ठसा :  उमेश शेट्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  दुर्गेश आखाडे 

रत्नागिरीतील तेलीआळी नाक्यावरील फुटपाथवर चप्पल विकणार्‍या तरुणाने मनाशीच ठरवलं की, आयुष्यात काहीतरी करायचे. ते सर्व या तरुणाने केले. रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये असे त्या तरुणाचे नाव. उमेश शेट्ये यांचे नुकतेच निधन झाले. अतिशय गरिबीतून पुढे आलेले उमेश शेट्ये तेलीआळीच्या नाक्यावरील फुटपाथवर चप्पल विकत असत. त्यानंतर त्यांनी पानपट्टी सुरू केली. शिक्षण माध्यमिक शाळेपर्यंतच झाले तरी व्यापाराचे गुण त्यांच्या अंगी जन्मतः होते.

आयुष्यात काहीतरी करायचं ही जिद्द असलेले शेट्ये राजकारणात आले. ते काँग्रेस पक्षाचे काम करू लागले. 1991 मध्ये रत्नागिरी नगर परिषदेत ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले. 2001 मध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शेट्ये दुसर्‍यांदा नगराध्यक्ष झाले. 2006 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी नगराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत जिल्हा प्रवक्तेपदी त्यांनी काम केले. मध्ये 2011 च्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेतून ते पुन्हा एकदा नगरसेवक झाले. दोन वेळा शिवसेनेकडून कोकण स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणूक लढवली. 2014 मध्ये शेट्ये यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले. 2016च्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. रत्नागिरी शहराचे दोन वेळा नगराध्यक्ष होण्याच्या मान अशोक मयेकर आणि उमेश शेट्ये यांच्या नावावर आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदावर राहण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या कारकीर्दीत रत्नागिरी शहरात अनेक विकासकामे झाली. त्यामध्ये स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृह, जलतरण तलाव, जिजामाता उद्यान आणि संसारे उद्यान, शहरातील अंतर्गत रस्ते, 80 फुटी रस्ता, व्यायामशाळा उभारण्यात त्यांचा वाटा होता.

नगराध्यपदाच्या कारकीर्दीत त्यांनी विविध क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांना चालना दिली. रत्नागिरी नगर परिषद कर्मचार्‍यांचे स्नेहसंमेलन आयोजित करून ते स्वतः त्यामध्ये नृत्याविष्कार सादर करत असत. रत्नागिरी शहराने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकावला होता. लाल गणपतीचे भक्त असलेल्या शेट्ये यांनी लाल गणपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून  अनेक उपक्रम राबविले. वैश्य वाणी समाजाचे ते नेते होते. राजकारण माझा छंद आहे असे सांगणारे शेट्ये यांनी व्यापारात स्वतःचा ठसा उमटवला होता. नगर परिषदेच्या कामाचा अनुभव आणि अभ्यास त्यांच्या जवळ होता. त्यामुळे त्यांनी नगर परिषदेच्या कामकाजात आपली छाप पाडली होती. शिक्षण कमी असले तरी नगर परिषदेच्या कामकाजाचा त्यांचा अभ्यास असल्यामुळे ते कायम चर्चेत राहिले. संख्याबळ कमी असताना ‘वन टू का फोर’ करत नगराध्यक्षपद पटकावण्याचे कसब दाखवून स्वतःमधील राजकारणी त्यांनी राजकीय पटलावर सिद्ध केला होता. शेट्ये यांचे ‘बनेगा तो बादशाह’ हे नेहमीचे वाक्य असायचे. या वाक्यामुळे ते अधिक चर्चेत राहिले.   कधी विरोधकांसोबत तर कधी स्वपक्षात त्यांचे वाद रंगले, पण कुरघोडी करण्यात त्यांचा हातखंडा होता.