भटकेगिरी: कोल्हापूरचे ऋणानुबंध

2121

>> द्वारकानाथ संझगिरी

मध्यंतरी कोल्हापूरला जाताना मी जुन्या खुणा शोधत, जुन्या आठवणी चाळवत गेलो. तशी कार्यक्रमानिमित्त माझी कोल्हापूरला वर्षातून एखादी फेरी होतेच. तरी कोल्हापूरला जायचं म्हटलं की, मला आनंद होतो. कोल्हापूर काही लंडन, रोम, पॅरिससारखं किंवा अगदी मुंबईसारखं पर्यटकांच्या उडय़ा पडाव्यात असं शहर नाही, पण बऱयाचदा एखाद्या गावाकडे किंवा शहराकडे तुमच्या बालपणातल्या आणि तारुण्यातल्या आठवणी तुम्हाला खेचतात. बघता बघता तुम्ही त्या भूतकाळात रमता. भूतकाळातून पुन्हा वर्तमानकाळात आल्यावर आपलं काहीतरी हरवलंय असं वाटतं राहतं. ते हरवलेले दिवस पुन्हा सापडत नाहीत. कारण काळ उलटा फिरवता येत नाही. काळाच्या उदरात एकदा हरवलं की संपलं, तिथं ‘लॉस्ट ऍण्ड फाऊंड’ काऊंटर नाही. लॉस्ट म्हणजे लॉस्ट! आठवणीच्या रूपात ते दिवस तुमच्याकडे राहतात, एवढंच! केवळ त्यासाठी पुन्हा पाय वळतात. आता चकाचक रस्त्यावरून मुंबईहून सहा-सात तासांत मी कोल्हापूरला पोहोचतो. हा प्रवास सुखकारक असूनही मला ती लाल एस.टी. का आठवते? त्यावेळी एसटी ही फायद्यात चालणारी कंपनी होती आणि तो फायदा वाढवण्यासाठी गच्च भरलेल्या गव्हाच्या पोत्याप्रमाणे एसटीत माणसं कोंबली जायची. एसटीत खिडकीची जागा मिळणं आणि समोर किंवा बाजूला सुस्वरूप मुलगी असणं याला कपिलाषष्ठाrचा योग म्हणत. ज्या दिवशी एस.टी. खंडय़ाळाचा घाट कुठलाही अडथळा न येता पार करत असे, तेव्हा तो हमखास लागणाऱया लॉटरीचं तिकीट काढण्याचा दिवस मानला जाई. माझ्या आयुष्यात हे एकदाच घडलं. त्या दिवशी मी माझ्या प्रेयसीला मागणी घातली. ती ‘हो’ म्हणाली आणि लग्न अजून टिकलंय. यावरून त्या दिवसाचं महत्त्व लक्षात यावं.

तरीही तो प्रवास आठवला की, गुदगुल्या होतात. ती खिडकी मिळवण्याची धडपड, शेजारच्या सुस्वरूप ठेंगणीला तिच्या एका प्रेमळ कटाक्षावर आपली खिडकी देणं, एक करवंद किंवा जांभळाची पुडी तिला देणं या आठवणीतल्या रोमान्सची सर पुढे पहिल्या डेटला कॅण्डललिट डिनरला घेऊन जाणाऱया रोमान्सलाही नाही. कारण ती एसटी त्यातून उतरताना मनावर आठवणीचा एक क्रण ठेवून जायची. पुन्हा न भेटण्यासाठी आणि तो क्रण सतत त्या भेटीची आठवण देत राहायचा. प्रवासात खाण्याच्या जागा आणि गोष्टी ठरलेल्या होत्या! शिरवळला सकाळी पोहोचली एस.टी. तर गोड शिरा घ्यायचा आणि एरवी कधीही थांबली की, अंजिराची छोटी करंडी घ्यायला धडपडायचो मी! मग साताऱयात कंदी पेढे, किणी वाठारला चहा या गोष्टी ठरलेल्या. मधुमेह, रक्तदाब, वजन वगैरे गोष्टींचं वजन त्यावेळी मनावर नव्हतं. मन एक स्वच्छंदी फुलपाखरू होतं. शिरा-रबडीपासून पांढऱया रश्शापर्यंत कुठेही जाऊन बसायचं.

