लेख – …मग ‘अपघातबंदी’ करायला हवी!

594

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी  

आता रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढत जाणार आहे. अशा वेळी नियमांचे पालन करा. नियंत्रित वेगाने वाहन चालवणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी असणार आहे. नव्हे, ते कायद्याने बंधनकारकही आहे आणि आपले कर्तव्यही आहे, अन्यथा पुन्हा एकदा अपघातांच्या राजधानीचा मुकुट आपल्या देशाच्या माथी बसेल. कोरोनानंतर जग कितपत बदलेल हे माहीत नाही, पण सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवतानाच्या अभद्र सवयीमध्ये आपण बदल घडवून आणायलाच हवा. कोरोनामुळे आपण टाळेबंदी केली मग तशी अपघातबंदीही करायला काय हरकत आहे?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदी, लॉक डाऊन यासारखे विविध प्रयोग करून या संसर्गापासून इतर देशांच्या तुलनेत राज्याला आणि पर्यायाने देशाला अधिक बाधा होण्यापासून रोखण्यात यश मिळवले असले तरी रस्ते अपघातात आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. शहरं थांबलीत, रस्ते सामसूम, राष्ट्रीय महामार्गसुद्धा ओसाड-भयाण; खरे तर अशा महामार्गावर एकही अपघात होण्याचा संभव नव्हता, तरीसुद्धा केवळ एप्रिल महिन्यामध्ये राज्यात अपघाताच्या 576 घटना घडल्या असून त्यामध्ये 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे ही शहरे यामध्ये आघाडीवर आहेत. देशात होणार्‍या रस्ते अपघातावर काम करणार्‍या ‘सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या ताज्या अहवालानुसार देशभरात महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, आसाम, केरळ, कर्नाटक, पंजाब, तामीळनाडू आणि राजस्थान या राज्यांनी टाळेबंदीच्या काळातील अपघातात ‘बाजी’ मारली. या अपघाताचे कारण ओव्हरस्पीडिंग म्हणजेच अतिवेगवानपणा हे असल्याचे हा अहवाल सांगतो.

लॉक डाऊनच्या काळामध्ये आपल्या घरी जाणार्‍यांचं प्रमाणही मोठे होते, पण यातील अनेकांवर गाव गाठण्यापूर्वीच काळाने घाला घातला. गावची वेस, गावचे घर पाहणेही त्यांच्या नशिबी नव्हते. गेल्या आठ दिवसांत 75 हून अधिक मजुरांचा अपघातात मृत्यू झाला आहे ही बाब अत्यंत खेदजनक आहे,

