
दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आणि गोविंदा रे गोपाळाचा गजर होत असताना आठकण होते माखनचोर कान्हाची. दही-दुधाची चोरी करणारा हा नंदलाला हिंदुस्थानातल्या ‘दुधो नहाओ पुतो फलो’च्या संस्कृतीचं प्रतीक ठरावा. अशा या दह्यादुधाच्या देशातला गारेगार अणि तितकाच खास पदार्थ म्हणजे लस्सी…
हिंदुस्थानी स्मुदी म्हणून जगभरात लस्सी ओळखली जाते. ख्रिस्तपूर्व 1000 काळात लस्सीचा उल्लेख सर्वप्रथम झालेला दिसून येतो. पंजाब प्रांतात लस्सीचा उगम झाला असावा असं संशोधकांचं म्हणणं तिथलं दुधदुभतं पहाता निश्चितच पटतं. ‘लसिका’ या संस्कृत शब्दात या लस्सी शब्दाचं मूळ दडलेलं आहे. लसिका म्हणजे द्रवमय पदार्थ.
लस्सीच्या जन्माची कहाणी आयुर्वेदाशी जोडली जाऊ शकते. आयुर्वेदाने दह्याचं आहारातलं महत्व अधोरेखित केलं आहे. मात्र ते करताना दह्याला मध, खडीसाखर अथवा तूप लावल्याशिवाय खाऊ नये असा नियमही केला. त्यामुळे दही, मध हे मिश्रण आयुर्वेदिक अंगाने तत्कालीन समाजात रुढ झालं. आपल्या पूजेतल्या तीर्थप्रसादातल्या पंचामृताचा संदर्भ इथे स्पष्ट होतो.
आयुर्वेदाने सांगितलेलं हे महत्व पुढे रोजच्या जीवनात खवय्यांनी अधिक फुलवलं. त्यात मधासह काळाच्या ओघात साखर आली. प्रांताप्रांतागणिक सुकामेका, गुलाबाच्या पाकळय़ा, फळफळाकळ… अशी रुचकर भर पडत गेली आणि जन्माला आली आपली लाडकी लस्सी. गोडी लस्सी आणि खारी लस्सी असं वैविध्य जपणारी लस्सी गुलाब, केशर, मॅंगो अशा विविध स्वादात, कुल्हडमधून खास मलई मारके हिंदुस्थानी मंडळींना रिझकू लागली. हिंदुस्थानी मंडळी एकूण दुधाच्या 9 टक्के दुधाचं दही लावतात. ही आकडेवारीसुद्धा लस्सीच्या लोकप्रियतेचं रहस्य सांगून जाते.
आज हिंदुस्थानी लस्सीने जगभरात इंडियन स्मुदी म्हणून नाक? कमावलंय. ग्रेट ब्रिटनमध्ये लस्सीची लोकप्रियता खास आहे. काही पेयं विशिष्ट वयोगटापुरती लोकप्रिय असतात. पण लस्सी आबालवृद्ध सगळ्यांना प्रिय आहे.
ब्रॅण्डेड असो का एखाद्या ठेल्यावरची लस्सी, घुसळलेल्या पांढऱयाशुभ्र दह्याचा गोडका काचेच्या ग्लासात किंवा कुल्हडमध्ये उतरतो. वरून सुकामेक्याची किंवा गुलाबाच्या पाकळय़ांची पखरण होते आणि चेरी ऑन टॉपसह लादीसारखी पसरलेली मलई या लस्सीवर विराजमान होते. चमच्याने हे मधुरमंथन जीभेवर विसावतं तेव्हा त्या घट्ट मिट्ट मिश्रणात आपण विरघळत जातो.
दहीहंडी फोडताना मटक्यातल्या दह्यात न्हाऊन निघणाऱ्या गोविंदांसारखीच अवस्था निर्माण करण्याची ताकद या लस्सीत नक्कीच आहे.




























































