
>> प्राचार्य सुधाकर बुगदाणे
संशोधकांसाठी कायम रहस्यमय ठरलेल्या लोणार सरोवरातील पाण्याचा रंग गुलाबी झाला आणि याबाबत अनेक तर्क लढवले जाऊ लागले. लोणारमधील पाण्याने गुलाबी रंग धारण करणे ही नैसर्गिक बाब असली तरी धोकादायकसुद्धा असू शकते. लोणारचे अवकाशाशी असलेले नाते, त्यातील पाण्याचे खारेपण, लोणार सरोवराचे अन्य सरोवरांपेक्षा असलेले वेगळेपण या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर या बदलांचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिह्यात लोणार या ठिकाणी असलेले लोणार सरोवर हे संशोधकांसाठी कायम रहस्यमय ठरलेले आहे. सरोवराचा जन्म, त्याचा कालावधी, सरोवराचा आकार, त्याची वैशिष्टय़े, सरोवरात आढळणारी शेवाळे, बॅक्टेरिया यांच्या प्रजाती अशा अनेक बाबतांत सामान्य माणसांपासून संशोधकांपर्यंत प्रत्येकाला रहस्य वाटत आले आहे. गेली अनेक दशके लोणारविषयी माझा अभ्यास चालू आहे. अद्यापही लोणारविषयक रहस्ये आपल्याला पूर्णपणे उलगडली असे म्हणता येणार नाही. याचे कारण, एक रहस्य उलगडेपर्यंत दुसरेच रहस्य समोर येते. लोणार सरोवरातील पाण्याने नुकताच गुलाबी रंग धारण केला. हे एक नवीन रहस्य निर्माण झाले. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, देशात त्याविषयी रहस्य निर्माण झाले. संशोधकांच्या जगाचा विचार केल्यास जगभरच्या संशोधकांमध्ये याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.
यंदा लोणारच्या पाण्याने रंग बदलला. तसे पाहता लोणारच्या पाण्याने रंग बदलला ही एक तत्कालिक घटना आहे. मात्र जगातील इतर कोणत्याही सरोवरातील पाण्याने असा रंग बदललेला नसताना केवळ लोणारच्याच पाण्याने रंग का बदलावा, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. लोणारच्या पाण्याने रंग का बदलला याचे वैज्ञानिक व शास्त्राrय कारण सांगणे तसे सोपे आहे; मात्र ते सांगण्याच्या निमित्ताने लोणार सरोवराचा संपूर्ण ऐतिहासिक व वैज्ञानिक मिमांसा करणे अधिक योग्य ठरणार आहे.
लोणार सरोवराचे अवकाशाशी नाते जोडताना आणखी काही पुरावे लक्षात घेतले जातात. लोणारचा अभ्यास केलेल्या संशोधकांना असे आढळून आले आहे की, ज्या प्रकारचे सरोवर येथे निर्माण झाले तसे ते मंगळाच्या पृष्ठभागावर आढळून येते. एवढेच नव्हे तर, जे गुण मंगळावरील पाण्यात आढळतात तसेच रासायनिक गुण लोणारच्या पाण्यातही आढळतात. एवढेच नव्हे तर, या सरोवरात सापडलेले जीवाणू हे मंगळावर नुकत्याच सापडलेल्या जीवाणूसदृश आहेत. त्याचबरोबर लोणार सरोवर व परिसरात जे दगडांचे नमुने सापडले ते चंद्राच्या पहिल्या मानवी मिशनमध्ये सापडलेल्या दगडाच्या नमुन्यासारखेच आहेत. याचा अर्थच असा की, येथे बऱयाच गोष्टी अशा आहेत, ज्या पृथ्वीबाहेरच्या गोष्टींशी नाते सांगतात.
येथे जो अशनीपात झाला त्याच्यासोबत जमिनीत मिसळलेल्या क्षारांमुळे लोणार सरोवरातील पाण्याला मोठय़ा प्रमाणात खारेपणा आहे. साध्या भाषेत हा खारेपणा सोडय़ामुळे आलेला आहे असे आपण म्हणू शकतो. या खारेपणाच्या अधिक्यामुळे पाण्याच्या एक मीटरखाली ऑक्सिजनही पोहोचत नाही व त्यामुळे या पाण्यात काही विशिष्ट शेवाळांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या वनस्पती वाढू शकत नाहीत. हे पाणी अल्कधर्मी आहे. पाण्यात असलेले शेवाळ हिरव्या-निळय़ा रंगाचे आहे. या शेवाळावर स्पायरोला नावाचा प्रथिन असणारा पदार्थ मोठय़ा प्रमाणात सापडतो. हा पदार्थ फार औषधी आहे.
पौराणिक संदर्भ, त्याच्या अवकाशातील ग्रहताऱयांशी नाते सांगणाऱया कथा, तारा पडणे, लोणार सरोवराची पौराणिक कथा आणि खगोलीय वास्तव, लोणार सरोवरातील पाण्याचे, पाण्यातील खनिजांचे, शेवाळांचे, जीवाणूंचे वेगळेपण, त्यांची वैशिष्टय़े आणि त्यांचे चंद्र-मंगळावरील परिस्थितीशी असलेले साधर्म्य या सर्व गोष्टींचे संदर्भ लक्षात घेऊन नुकतेच (जगभरातील अन्य कोणत्याही सरोवरातील पाण्याने रंग बदलला नसताना) केवळ लोणार सरोवरातील पाणी गुलाबी कसे झाले याचा शोध घेणे गरजेचे आहे.