कोल्हापूरही छोटं, टुमदार होतं. आधी टांगा आणि पुढे पुढे ऑटो एस.टी. स्टॅण्डपासून घोळकरांकडे शुक्रवार पेठेत घेऊन जायची. खरं तर कोल्हापुरात एक दिवस रुळल्यावर ‘घोळकरांकडे’च्या ऐवजी ‘घोळकरांच्यात’ तोंडात यायचं. ‘शुक्रवार पेठेत’ न म्हणता मी कधी ‘शुक्रवारात’ म्हणायचो कळायचं नाही. मुंबईबाहेर महाराष्ट्रात मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणायची लोकांना सवय होती. माझी ओळख करून देतानाही ‘बॉम्बेहून आलोय’ अशी ओळख करून दिली जायची, पण माझ्या जिभेवर ‘मुंबई’ऐवजी ‘बॉम्बे’ शब्द कधीच आला नाही. मला ती रांगडी भाषा, रांगडी माणसं खूप आवडतात. ‘रांडेच्या’तलं प्रेम, जवळीक, ‘हो मित्रा’, ‘दोस्ता’ वगैरे कुठल्याही शब्दांत नाही. पद्या (प्रदीप), पप्या (पप्पू), प्रशा (प्रशांत), सत्या (सतीश) हे शॉर्टफॉर्म तर मला भावतात. त्यातून फक्त जिव्हाळा जाणवतो. माझ्या तोंडात चपलेला ‘पायताण’ हा शब्द कधीच रुळला नाही. पण ‘काढू का पायताण?’ यात म्यानेतून काढलेल्या तलवारीची जरब आहे. त्यापुढे चप्पल पचपचीत वाटते.

पंधरा-वीस दिवस मेमध्ये कोल्हापूरला राहून मी काय करायचो? फार काही नाही. ‘घोळकरांच्यात’ साधा, पण प्रेमाने ओथंबलेला पाहुणचार घेणं, तिथल्या मित्रांबरोबर गप्पाटप्पा मारणं. गंगावेशात एकाकडे खूप जुनी हिंदी सिनेमातली गाणी होती…ती ऐकणं, इतर कुणीही शिरणार नाही अशा कळकट हॉटेलात जाऊन अर्ध्या चहावर एक अख्खी सिगारेट चोरून ओढणं आणि वास लपवायला एक हॉल्स खाणं, कोल्ड ड्रिंक हाऊसमध्ये वेगवेगळी पेय पिणं, संध्याकाळी पापाच्या तिकटीच्या वाचनालयातून एखादं पुस्तक आणणं (क्रिकेटपटूंची नावं विसरली जातात, मैत्रिणींचीही नावं विसरली जातात, पण मी पापाची तिकटी विसरलेलो नाही), मग संध्याकाळी महाद्वार रोडवरून थेट रंकाळ्यापर्यंत तलम कपडय़ांतल्या पक्ष्यांची पाहणी! (काही पक्ष्यांचे मला पिंजरेही ठाऊक होते), येताना अंबाबाईला नमस्कार करून तिच्यावर काही जबाबदाऱया सोपवून घरी परतणे आणि हो, सकाळी ‘इंद्रधनु’ वर्तमानपत्रातल्या सिनेमांच्या आकर्षक जाहिराती पाहून किमान एक दिवसआड एक सिनेमा पाहणं, कधीतरी उमा टॉकीजला जाऊन इंग्लिश सिनेमा पाहणं. त्यात चोरगेचा चहा, मिसळ आणि चव्हाणची लक्ष्मी मिसळ. संपली धमाल.

कॉलेजमधल्या त्या पाच-सहा वर्षांत कोल्हापूरला यापलीकडे काही केलं नाही, पण त्या आठवणींचे ऋणानुबंध अजून घट्ट आहेत. आता कोल्हापूर खूप मोठं झालंय. मी रस्ता चुकावा एवढं मोठं. दिलीप गुणे आणि आंद्या पाटणे सोडून सर्व मित्र इतरत्र विखुरले. सर्व ‘पक्षी’ दूरदेशी गेले. महाद्वार रोड अधिक गर्दीचा झाला. देवीचं चटकन दर्शन ही रोमहर्षक घटना वाटायला लागली. तिथले लोक माझ्या लिखाणावर, बोलण्यावर प्रेम करतात तरीही लहानपणीच्या आठवणी विस्मृतीच्या पडद्याआड जात नाहीत. व्हेल माशाप्रमाणे त्या उसळी मारून वर येतात. आंद्या पाटणेला मी जेव्हा त्याच्या प्रचंड मोठय़ा दुकानात भेटतो किंवा दिलीप गुणेच्या घरी मिसळ खाऊन कोल्हापूर सोडतो तेव्हा मन कोल्हापुरात रेंगाळत राहतं, शरीर तेवढं गाडीत बसतं!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या