ठसा – उस्ताद राशीद खान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

एका गायकाची वैशिष्टय़े तरी किती असावीत? शास्त्रीय गायकीसोबतच उपशास्त्रीय गायकीतही तेवढीच ताकद, पंडित भीमसेन जोशी यांजकडून ‘हिंदुस्थानी शास्त्रीय पंठ संगीतातील भविष्यातील आश्वासक नाव’ असे प्रशस्तीपत्र, किराणा घराण्याशी जवळचे नाते आणि त्याच वेळेस चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाल्यावर तेथेही आपलं प्रभुत्व दाखवण्यात यशस्वी आणि हे सगळे प्रकार सारख्याच ताकदीने साकारत असतानाच एकीकडे संगीत मैफलीतील श्रोते आणि दुसरीकडे डिजिटल युगातील यूटय़ूबवरचे फॅन्स अशांना जोडणारा आवाज म्हणजे उस्ताद राशीद खान. आपल्या हिंदुस्थानात संगीतातील वैविध्य आणि दीर्घकालीन परंपरा यांची नेहमीच दखल घेतली जाते. त्याबाबत विशेष आदर आहे आणि त्यात शास्त्राrय संगीतातील बारकाव्यांचा आपल्या गायकीतून प्रत्यय देणारे गायक हे कायमच संगीत रसिकांची दाद मिळवण्यात यशस्वी ठरतात. उस्ताद राशीद खान यांचे नाव त्यात विशेष उल्लेखनीय. 9 जानेवारी 2024 रोजी उस्ताद राशीद खान यांचे निधन झाले आणि गैरफिल्मी गाणी व चित्रपट गीत गायन यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला. राशीद खान यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तर प्रदेशातील बदाऊन जिह्यातील सहसवान येथे झाला. इनायत हुसेन खानसाहेब त्यांचे आजोबा, तर उस्ताद गुलाम मुस्तफा खान त्यांचे काका. त्यांनी संगीताचे प्रारंभिक प्रशिक्षण त्यांचे आजोबा उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून घेतले. राशीद खानना खरं तर क्रिकेटर व्हायचे होते. लहानपणापासून संगीतात रस नव्हता. मात्र काका निसार हुसेन यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना मुंबईत बोलावून प्रशिक्षण दिले आणि मग एक नवीन तारा जणू उदयाला आला, पण त्यातही एक किस्सा प्रसिद्ध आहे. एका कार्यक्रमात राशीद खान यांचा गाण्याचा मूड नव्हता, पण आजोबा आणि काका यांनी दरडावल्यावर ते गायले आणि मग ‘सुरांच्या दुनियेत’ गुंतत गेले. स्वतः आनंद घेत घेत इतरांनाही त्यांनी मनोमन आनंद दिला. ते खूप रियाझ करण्यासाठी ओळखले जाऊ लागले. ख्याल गायकी, तराणा, बंदीश यांवर हुकमत प्राप्त करणारे गायक ही त्यांची ओळख झाली. ध्वनिमुद्रण आणि मैफल अशा दोन्हीत सारख्याच लयीत वा पट्टीतील गायन ही त्यांची खासीयत झाली.

राशीद खान हे रामपूर-सहसवान घराण्यातील होते. या घराण्याची सुरुवात इनायत हुसेन खान यांनी केली होती. उस्ताद राशीद खान यांना पद्मभूषण, पद्मश्री, बंगभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ग्लोबल इंडियन म्युझिक अकादमी पुरस्कार आणि मिर्ची संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांवरचा त्यांचा गीतसंग्रह विशेष उल्लेखनीय गोष्ट ठरली. हसतमुख, अभ्यासू, मिश्कील व्यक्तिमत्त्व ही त्यांची आणखी एक विशेष ओळख आणि खाण्यात कायमच बिर्याणीला पसंती हे त्यांचे वैशिष्टय़. गायनात मुलतानी, अहिर भैरव, जौनपुरी राग हे त्यांचे वैशिष्टय़ त्यांच्या गायनातील विविधता अधोरेखित करणारे ठरले. शास्त्रीय संगीत गायक कधीच कोणत्याच चौकटीत राहून वाटचाल करत नाही. सतत येत असलेल्या नवीन संधी व आव्हानांवर मात करत प्रवास करतो. उस्ताद राशीद खान यात कायमच यशस्वी. म्हणून तर ‘नैना पिया से’साठीचे त्यांचे सुफी फ्यूजनही रसिकांना आवडले.

राशीद खान यांनी ‘आओगे जब तुम सजना’, ‘तोरे बिना मोहे चैन नहीं, ‘तू बन जा गली’ आणि ‘दीवाना कर रहा है’सारखी सर्वोत्तम गाणी गायली. ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटात राहुल देशपांडे यांच्या संगीतात त्यांच्या गायकीचा अनुभव मिळतो. राशीद खान यांचा आवाज रसिकांच्या हृदयाला भिडायचा याचं कारण त्यांच्या गायनात त्या गाण्याचे व्यक्तिमत्त्व पुरेपूर असे. गीतमुद्रा ही त्यांची खासीयत. त्यांनी गायलेले ‘आओगे जब तुम सजना’ हे गाणे कायमस्वरूपी सुपरहिट. या गाण्याचे आजही आकर्षण कायम आहे. उस्ताद राशीद खान यांचे ‘निर्गुण’, ‘रिफ्लेक्शन’, ‘द सांग्ज ऑफ शिवा’, ‘व्हॉईस ऑफ इंडिया’, ‘नैना पिया से’, ‘साजन मोरे घर आओ’ असे अनेक गीतसंग्रह लोकप्रिय आहेत. ‘मन्टो’, ‘इश्किया’, ‘दशहरा’, ‘शादी मे जरूर आना’, ‘राज 3’, ‘माय नेम इज खान’, ‘जब वी मेट’ वगैरे चित्रपटांसाठी ते गायले, पण त्यांची ओळख शास्त्राrय संगीतातील गायक अशीच आहे आणि त्या वैशिष्टय़पूर्ण वाटचालीने आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. ते कायमच आठवत राहतील, ऐकावेसे वाटतील.