आधीच आपल्याकडे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यापेक्षा ते मोडण्यासाठी चढाओढ लागलेली असते. तशातच आता रस्त्यांवर वाहनांची गर्दीही नाही आणि पोलीसही नाहीत म्हटल्यावर नियम मोडून उलट दिशेने प्रवास करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालवणे यात वाटणारा आत्मप्रौढीपणा तर आता चांगलाच फोफावत चाललाय. अशावेळी एखादा प्राणी जरी आडवा आला तरी चालकाची भंबेरी उडते आणि त्याला चुकवण्याच्या नादात गाडी कुठे तरी आदळते आणि अपघात घडतो, चूक एकाची आणि भुर्दंड दुसर्‍याला हे अपघाताचे भीषण वास्तव आहे. वाहनचालकाच्या चुकीमुळे आजवर कित्येक निषापांचा बळी जाऊनही आपल्यावरील जबाबदारीची जाणीव का होत नाही  हे एक न उलगडणारे कोडे आहे. देशात दरवर्षी वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाच्या काळात वाहनचालकांचे प्रबोधन, वाहतुकीचे नियम सांगणे, चालकांची आरोग्य तपासणी करणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविण्याविषयी आवाहन करणे असे जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले जातात. डिसेंबर 2019 मध्ये वाहतुकीच्या नियमात बदल करून नियमभंग करणार्‍यांना होणार्‍या शिक्षेचा कठोरपणाही वाढवण्यात आला. नव्या कायद्यात दंड आणि शिक्षेसंबंधी ज्या तरतुदी आहेत त्या प्रथमदर्शनी जाचक वाटतात; परंतु वाहकांचा मनमानीपणा पाहता त्या योग्यच आहेत. उदा. हेल्मेटविना दुचाकी वाहन चालविणार्‍यांना पूर्वीच्या शंभर रुपये दंडाऐवजी यापुढे दसपट म्हणजे एक हजार रुपये दंड भरावा लागेल. सीट बेल्ट लावला नाही तर शंभरऐवजी एक हजाराची पावती फाडावी लागेल. वाहनाचा विमा नसल्यास सध्याच्या एक हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये दंड वसूल केला जाईल. दारू पिऊन किंवा बेफिकीरपणे वाहन चालविल्याबद्दल सध्या दोन हजार रुपये दंड घेतला जातो तो दहा हजार रुपये करण्यात आला आहे. शिवाय तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, त्याचप्रमाणे अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास सध्याचा एक हजार रुपयांचा दंड पंचवीस हजार रुपये करण्यात आला असून, तीन महिने कारावासाची शिक्षा आता तीन वर्षांची करण्यात आली आहे. याखेरीज अल्पवयीन व्यक्तीविरुद्धही किशोर न्याय कायद्याखाली कारवाई करण्यात येणार आहे, ‘हिट अँड रन’ प्रकरणं सातत्याने वाढत आहेत. 2018 मध्ये अशा 55 हजार घटना समोर आल्या होत्या आणि त्यात 22,000 लोकांना प्राणांना मुकावे लागले होते, त्यामुळे नव्या कायदय़ाअंतर्गत अशा प्रकरणात पीडित जखमी अथवा मृत झाल्यास वाहनचालकाला अनुक्रमे साडेबारा हजार आणि पंचवीस हजार इतक्या दंडाची तरतूद केली आहे, अर्थात वाहतुकीचा भंग करणार्‍यासाठीच सर्व शिक्षा आणि दंडाची तरतूद केली आहे असेही नाही. वाहनांची सदोष निर्मिती केल्यास आणि सुरक्षेचे निकष पूर्ण न केल्यास वाहन निर्मात्या कंपन्या आणि डीलरविरुद्धही भरभक्कम दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांचे बांधकाम सदोष असल्यास ठेकेदारावर अथवा संबंधित कंपनीवर एक लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे. नव्या कायद्यांतर्गत मोटर दुर्घटनाचा एक कोषही तयार करण्यात येणार आहे की, ज्यातून रस्त्यावरून प्रवास करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अनिवार्य स्वरूपात विम्याचे कवच प्रदान करण्यात येईल, परंतु शिक्षा आणि दंडाच्या एवढ्या मोठ्या तरतुदी केल्यानंतरही रस्त्यावरील अपघातासंबंधी एक सामान्य भावना अशी आहे की, अधिकांश अपघात मानवी चुकांमुळे घडतात. उदा. सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, गाडी चालवताना झोप येणे किंवा अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालविण्यास देणे, इत्यादी. दंड किंवा शिक्षेच्या वाढत्या तरतुदींवर टीका करणे योग्य नव्हे, परंतु वाहतूक पोलिसांनी तडजोड करून स्वतःचे खिसे न भरता रीतसर पावती करून दंड आकारणे अपेक्षित आहे.

आता रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढत जाणार आहे. अशा वेळी नियमांचे पालन करा. नियंत्रित वेगाने वाहन चालवणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी असणार आहे. नव्हे, ते कायद्याने बंधनकारकही आहे आणि आपले कर्तव्यही आहे, अन्यथा पुन्हा एकदा अपघातांच्या राजधानीचा मुकुट आपल्या देशाच्या माथी आहे. ते टाळण्यासाठी वाहनांना स्पीडलॉक असणे गरजेचे आहे, याखेरीज दारू पिऊन गाडी चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे या जुन्या सवयी आता सोडून द्यायला हव्यात. रस्त्यावर जागोजागी असलेल्या सूचनाफलकांचे पालन करायला हवे. वाहनांची दुरुस्ती वेळेवर करून घेणे, ब्रेक नसलेल्या स्थितीत वाहन न चालवणे अशा किरकोळ गोष्टींची ही खबरदारी घ्यायलाच हवी; कारण आपल्या एका चुकीमुळे केवळ आपलेच नव्हे, तर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे कोरोनानंतर जग कितपत बदलेल हे माहीत नाही, पण सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवतानाच्या अभद्र सवयींमध्ये आपण बदल घडवून आणायलाच हवा. कोरोनामुळे आपण टाळेबंदी केली मग तशी अपघातबंदीही करायला काय हरकत आहे?

आपली प्रतिक्रिया द्या