
>> राजीव मुळ्ये
कोरोनाच्या उद्रेकामुळं देशोदेशी लॉक डाउैनचा मार्ग स्वीकारला गेला आणि मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळं निसर्गानं आपली झीज भरून काढायला सुरुवात केली. नद्यांच्या स्वच्छतेसाठी कोटय़वधींच्या योजना जिथं निरुपयोगी ठरल्या, तिथं पंधरा दिवसांत एक पैसाही खर्च न करता परिस्थिती सुधारली. अर्थात, कोरोना जेव्हा जगाची पाठ सोडेल तेव्हा आपण पुन्हा निसर्गनाशाच्या रस्त्यावरच वाटचाल करू लागू आणि ती ‘अपरिहार्यता’ असल्याचं बोललं जाईल. परंतु यानिमित्तानं आपल्या भोवतालच्या निसर्गाची जी जाणीव मानवजातीला झाली, ती लवकर पुसली जाणार नाही.
आपल्या डोक्यावर आकाशाचं निळंशार छत आहे आणि रात्रीच्या वेळी त्या आकाशात तारे लुकलुकतात. आपल्याला हे तारे स्पष्ट दिसू शकतात. हवेत अनेक वायू असतात आणि त्यातील ऑक्सिजन नावाचा वायू आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळं त्याला ‘प्राणवायू’ म्हणतात. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ म्हणतात. याच कारणामुळं मानवी संस्कृती नदीकाठानं विकसित झाली आणि नदीला ‘जीवनदायिनी’ म्हटलं गेलं. नद्या डोंगरात उगम पावतात आणि अनेक गावांना, शहरांना पाणी पुरवून अखेर समुद्राला जाऊन मिळतात. अनेक शहरांच्या पाणीपुरवठा योजना आजही नद्यांमधील पाण्यावरच अवलंबून आहेत. आपल्या सभोवताली अनेक सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर तसेच असंख्य कृमी-कीटक वावरत असतात आणि तेही आपल्यासारखे सजीव असतात. आपल्यासारखेच त्यांना अन्न, पाणी, हवा लागते. काही प्राणी मूलतः शाकाहारी तर काही मूलतः मांसाहारी असतात. माणसासह सर्व सजीव प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साइड वायू बाहेर सोडतात, तर वनस्पती कार्बन डाय ऑक्साइड घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडतात. जगातील सर्व जीवजंतू, प्राणी आणि वनस्पती एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्यातून एक अन्नसाखळी तयार होते.
हे अत्यंत साधं, सोपं, पुस्तकी सामान्यज्ञान असलं तरी ते पुस्तकातच राहिल्यामुळं ‘असामान्य’ ठरलं होतं आणि सध्याच्या लॉक डाउैनच्या काळात सर्वांना हळूहळू त्याची जाणीव होऊ लागलीय. महानगरांमधील प्रदूषणानं आकाशाचा अस्सल निळा रंगही गायब झाला होता आणि तारे पाहण्याची कुणाला फुरसत मिळालीच तरी ते धूसर दिसत होते. पुलावरून जाताना शहराजवळील नदीकडे कधी लक्ष गेलंच तरी या नदीचं पाणी आपण चक्क पितो याचं वैषम्य वाटायचं आणि ज्यांच्या घरी ‘आरओ’ आहे, ते स्वतःला भाग्यवान समजायचे. रस्त्यांवरील माणसांची वर्दळ आटल्यामुळं पाळीव आणि क्वचित काही ठिकाणी वन्यप्राणीही रस्त्यावर येऊ लागलेत. शहरांमध्येही पाखरांचा किलबिलाट वाढलाय. महानगरी प्रदूषणात कोंदटलेले जीव मोकळा श्वास घेऊ लागलेत. धूर ओकणारे कारखाने बंद आहेत आणि लाखो वाहनं जागच्या जागी उभी आहेत. कारखान्यांमधलं सांडपाणी नद्यांमध्ये जाणं बंद झाल्यामुळं पाणी स्वच्छ होऊ लागलंय. दुर्गंधी कमी झालीय. एरवी कोटय़वधींच्या योजना राबवूनसुद्धा ‘जैसे थे’ राहणाऱया नद्या अवघ्या पंधरा-वीस दिवसांत पूर्ववत होऊ लागल्यात आणि त्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागलेला नाही.