सरोवरातील पाणी गुलाबी का झाले?
इतिहासाचा मागोवा घेतला असता आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इराण देशातील सरोवराचे पाणी लाल झालेले होते. त्याचाही इतिहास लक्षात घेतला पाहिजे. लोणार सरोवराचे यंदा बाष्पीभवन अधिक झाले. मात्र सरोवराच्या पाण्यात साबणाचे पाणी, शहरातील सांडपाणी उन्हाळय़ात मिसळत नाही. यामुळे लोणारच्या पाण्याची लवणता (खारेपणा) वाढला आहे. या पाण्यात डुनालिना सलीना नामक अतिशय दुर्मिळ प्रकारचे शेवाळ आढळते. बाष्पीभवनामुळे पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे हे शेवाळ सक्रिय होते. शेवाळांची प्रकाश संश्लेषणाची प्रकिया सुरू झाली. त्यातून बीटा कॅरोटीन हे रंगद्रव्य तयार होऊ लागले. त्यामुळेच या पाण्याचा रंग गुलाबी झालेला आहे. पाण्याचा रंग बदलणे ही एक तात्कालिक घटना आहे. लोणारमधील पाण्याने गुलाबी रंग धारण करणे ही नैसर्गिक बाब असली तरी धोकादायकसुद्धा असू शकते. तरी लोणारचे अवकाशाशी असलेले नाते, त्यातील पाण्याचे खारेपण, लोणार सरोवराचे अन्य सरोवरांपेक्षा असलेले वेगळेपण या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर लोणारचा अभ्यास व्हायला पाहिजे.
सासू-सुनेच्या विहिरीतील पाण्याचे रहस्य
याच लोणारमध्ये एक सासू-सुनेची विहीर आहे. या एकाच विहिरीतील देवीच्या मंदिराकडील पाणी गोड लागते तर त्याच्याविरुद्ध बाजूच्या भागातील पाणी मात्र खारे लागते. याचेही रहस्य शोधून काढण्यात यश आले आहे. या विहिरीत सरोवराकडून खाया पाण्याचा प्रवाह येतो, तर देवीच्या मंदिराकडील डोंगराकडून गोड पाण्याचा प्रवाह येतो. एकूणच लोणार सरोवरातील पाणी रासायनिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे आहे. याच पाण्यात विभिन्न तापमानात जिवंत राहणारे काही दुर्मिळ प्रकारचे जीवाणूही आहेत. अशा प्रकारचे जीवाणू समुद्राच्या पाण्यातही आढळतात. पाण्याचा रंग बदलणे सरोवरातील जैवविविधतेला धोका निर्माण करणारे ठरू शकते का हेसुद्धा शोधून काढणे गरजेचे आहे. लोणार सरोवराचा वारसा संशोधन व आस्थेच्या माध्यमातून टिकवायचा की अनास्था आणि दुर्लक्ष करुन गमवायचा हे आपण ठरवायचे आहे.
पौराणिक संदर्भातील खगोल
लोणारविषयीचे काही पौराणिक संदर्भही आपण लक्षात घेतले पाहिजेत. याचे कारण नीट विचार केला असता हे संदर्भ आपल्याला त्या वैज्ञानिक परिस्थितीकडे घेऊन जातात, ज्या भौगोलिक परिस्थितीत व अवकाशीय घटनेतून लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे. अशनीपातामुळे लोणारचा जन्म झाला असे संशोधन सांगत असताना पुराणातील कथाही ऋषींच्या शापामुळे तारा जमिनीवर कसा कोसळला अशा स्वरूपाचा प्रसंग सांगते. या पौराणिक कथांमध्येही आपल्याला सूर्य, सूर्यपुत्र रैवतक, सूर्यपुत्र शनि अशा तत्कालीन अवकाशीय ग्रहदेवता, मारुती यांचे एका अर्थाने आजच्या संशोधनात आकाशातील ग्रहांचे जे संदर्भ येतात तसेच या पौराणिक कथांमध्येही आढळतात. नागपूरच्या गॅझेटियरमध्ये दंडक राजाची पौराणिक कथा आलेली आहे. त्रेतायुगाच्या प्रारंभीची ही कथा आहे. जेथे आज लोणार सरोवर आहे तेथे त्रेतायुगाच्या प्रारंभी दंडक राजाची नगरी मधुवंता होती. दंडक राजाला शुक्राचार्य ऋषींनी शाप दिला होता की, सात दिवसांच्या आत तुझे राज्य, सेना आणि राजधानी व तिच्यापासून शंभर कोसपर्यंतचा प्रदेश आगीत समाप्त होईल. संपूर्ण प्रदेशाचे स्मशान होईल. त्यानुसार आकाशातून अग्नीवर्षाव झाला. तारा कोसळला. जेथे तारा कोसळला तेथे विवर तयार झाले. हेच आजचे लोणार सरोवर होय. विशेष म्हणजे, अजूनही लोणारच्या काही भागात वरच्या पृष्ठभागात आणि खालच्या पृष्ठभागात पोकळी आहे.



























































