं म्हणजे सुधीर फडके यांचं होतं. 1954 मधली ही गोष्ट आहे. मराठीत स्थिरावून ‘गीतरामायण’सारखी अमर कलाकृती सादर करणारे बाबूजी त्याआधीच्या काळात हिंदी सिनेसृष्टीतले नावाजलेले संगीतकार होते. लता मंगेशकर यांनी गायिलेली आणि बाबूजींच्या संगीताने सजलेली ‘रत्नघर’ चित्रपटातली गाणी जरूर ऐका.
… तर आजचा विषय चतुरस्र गायक, अभिनेता, रचनाकार, दिग्दर्शक, निर्माता वगैरे वगैरे असलेल्या किशोर कुमारचा. 4 ऑगस्टला त्याची जयंती आहे. अवघं अठ्ठावन्न वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या अवलियाने हिंदी सिने जगत दणाणून सोडलं होतं. रफीचा काळ ओसरत आला आणि किशोरच्या आवाजाने रसिकांची मनं जिंकली. एरवी एकेकाळी ‘मन मोरा बावरा’ हे गीत हाती वीणा घेऊन किशोर कुमार गातोय आणि आवाज महंमद रफीचा असाही काळ होता. अर्थात ते रागदारीवर आधारित गाणं रफीने अप्रतिम गायिलंय यात शंकाच नाही.
मात्र किशोरचा ‘जमाना’ सुरू झाल्यावर त्याच्या गाण्यांनी रसिकांची अवस्था ‘कैसा जादू डारा’ अशीच होऊन गेली. किशोर म्हणजे केवळ उडत्या चालीची गाणी हे समीकरणही तितकंसं खरं नव्हे. ‘मेरे दिल मे आज क्या है’सारखी अनेक भावस्पर्शी गाणी किशोरदांनी गायिली. सबकुछ किशोर असलेल्या ‘दूर गगन की छाव में’मधलं ‘आ चल के तुझे मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तले’ हे गाणंही आठवा. किशोरचं वेगळंच रूप दिसेल.
हिंदी सिनेसृष्टीतले बहुतेक कलाकार, संगीतकार, कवी, गायक अनेक वर्षे मुंबईत राहिले, पण मुकेशच्या वाटय़ाला एकच मराठी गाणं आलं. रफीसाहेबांची गाणी श्रीकांत ठाकरे यांनी ध्वनिमुद्रित केली म्हणून त्यांचा मराठीतला स्वर आपल्या कानी पडतो. मध्य प्रदेशातील खांडवा येथील किशोरही मुंबईतच नशीब आजमवायला आला, पण त्याचं गायक म्हणून मराठीत पदार्पण त्या मानाने खूप उशिरा झालं. तरीही आज किशोरदांच्या नावे तीन-चार मराठी गीतं आहेत.
4 ऑगस्ट 1929 रोजी खांडवा येथे बंगाली कुटुंबात जन्मलेल्या किशोरचं मूळ नाव आभास होतं असं म्हटलं जातं. अशोक, अनुप, आभास. अशोक कुमार एकेकाळचे हिंदी चित्रपटातले गाजलेले नायक आणि नंतर कित्येक वर्षे चरित्र अभिनेत्याचं काम करणारे ज्येष्ठ कलाकार. या तिन्ही भावांनी चित्रपटात कामं केली. ‘चलती का नाम गाडी’मध्ये तिघंही एकत्र आहेत. त्यात अनुप कुमार दिसतो, पण तो फार गाजला नाही. किशोर मात्र नटखट अभिनयासह अद्वितीय स्वर घेऊन आला होता. ‘दिल्ली का ठग’, ‘हाफ तिकिट’ ते ‘पडोसन’ अशा अनेक चित्रपटांतली त्याची भूमिका गाजली.
तसं त्याच्या गाण्यात कधीतरी मराठी ओळी यायच्या. ‘न्यू दिल्ली’ चित्रपटातल्या ‘अरे भाई निकल के आ घर से’ या गाण्यात किशोर अनेक भाषांत गातो. ‘तुला भीती रे कसली वाटते रे’ ही त्यातली त्याची मराठी ओळ तर ‘राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लडी है’मध्ये ‘पांडोबा, पोरगी फसली रे फसली’ असं तो ठसक्यात म्हणतो.
मात्र त्याचं गाजलेलं मराठी गाणं म्हणजे ‘अश्विनी ये ना’ ‘गंमत जंमत’ या सिनेमातलं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायिलेलं द्वंद्वंगीत अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित झालेलं आहे. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. त्यांचंच संगीत असलेलं आणि किशोर-अनुराधा यांनी गायिलेलं ‘तुझी माझी जोडी जमली गं, अशी झक्कास पोरगी पटली’ हे गाणं ‘माझा पती करोडपती’मधलं गाणंसुद्धा गाजलं. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. ‘हा गोरा गोरा मुखडा, होय लागे चांद का तुकडा, बेभान करी, नादान करी, आम्ही झालो पुरे बदनाम’ या सुधीर नांदोडे यांच्या किशोर कुमार यानं गायिलेल्या गाण्याचं संगीत अनिल मोहिले यांचं. ‘घोळात घोळ’ या चित्रपटासाठी हे गाणं चित्रित झालं लक्ष्मीकांत बेर्डेवर.
‘गोरा गोरा मुखडा’मध्ये किशोरचं अनेक हिंदी गाण्यांत कानी पडणारं ‘यॉडलिंग’ ऐकू येतं. किशोर कुमार म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं. रेकॉर्डिंगच्या वेळीही सहगायक-गायिकांशी हसत खेळत त्याचं गाणं चालायचं. त्याच्या लहरीपणाचेही किस्से खूप गाजले, पण या मनस्वी गायक – अभिनेत्याचं जीवन स्वतःच्याच धुंदीत गेलं. 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोरचं अकाली निधन झालं तेव्हा सारा देश शोकाकुल झाला. किशोरचे अखेरचे संस्कार त्याच्या मूळ गावी करण्यात आले. इंदूरमध्ये शिक्षण घेतलेल्या किशोरला मध्य प्रदेशातील खांडवा येथील घराचा कधी विसर पडला नाही. तो स्वतःला किशोर कुमार खांडवावाला असंही गमतीने म्हणायचा.
किशोरचं जाणं रफी, मुकेश यांच्यासारखंच रसिक मनाला चटका लावून जाणारं. मात्र त्याचे स्वर आपण आजही ऐकू शकतो. किशोरचा भन्नाट अभिनय पाहू शकतो. या गायकांनी मराठी गीतं कमी गायिली. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना ती संधी कोणा मराठी संगीतकाराने द्यायला हवी होती असं वाटत राहतं.




























































