लेख : वीज म्हणाली माणसाला…

>> दिलीप जोशी (khagoldilip@gmail.com)

ग्रीष्म संपता मृगापरी मृग धावत हा आला, घेऊनि मेघांच्या माला।

कलाबूतची वीज चमकते त्यावर थरथरुनी, आले नवे नवे पाणी।।

ही कविता शाळेत समूहाने म्हणत असताना खिडकीबाहेर खरंच धो धो पाऊस कोसळत असायचा. ढगांचा गडगडाट, त्यात विजांचा कडकडाट मनात धडकी भरवायचा. भयचकित नजरेने सारे आकाशाकडे नजर लावायचे. कधीतरी कानठळय़ा बसवणारा आवाज गगनातून उमटला की बाई म्हणायच्या ‘वीज पडली बहुतेक कुठेतरी.’ मग आणखीच धास्ती वाटायची, पण त्याचबरोबर गडगडणाऱ्या मेघमालेतलं विजांचं तांडव पाहायला मौजही वाटायची.

ढगांच्या टकरीतून वीज कशी निर्माण होते, क्वचित कुठे तिचा लोळ पृथ्वीकडे कसा झेपावतो याची वैज्ञानिक कारणं आता ठाऊक आहेत. बेंजामिन फ्रँन्कलीनने पाऊस पडत असताना पतंगाच्या दोरीला लोखंडी किल्ल्यांचा जुडगा बांधून ढगातील वीजवहनाचा अनुभव घेतला. कालांतराने कृत्रिमरीत्या निर्माण केलेली वीज अनेकांच्या प्रयत्नांनंतर काचेरी गोळय़ात गोठवण्यात एडिसनला यश आलं आणि न्यूयॉर्कच्या पर्ल स्ट्रीटवर जगातले पहिले विजेचे दिवे उजळले. हिंदुस्थानात आपल्या मुंबईत पहिल्यांदा विजेचे दिवे आले. जगभर विजेवर चालणारी असंख्य उपकरणं आली. आज आपलं त्यांच्यावाचून चालणारच नाही.

यावरून आठवली ती अलीकडच्या एका संशोधनाची बातमी. माणूस म्हणजे आपले पूर्वज दोन पायांवर चालायला लागले त्यामागे जी कारणे आहेत त्यामध्ये आकाशात चमकणारी वीज हेसुद्धा एक कारण आहे. उक्रांतीच्या काळाचं चतुष्पाद प्राण्याशी, मर्कट कुळाशी साम्य असलेले प्राणी दिसामाजी वाढत होते. आपापल्या कुवतीनुसार विराट निसर्गाशी जुळवून घेत जगत होते. त्यातूनच केव्हातरी होमोसेलियन म्हणजे मेंदूचा विशेष वापर करू शकणाऱ्या ‘सुज्ञ’ माणसाचा उदय झाला. निसर्गातल्या अशा अचानक बदलांना ‘म्युटेशन’ म्हणतात. पिवळय़ा फुलांच्या ताटव्यात अचानक लाल रंगाचं फूल फुलणे हे त्याचं सोपं उदाहरण शालेय पुस्तकात पूर्वी दिलेलं असायचं.

अशाच उक्रांतीच्या टप्प्यात माणूस नावाचा प्राणी जन्मला. त्याचं सुरुवातीचं रूप आणि व्यवहार जंगलात राहणाऱ्या प्राण्यांशी साधर्म्य राखणारे असणार हे उघडच आहे. निबीड वन-काननात राहणाऱ्या त्या आदिमानवाला झाडावर सरसर चढून जाण्याची, लांब-उंच उडय़ा मारण्याची, लोंबकळण्याची आणि पोहण्याची कला बालपणीच अवगत व्हायची. हळूहळू त्याने गुहांमध्ये आपले सुरक्षित घर निर्माण केले. तरीसुद्धा पावसाळय़ात विजांचा थयथयाट सुरू झाला की एखादा जडिताघात जंगलाच्या बऱ्याच भागाचा घात करायचा. प्रचंड वणवे पेटायचे. मग जंगलात राहणं कठीण व्हायचं. अशा परिस्थितीत पटकन या अरण्यकातून पळ काढून मोकळय़ा मैदानात यायचं तर दोन पायांवर धावणं गरजेचं होतं. त्यातूनच माणूस दोन पायांवर चालायला आणि धावायला लागला. त्याचे हातही मग अधिक विकसित झाले. अंगठय़ाचा वापर करून एखादी वस्तू घट्ट धरता येऊ लागली. नव्या घरबांधणीसाठी हे आवश्यक होतं.

विस्तीर्ण मैदानी भागात वस्ती करायची तर जंगलातून लाकूडफाटा आणून त्याचं घर बांधावं लागत होतं. त्यासाठी कुऱहाडीसारखी आयुधं लागत होती. संरक्षण आणि संवर्धन यासाठी हे सारं आपोआप घडत होतं. निसर्गाच्या रौद्रभीषण रूपाचा अनुभव घेत घेत माणूस ग्रामजीवनात स्थिरावला. पृथ्वीच्या पाठीवर थोडय़ाफार फरकाने सर्वत्र असंच घडलं. हातापायांच्या उक्रांतीनंतर माणसाची प्रगतीची धाव सुरू झाली ती आजतागायत थांबलेली नाही आणि पुढेही थांबणार नाही. अमेरिकेतल्या कॅन्सास विद्यापीठातल्या प्राध्यापक मेलॉट यांचं हे निरीक्षण आहे. वीज कोसळून जंगलांना भस्मसात करणाऱ्या अग्नितांडवापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी माणूस दोन पायांवर वेगाने चालायला लागला नसता तर तत्कालीन इतर अनेक प्राण्यांप्रमाणे कदाचित त्याचा सर्वनाश ओढवला असता. पण तो मुळातच सेलियन म्हणजे सुज्ञ, विचारशील असल्याने त्याने आपला जम या ग्रहावर असा काही बसवला की आता बाकीच्या प्राण्यांना भयचकित व्हायची वेळ आलीय.

विजेच्या अफाट शक्तीची जाणीव झाल्यावर या अवकाशी विजेचं ऊर्जेत रूपांतर करता येईल का, याचेही प्रयोग सुरू झाले. कोसळत्या विजेचा लोळ अनेक व्होल्टचा असतो. ती ऊर्जा साठवता आली तर ऊर्जेचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, पण ते बेभरवशाचं काम आहे. जगातल्या काही भागात विजा कडाडण्याचं, पडण्याचं प्रमाण खूप असतं. अमेरिकेत फ्लोरिडा राज्यातील लोकांना तसं अनुभव येतो. वादळवाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदेशात हे विद्युतनर्तन वारंवार पाहायला मिळतं. काही वेळा त्यात माणसं, गुरं दगावतात. परंतु प्रगत देशात अशा भागात ठिकठिकाणी ‘लाइटनिंग अरेस्टर’ किंवा विद्युत निवारक बसवून ढगातली वीज त्याकडे खेचली जाऊन धातूच्या वाहकातून जमिनीत जाते. उंच इमारतींना अशी सोय करणं अनिवार्य असतं. सुमारे ऐंशी लाख वर्षांपासून पृथ्वीवर ढगातल्या विजांचा खेळ सुरू आहे. त्यातून धडा घेऊन लाखो वर्षांनी माणसाने आधी दोन पायांवर ‘चालका’चा आणि नंतर त्याच विजेची यंत्रे चालवण्याचा धडा गिरवला. निसर्गाचं आणि आपलं नातं हे असं अनादी काळापासूनचं आहे.