
>> प्रकाश एदलाबादकर
सात-आठ महिन्यांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य उपाख्य बाबुरावजींचा सत्कार समारंभ झाला होता. कोरोनापर्व सुरू होण्याअगोदर 7 मार्च 2020 रोजी नागपुरातील सुरेश भट सभागृहात श्रोत्यांच्या भरगच्च उपस्थितीत झालेला तो समारंभ अजूनही कुणी विसरले नव्हते. आयुष्याची 97 वर्षे पूर्ण करून बाबुरावजींनी 98व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा तो सोहोळा होता. आपण आयुष्याची शतसंवत्सरी गाठू असा जबर आत्मविश्वास बाबुरावजींना होता. त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. परंतु कालपुरुषाला बहुधा ते मान्य नसावे आणि त्याने शनिवारी बाबुरावजींना आपल्यातून ओढून नेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका फार मोठय़ा कालखंडाचे साक्षी असलेले, संघाच्या सहाही सरसंघचालकांच्या काळात क्रियाशील असलेले मा. गो. वैद्य आज आपल्यात नाहीत. नागपूर विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्पृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक वटवृक्ष कोसळून पडला.
बाबुरावांच्या ऋषितुल्य व्यक्तित्वाची जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुशासनबद्ध आणि संस्कारक्षम वातावरणात झाली. संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभलेला होता. विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंतच्या सहाही सरसंघचालकांची कारकीर्द त्यांनी जवळून बघितली, प्रत्यक्ष अनुभवली. त्या सर्वांचा विश्वास आणि लोभ प्राप्त केला. डॉ. हेडगेवारांसारख्या संन्यस्त योद्धय़ाच्या छायेत त्यांच्या संघकार्याला प्रारंभ झाला होता. नंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले. हिंदुत्व हे त्यांचे वैचारिक अधिष्ठान झाले. रा. स्व. संघाच्या अत्यंत अडचणीच्या, उपेक्षेच्या, अपमानाच्या कालखंडात ज्या स्वयंसेवकांनी घाम, अश्रू आणि प्रसंगी रक्ताचे सिंचन करून संघविचार आणि कृती यांचे रक्षण आणि संवर्धन केले त्यात बाबुरावजी अग्रेसर होते. संघावर त्याकाळी आलेल्या अस्मानी आणि सुलतानी संकटांचा अत्यंत धैर्याने परिहार करणारी एक पिढी होऊन गेली. बाबुराव वैद्य हे त्या पिढीचे बिनीचे शिलेदार होते. संघाच्या स्वयंसेवकापासून ते राष्ट्रीय प्रवक्तेपदापर्यंतचा त्यांचा प्रवास स्तिमित करणारा आहे. यामागे त्यांचे परिश्रम, विचाराची पक्की बैठक, संघाप्रति समर्पणशीलता, हिंदुत्वावरील अव्यभिचारी निष्ठा यांचे बळ आहे.