दिल्लीत धूर आणि धुक्याच्या मिश्रणातून तयार होणारं ‘स्मॉग’ आणि त्याचे भयावह दुष्परिणाम आपण पाहिलेत. लहान मुलांनासुद्धा त्यामुळं फुफ्फुसाचे घातक विकार जडू लागले. दररोज दहा सिगारेटी ओढाव्यात एवढं प्रदूषण प्रत्येक व्यक्ती केवळ श्वसनाद्वारे फुफ्फुसात पोहोचवत असते. एकटय़ा दिल्लीत अन्य शहरांमधून दररोज तब्बल 11 लाख वाहनं येतात. आज दिल्लीचे रस्ते मोकळे असल्यामुळं प्रमुख चौकांमध्येही प्रदूषणाचे परिणाम दिसत नाहीत. दिल्लीलगत असलेल्या नोएडामध्ये एरवी गजबजलेल्या एका मॉलसमोर नीलगायी आणि हरणं फिरताना दिसली. जवळच्याच ओखला पक्षी अभयारण्यात असंख्य पक्ष्यांचा सध्या अक्षरशः कोलाहल ऐकू येतोय. हरिद्वारजवळ गंगेत स्नान करणाऱया हत्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि हा हत्ती राजाजी नॅशनल पार्कमधला असल्याचं सांगितलं जातंय. जालंधर शहरातून हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन गेल्या चाळीस वर्षांत झालं नव्हतं, ती अवघ्या पंधरा दिवसांत दिसू लागलीत. दक्षिण हिंदुस्थानातही समुद्रकिनारी हरणं बागडताना दिसून आलीत. चंदीगडच्या सेक्टर पाचमध्ये बिबटय़ा फिरून गेला तर कोझीकोडच्या रस्त्यावर 27 मार्चला मालाबार सिवीट नावाचं दुर्मिळ रानमांजर मुक्तपणे फिरून गेलं. मध्य प्रदेशातील बैतुल परिसरात हरणांचा कळप महामार्गावर मुक्तपणे फिरताना आढळून आला. महानगरी मुंबईमधील मरीनड्राइव्हजवळून समुद्राच्या पृष्ठभागावर खेळणारे डॉल्फिन प्रथमच दिसून आले. ओडिशाच्या किनारपट्टीवर पर्यटन आणि मासेमारी बंद असल्यामुळं यंदा ऑलिव्ह रिडले प्रजातीची लाखो कासवं विणीच्या हंगामासाठी आलीत.
भयावह कोरोना विषाणूशी जग लढत असताना, लक्षावधी लोकांचा बळी गेला असताना या लढाईचे काही सकारात्मक परिणाम संपूर्ण जगात दिसून आलेत. या संकटाचा हा दुसरा पैलू अनेकांच्या नजरेत भरलाय. जगभरात अनेक ठिकाणी लोकांनी हेच अनुभव गेल्या महिनाभरात घेतलेत. सूर्याचे अतिनील किरण सौम्य करणाऱया ओझोनच्या ज्या थराची संपूर्ण जगाला चिंता लागली आहे, तोही आपोआप पूर्ववत होत असल्याचं दिसून आलंय. कोरोनाचं संकट येत्या एक-दोन महिन्यात जगाची मानगूट सोडेल तेव्हा जग अधिक स्वच्छ, अधिक नैसर्गिक, अधिक हिरवंगार आणि अधिक सुगंधी झाल्याचं आढळेल, असा अंदाज बांधला जातोय. ‘वर्षातून एकदा संपूर्ण जगात पंधरा दिवसांचा सक्तीचा लॉक डाऊन जाहीर करावा,’ अशा संकल्पनांवर बोललं जाऊ लागलंय. जल, जंगल आणि जमीन यावर केवळ आपलाच नव्हे तर असंख्य प्राणिप्रजातींचा आणि झाडाझुडपांचा तेवढाच हक्क आहे, ही जाणीव काही प्रमाणात का होईना, दृढ होताना दिसतेय. निसर्गाला मानवानं दिलेल्या जखमांवर निसर्गानं स्वतःच उपचार केले. जगभर वसुंधरा परिषदांच्या निमित्तानं एवढा काथ्याकूट करूनही जे प्रश्न सुटले नव्हते, ते एकटय़ा लॉक डाऊनमुळं सुटल्याचं दिसलं. माणसाने काय केलं? फक्त निसर्गातला हस्तक्षेप काही दिवसांसाठी थांबवला. तोही नाइलाजानं! अर्थात ही गोष्ट नाइलाजानंच शक्य होणार होती.
