ठसा – ले. जन. माधुरी कानिटकर

महाराष्ट्र सरकारने नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना केली व देशातील ते चौथे विद्यापीठ ठरले असून आतापर्यंत 13 आरोग्य विद्यापीठे देशात स्थापन झाली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि भारतीय पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण यांच्या समतोल विकासासाठी तसेच आरोग्य विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता नियोजनबद्धरीत्या वाढण्याच्या दृष्टीने राज्यात या विद्यापीठाची निर्मिती केली आहे. या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, त्यांचे सैन्य दलातील सध्याचे पद असे होते की निवृत्तीनंतर अनेक संधी त्यांच्याकडे चालत आल्या असत्या. अशा व्यक्तीची महाराष्ट्रातील एकमेव आणि महत्त्वाच्या असलेल्या नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती होणे या विद्यापीठाच्या उन्नतीच्या आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1960 रोजी कर्नाटकातील धारवाड येथे एका मराठी कुटुंबात झाला. संरक्षण क्षेत्राची आवड असल्याने माधुरी मॅडमनी पुणे येथील सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) 1978 मध्ये प्रवेश घेतल्यानंतर एमबीबीएसच्या तिन्ही टप्प्यांत  पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिली जाणारी कलिंग ट्रॉफी मिळविली. या व्यतिरिक्त शैक्षणिक आणि अतिरिक्त-अभ्यासक्रमातील पदवीधर शाखेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारे राष्ट्रपतींचे सुवर्ण पदकही त्यांना देण्यात आले होते. 1982 मध्ये वैद्यकीय पदवी मिळताच त्यांना सैन्यदलात कमिशन मिळाले. वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एम.डी.(शिशुरोग तज्ञ) ही पदवी त्यांनी मुंबईमधून घेतली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली येथे बालरोगशास्त्र नेफरोलॉजीचे प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय विद्यापीठ हॉस्पिटल सिंगापूर आणि ग्रेट ऑर्मांड स्ट्रीट हॉस्पिटल, लंडन या नामांकित संस्थांची फेलोशिप त्यांना मिळाली. त्यांनी पुणे येथील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर आणि बालरोगशास्त्र विभागप्रमुख म्हणूनही काम केले आहे. आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस आणि आर्मी हॉस्पिटलमध्ये (रिसर्च अँड रेफरल) प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांनी  सैन्य वैद्यकीय कॉर्पोरेशनमध्ये प्रथम बालरोगशास्त्र नेफ्रोलॉजी सेवा सुरू करण्याचे मोलाचे काम केले, तसेच त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ पेडियाट्रिक नेफरोलॉजीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

28 जानेवारी 2017 रोजी त्यांनी पुणे येथील अल्मा-मेटर सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि उप-कमांडंटचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर उधमपूर येथील नॉर्दन कमांडमध्ये मेजर जनरल (मेडिकल) म्हणून काम केले. त्यांच्या विविध कामांची पावती म्हणून 29 फेब्रुवारी 2020 लेफ्टनंट जनरल (सैन्य दलातील दुसऱ्या क्रमांकाचे उच्च पद) देण्यात आले. असे पद मिळवणाऱ्या त्या देशातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील प्रथम महिला आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पती राजीव कानिटकर हेही लेफ्ट. जन. म्हणून निवृत्त झाले असून हे सैन्य दलातील तीन स्टार मिळवणारे एकमेव दाम्पत्य आहे. माधुरी कानिटकर यांना एकदा जीओसी-इन-सी प्रशंसापत्र आणि पाच वेळा लष्करप्रमुख प्रशंसापत्राने सन्मानित  करण्यात आले आहे. याशिवाय 2014  मध्ये त्यांना विशिष्ट सेवा पदक आणि 2018 मध्ये अति विशिष्ट सेवा पदकही देण्यात आले होते. ले. जन. माधुरी कानिटकरांना अध्यापन व संशोधनाचा एकूण 22 वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2008 साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. डॉ. माधुरी यांनी विविध क्रमिक पुस्तकात 15 प्रकरणे लिहिली असून त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. 2017 मध्ये एएफएमसीमध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार 10 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपाल कोश्यारी यांनी न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे.

  • विलास पंढरी
आपली प्रतिक्रिया द्या