बाबुरावजी हे विदर्भाच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुलगुरू होते. मुळात ते जातिवंत शिक्षक होते. नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात ते संस्पृतचे प्राध्यापक होते. संस्पृतचा त्यांचा गाढा व्यासंग होता. नंतरच्या काळात नागपुरातील अनेक शिक्षण संस्थांशी त्यांचा क्रियाशील संबंध होता. नागपूर विद्यापीठाच्या सिनेटचे ते सभासद होते. हिंदुत्ववादी बाबुराव एका मिशनरी काॅलेजात संस्पृतचे प्राध्यापक, त्याकाळी हे गणितच वेगळे होते. त्यावेळी विख्यात कादंबरीकार आणि साहित्यिक गजानन त्र्यंबक माडखोलकर नागपूरच्या ‘तरुण भारत’ दैनिकाचे संपादक होते. भाऊसाहेब माडखोलकरांनंतर ही जबाबदारी कोण सांभाळेल, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी नरकेसरी प्रकाशन संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब देवरस यांनी मा. गो. वैद्य यांची निवड करून त्यांना ‘तरुण भारत’मध्ये आणले. प्राध्यापकाची उत्तम चाललेली नोकरी सोडून बाबुराव ‘तरुण भारत’मध्ये आले, कारण केवळ संघनिष्ठा. ‘तरुण भारत’च्या जडणघडणीत बाबुरावांचा फार मोठा वाटा आहे. आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी ‘तरुण भारत’ ज्या धैर्याने आणि द्रष्टेपणाने हाताळला तो एक वेगळाच इतिहास आहे. पत्रकारितेमधील त्यांचा व्यासंग चतुरस्र होता. बाबुरावांचे भाषेवर अतोनात प्रेम होते. मराठी, हिंदी, संस्पृत, इंग्रजी या भाषांवर त्यांचा अधिकार होता. वाग्देवी सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त होता. शुद्ध, स्वच्छ आणि स्पष्ट लिहिण्याचा त्यांचा आग्रह असे. बाबुरावांचे स्तंभ आणि अग्रलेख आजही याची साक्ष देतात. वर्तमानपत्रीय लिखाण हे अल्पजीवी आणि तत्कालिक असते हा समजच बाबुरावांनी नष्ट केला. विदर्भातील तत्कालीन नवोदित आणि उमलत्या प्रतिभेला व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिले. मराठी साहित्याच्या क्षेत्रात आजघडीला जे वैदर्भीय साहित्यिक आपले कर्तृत्व गाजवीत आहेत, जे प्रतिभावान म्हणून मान्यता पावलेले आहेत ते सर्व ‘तरुण भारत’च्या मांडवाखालून गेलेले आहेत हे निःसंशय. बाबुरावजींच्या संपादकपदाचा आणि प्रबंध संचालकपदाचा काळ अत्यंत धामधुमीचा होता. बाबुरावजींचा प्रत्येक लेख, प्रत्येक स्तंभ एक नवा विचार देणारा आणि बहुचर्चित ठरला. ते एक कृतिशील विचारवंत असल्याने प्रासादिक भाषा, ओघवती शैली, विषय आणि विचारांची स्पष्टता याने नटलेल्या त्यांच्या लिखाणात मूळ विचाराशी पुठलीही तडजोड नसे. एका लोकशिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी लोकमानस घडविले, समाजप्रबोधन केले. त्यांच्या वैचारिक स्पष्टतेमुळे त्यांचे विरोधकही त्यांच्याविषयी आदर बाळगून असत. ते विधान परिषदेचे सभासद असताना याचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे.‘हिंदुस्थान तरुण भारत’मधील ‘भाष्य’ हा त्यांचा साप्ताहिक स्तंभ खूप गाजला. भाषेच्या शुद्धतेकडे त्यांचे बारीक लक्ष असे, त्यासाठी ते आग्रही असत. आपल्या हयातीत त्यांनी जवळपास 25 ग्रंथ लिहिले . आपली वाणी, लेखणी आणि करणी याद्वारे त्यांनी समर्थ रामदासांचे शब्द खरे केले.
सावधपणे सर्व जाणावे।
वर्तमान आधीच घ्यावे ।
जाऊ ये तिकडे जावे। विवेके सहिते ।।
नाना जिन्नस पाठांतरे।
निवती सकळांची अंतरे ।
लेहोन देता परोपकारे। सीमा सांडावी ।।
जैसे जयास पाहिजे। तैसे तयास दीजे ।
तरि मग श्रेष्ठंजी होईजे। सकळामाजी ।।
समाजाच्या सर्वच क्षेत्रांत दांडगा संपर्क असलेले बाबुराव हे उत्तम कास्तकारही होते. नागपूर विदर्भाच्या एका विस्तृत कालखंडाच्या इतिहासाचे डोळस साक्षीदार असलेले बाबुरावजींसारखे बहुआयामी आणि चतुरस्र व्यक्तित्व आता होणे नाही.


























