कोरोनाचा आजार जेव्हा जगाची पाठ सोडेल, तेव्हा प्रमुख प्रश्न असणार आहे ढासळलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचा. आर्थिक प्रगती हवी असल्यास ज्या गोष्टी आपल्याला ‘अपरिहार्य’ वाटतात, त्यातली एक म्हणजे निसर्गाचा समतोल बिघडणं. जगाच्या वाढत्या लोकसंख्येला जगवायचं असेल, तर काही ‘मोल’ द्यावंच लागेल, अशी ‘थिअरी’ मांडली जाते. हे मोल अर्थातच निसर्गाचं, नैसर्गिक संसाधनांचं असतं. परंतु जगातून नामशेष झालेल्या प्राणिप्रजातींच्या शरीरात राहणारे विषाणू आता नवं शरीर शोधत आहेत, अशीही एक ‘थिअरी’ पुढं येऊ लागलीय. त्यामुळं ज्या आर्थिक प्रगतीचा डंका आपण हरघडी वाजवत असतो, त्यातून खरोखर जगाच्या वाढत्या लोकसंख्येच्या समस्या सुटल्या की आर्थिक असमतोल अधिकाधिक वाढत गेला? असा प्रश्नही कोरोनानंतरच्या जगात उपस्थित केला जाईल.
– राजधानी दिल्लीतून वाहणाऱया यमुना नदीचे काही ‘स्वच्छ’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लॉक डाउैनच्या काळात पाणी किती आणि कसं स्वच्छ झालं, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं (नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला दिले. दिल्ली एनसीआर विभागातील अनेक कारखाने सध्या बंद आहेत आणि त्यातून कचरा आणि सांडपाणी नदीत जाणं बंद झालंय. त्यामुळं यमुनेची परिस्थिती अवघ्या काही दिवसांत झपाटय़ानं बदलली, हे स्पष्ट झालंय. ज्या पवित्र गंगेच्या स्वच्छतेसाठी कोटय़वधींची योजना तयार केली गेली, स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं, तीही अवघ्या काही दिवसांत आपोआप प्रदूषणमुक्त होऊ लागली. गंगेचं प्रदूषण हा आपल्याकडे मोठा राजकीय मुद्दा ठरलाय. या मुद्यावरून आमरण उपोषणं झालीत. पण लॉक डाउैन जाहीर झाल्यानंतर झपाटय़ानं बदललेली परिस्थिती आपल्याला स्पष्टपणे असं सांगून गेली की, निसर्ग दुरुस्त करण्यासाठी खर्च करण्यापेक्षा तो बिघडू दिला नाही तर स्वतःवरील उपचार स्वतःच करायला तो समर्थ आहे. त्यावरून राजकीय हलकल्लोळ माजवायची गरज नाही आणि भलंमोठं बजेट देण्याचीही गरज नाही.
सकारात्मक परिणाम
‘पृथ्वी प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकते; पण कुणाचीच हाव पूर्ण करू शकत नाही,’ या गांधीजींच्या तत्त्वावर आजच चर्चा सुरू झाली आहे. कोरोनामुळं एकीकडे लाखोंचा बळी जात असताना दुसरीकडे सक्तीच्या निर्बंधांमुळं निसर्गाचा पूर्ववत होत चाललेला समतोल, हाही सोशल मीडियावरील चर्चेचा महत्त्वाचा विषय ठरलाय. अर्थात, कोरोनानंतर यातल्या बहुतांश गोष्टी ‘आदर्शाच्या’ ठरतील आणि ‘व्यवहार’ म्हणून आपण पुन्हा एकदा निसर्गनाशाच्या रस्त्यावरच वाटचाल करू लागू अशीच शक्यता माणसाच्या पूर्वानुभवावरून अधिक आहे. परंतु कोरोना आणि लॉक डाऊन या पार्श्वभूमीवर आपल्याला या गोष्टींची किमान जाणीव झाली, हे सकारात्मक आहे. आर्थिक प्रगती विरुद्ध निसर्ग, ही लढाई भविष्यात पूर्वीइतकी एकतर्फी आणि ‘अपरिहार्य’ म्हणून समोर येणार नाही, अशी आशा करायला जागा आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)
[email protected]




























































