लेख – कोकणातील जलप्रलय का झाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पंढरीनाथ सावंत

कोकणात गेल्या महिन्यात महापुराने थैमान घातले. महाड, चिपळूणसारखी शहरे 15 फूट पाण्यात गेली. इतर ठिकाणी बाजारपेठांमध्ये कधी नव्हे तेवढे पाणी भरले. तळियेसारख्या दरड कोसळण्याच्या भयंकर दुर्घटना घडल्या. हे असे का घडले, यंदाच का घडले, त्यामागची कारणे कोणती, त्यावर उपाय कोणते याबाबतचे विश्लेषण करणारा लेख.

कोकणात गेल्या महिन्यात महापुराने जो हाहाकार उडवला तसा जलप्रलय मी माझ्या हयातीत पाहिला नव्हता. दरडी कोसळलेल्या पाहिल्या होत्या. रस्ते आणि जमिनी यांना अर्धा अर्धा मैल लांबीच्या आणि अज्ञात खोलीच्या भेगा पडलेल्या पाहिल्या होत्या. राजापूरला इंग्रजांच्या वखारीपासून वर धृतपापेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याला असा तडा गेला होता की, एक बाजू दोन फूट खाली गेली होती. बेसुमार पाऊस पडला होता. पण जलमय म्हणावे असे काही घडले नव्हते. ते या वर्षी जुलै महिन्यात घडले.

वर्षाचा पाऊस चार दिवसांत

जवळजवळ वर्षभराचा पाऊस तीन-चार दिवसांत पडला. कोकणातील महाड, चिपळूणसारखी शहरे 15 फूट पाण्यात गेली. महाडच्या बाजारपेठेत लोकांच्या घरातले सगळे सामान वाहून गेले. महाड, चिपळूण, संगमेश्वर, रोहा, नागोठणे यासारख्या बाजारपेठांमध्ये इतके पाणी कधी भरले नव्हते. पूर्वी नेहमीपेक्षा बराच जास्त पाऊस पडण्याचे प्रसंग घडले नव्हते असे नाही. गावात फूट-दोन फूट पाणी कधी भरलेच नव्हते, असे नाही अथवा असे पाणी भरले म्हणजे त्यानं ‘उथब आला’ म्हणत. त्याची कोणाला कधी भीती वाटली नाही. लहानमोठी पोरे त्यात मस्त डुंबत असत. केवढाही मोठा पाऊस पडला तरी बंदर-पेठा बुडणार नाहीत अशीच व्यापाऱयांची खात्री होती.

मग आताच असे का घडले?

नद्यांच्या खाडय़ा जेथून सुरू होतात त्या बाजारपेठांमध्ये पाणी इतके का शिरले? कोकणात प्रत्येक मोठय़ा नदीवर अशी बंदरे आणि बाजारपेठा आहेत. कारण पूर्वी या नद्यांमधून वर येणारी गलबते हाच वाहतुकीचा मोठा आधार होता. प्रत्येक बंदराच्या वर घाट होते. महाडला वाटेवर पांचगणी, कशेडी असे घाट संलग्न होते. चिपळूणला कुंभार्ली घाट होता. संगमेश्वरला अंबा घाट होता.

खाडीमधून येणारी गलबते बंदराभोवतीच्या गावांच्या गरजा भागवीत आणि घाटावरून आलेल्या बैलगाडय़ा तिकडच्या गावांना लागणारा माल नेत. हे सतत चालले असे. त्यामुळे अशा बंदरांमध्ये बैलगाडय़ा सोडवण्यासाठी गाडीतळ होते. महाडला वीरेश्वराच्या मंदिरापासून खाली 1000 गाडय़ा राहील असा गाडीतळ होता. सगळे बिनबोभाट चालले होते.

प्रदेशात काही खास घडले की त्याच्या कक्षा वयस्क लोकांच्या आठवणीतून खाली येतात. त्यामध्ये सांगणाऱयांची बेरीज-वजाबाकी असतेच. पण त्यापूर्वी कधी असा अनर्थ घडल्याचे ऐकण्यात नव्हते.

