आभाळमाया – ‘कायपर बेल्ट’

>> दिलीप जोशी

‘प्लुटो’ नावाच्या नेपच्युनपलीकडच्या बर्फाच्या गोळय़ाचा शोध लागल्याने संशोधकांची तहान थोडीच भागणार होती. नित्यनवे संशोधन ‘दिल मांगे मोअर’ पद्धतीचे असते. यापेक्षा विश्वात आणखी नवे काय आहे ते जाणून घ्यायला हवे अशा अक्षम्य संशोधक वृत्तीमधूनच आपल्याला आजचे ‘विश्व’ थोडे तरी समजले आहे, असे म्हणायला हवे. थोडे तरी म्हणण्याचे कारण असे की एकूण विश्वापैकी आपण पाहू शकतो असे म्हणजे ‘ऑब्झर्वेबल युनिव्हर्स’ अवघे चार टक्के आहे! उरलेल्या 96 टक्क्यांत 73 टक्के डार्क एनर्जी आणि 23 टक्के डार्क मॅटर.

परंतु हे ‘दृश्य’ म्हणजे चार टक्के विश्वच अब्जावधी तारे, त्यांच्या भोवतीच्या सर्व ग्रहमाला, अब्जावधी दीर्घिका हे सारे काही या चार टक्क्यांत सामावलेले आहे. त्यातच शोध घेताना आपली दमछाक होतेय. अर्थात शास्त्र्ाज्ञांना मात्र तसे वाटत नाही. त्यांना हे आव्हान वाटते आणि संशोधक वृत्तीसाठी ते योग्यच आहे.

खुजा ग्रह प्लुटोच्या पलीकडे असणारे आणि आपल्या सूर्याभोवतीच फिरणारे अनेक खुजे आणि दगडगोटे, अशनी आहेत. मंगळ आणि गुरूच्या मधोमधे जसा अशनीचा ‘मेन बेल्ट’ आहे. तसाच प्लुटोपलीकडचा हा कायपर बेल्ट 1992 मध्ये डेव्हिड जेविट आणि जेने ल्यू यांनी सूर्यापासून, पृथ्वीच्या अंतराच्या 49 पट दूरवर काही सापडल्याचे एका सेमिनारमध्ये सांगितले. त्याचे नाव त्यांनी कायपर बेल्ट-1 असे ठेवले. हा बहुदा गोठलेल्या मिथेनचा प्लुटोसारखा गोळा सूर्याभोवती फिरत होता. 2006 पर्यंत असे 1100 गोलक या पट्टय़ात समाविष्ट झाले. त्यांची संख्या आता वाढली आहे. जेराल्ड कायपर यांनी सूर्यमालेच्या अतिदूरच्या भागातून काही धुमकेतू येतात आणि प्लुटोपलीकडे लघुग्रहांचा पट्टा असावा असे भाकित केले. त्यांचे नाव त्या पट्टय़ाला मिळाले.

या गोलकांपैकी काही ‘शेरॉन’ या प्लुटोच्या उपग्रहापेक्षा तर काही खुद्द प्लुटोपेक्षा आकाराने मोठे आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे सेडना क्वावार इ. या पट्टय़ातील अनेक गोलक असून त्यातील मोजता येतील अशांची संख्या 35 हजारांचा आकडा पार करून गेली आहे. यापैकी काहींचा व्यास तर 100 किलोमीटर असल्याने तो वसाहतयोग्य म्हणावा लागेल. पुढच्या काळात तिथे निदान याने तरी उतरवता येतील आणि सूर्यमालेपलीकडे डोकावण्यासाठीचा ‘तळ’ उभारता येईल, अशी कल्पना करायला काय हरकत आहे. यापैकी किमान तीस गोलकांना त्यांचे स्वतःचे ‘उपग्रह’ आहेत.

आपली सूर्यमाला तयार होत असताना बर्फाळ असे लाखो गोलक दूर अंतररावर जन्माला आले. गुरूच्या पलीकडे असलेल्या या गोलकांना मोठय़ा ग्रहांनी आणखी दूर ढकलले आणि ते नेपच्यूनपलीकडे स्थिरावले. हे तुकडेही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने त्याच्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत राहिले आणि त्यांचा एक पट्टा तयार झाला. तोच कायर बेल्ट. मात्र त्यांना गोलाकार लाभला तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे. प्लुटोचे गोलत्व हीसुद्धा नेपच्यूनचीच देणगी. यातील काही गोलक (अशनी, लघुग्रह) नेपच्यून आणि प्लुटोच्या कक्षेतही येतात.

त्यातील काही कायपर बेल्टची कक्षाही ओलांडून जातात. सूर्यापासून 67 ए. यू. (1 एयू = 15 कोटी कि.मी.) अंतरावर असलेल्या एरिसची कक्षा प्लुटोच्या आत सुरू होते आणि कायपर बेल्ट भेदून जाते. अशी या एरिसची विवृत्तता किंवा लंबवर्तुळाकार कक्षा.

पृथ्वीवरून अवकाशात याने सोडायला सुरुवात झाल्यावर त्यातील यशस्वी याने गुरू-शनीपर्यंत तर गेलीच, पण प्लुटोपलीकडे जाणाऱया ‘व्हॉएजर-2’ ने आपली सूर्यमालेची मर्यादाही ओलांडली. केसरबाई केरकर यांच्या आवाजातील गाणे (चीज) अनेक सांगितिक स्वरांप्रमाणे व्हॉएजरवरून आपली सूर्यमाला भेदून गेले. ‘भेदिले शून्य मंडळा’ही उक्ती आताच आधुनिक विज्ञान आपल्याला प्रत्यक्ष दाखवत आहे.

सध्या ज्ञात असलेली सूर्यमालेची मर्यादा कायपर बेल्टशी संपते. परंतु विज्ञानात नेहमी स्वल्पविराम असतो. पूर्णविराम कधीच येत नाही. कारण पुढे काय? हा प्रश्न नव्या संशोधनाला चालना देतच राहतो.

आपली प्रतिक्रिया द्या