कधीतरी व्हायचेच होते ते आता झाले. त्याचा आरंभ वरून झाला आणि परिणाम खालून झाला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य जन्माला आले त्या वेळी सहय़ाद्री पर्वत सुरुवातीपासून शेवटपर्यंत हिरव्या रंगाने झाकलेला होता. त्याच्यावर घनदाट जंगल होते. ते सपाटीकडे विरळ होत गेले होते. मागील काही दशकांमध्ये सगळय़ाच क्षेत्रांमध्ये नफेखोरांनी उचल खाल्ली. त्यातल्या काहींनी सहय़ाद्रीवरचे हिरवेगार जंगल तोडून याचा कोळसा करण्याचे मनावर घेतले. जंगलतोडय़ांचे गट आणि गावागावातली शेलकी मंडळी यांचे संगनमत झाले. जंगल खात्याच्या निर्बंधांना शह देतील अशा सबबी तयार झाल्या.

सहय़ाद्री बोडका केला!

जंगल तुटायला लागले. मुंबई-गोवा रस्त्याच्या कडेला सहज दिसतील इतक्या अंतरावर कोळशाच्या भट्टय़ा दिसू लागल्या. त्या अनेक वर्षे रात्रंदिवस धगधगत होत्या. सहय़ाद्रीवरचे रान मुळांसकट नाहीसे झाले. पावसाच्या झडीमुळे वाहून जाणाऱया मातीस अटकाव राहिला नाही. ती सगळी माती आजतागायत कोकणातल्या खाडय़ांमध्ये येत गेली. खालून भरती आली की साठत गेली. खाडय़ा गाळाने भरत राहिल्या. यातली सर्वात मोठी शोकांतिका धरमतरच्या खाडीची. 1920-30 सालापर्यंत नागोठण्यापर्यंत लाँच येत होती. धरमतरपर्यंत बोट म्हणावी एवढी मोठी लाँच येत होती. पोहण्याचे विक्रम होत होते. आज या खाडीत होडीसुद्धा चालत नाही. एका कारखान्याची सपाटतळाची वाहने आणण्यासाठी तुडूंब भरलेल्या गाळात मार्ग तयार करावा लागतो.

खाडीचे पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेची वाट लागल्याच्या परिणामी दोन्ही तीरांच्या पलीकडे खार जमीन तयार झाली असून ती सतत वाढत आहे. कोकणातल्या जवळजवळ प्रत्येक खाडीचीं पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी किंवा नाहिशी झाली आहे. त्यामुळे वरच्या बंदरांमध्ये ज्या बाजारपेठा आहेत त्यामध्ये एकदोनदा तरी पाणी भरते. कारण खाडीला भरती आली की, पाणी जेवढे वाहून जायला हवे तेवढे जात नाही. यंदा पावसाचा कहर झाला. उभ्या वर्षाचा पाऊस चार दिवसांमध्ये पडला.

यावर उपाय काय?

1. संपूर्ण सह्याद्रीवर पुन्हा जंगलाचे झाकण तयार करणे.
2. सगळय़ा खाडय़ांमधला गाळ काढून तो दोन्ही तीरांवर रचणे. त्यावरून रस्ते तयार करणे. सरकारच्या रस्ते बांधणीच्या कामासाठी डोंगरांवर संकट येते. त्याऐवजी हा गाळ वापरणे. ज्यांना बांधकामासाठी माती हवी असेल त्यांना, त्यात शेजारची राज्येसुद्धा येतात, त्यांना विकणे आणि पैसा उभा करणे. तरच हे संकट टाळता येईल. कारण-

‘इंटर गव्हर्नमेंट पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’चा 6 वा अहवाल सांगतो-

1. हिंदी महासागराचे तापमान वाढत असल्याने समुद्रपातळी वाढेल व सखल किनारी भागात पूरपरिस्थिती उद्भवेल.
2. हिंदुस्थानात काही ठिकाणी वारेमाप पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा अनुभवास येतील.
3. समुद्रपातळीत तीक्र वाढीच्या घटना पूर्वी 100 वर्षांत एकदा घडत. या शतकाअखेरीस दरसाल घडण्याचा अंदाज आहे.

साऱया जगाचेच तापमान वाढल्यामुळे जगात या वर्षी सगळय़ाच देशांमध्ये जलप्रलयाने थैमान घातले आहे. यातून दक्षिण धुवाजवळचे ऑस्ट्रेलिया खंडही सुटलेले नाही, तर दुसरीकडे जगभर वणव्यांची लाट आली आहे. यातून आपल्याला निभावयाचे असेल तर किमान दोन गोष्टी

करायला हव्या-

  • सह्याद्रीचे जंगल वाढवणे.
  • नद्यांमधला सगळा गाळ काढून तो पुन्हा समुद्रात न टाकता जमिनीवरच वापरणे.

निसर्गाने आपल्याला जबरदस्त इशारा दिला आहे. त्यापासून बोध घेण्याची जबाबदारी आपली आहे!