मराठीजनांचे हक्काचे व्यासपीठ

63

>> अरुण जोशी

अमेरिकेतील मराठी लोकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन. नुकतेच 11 ते 14 जुलैदरम्यान हे अधिवेशन डॅलस येथे पार पडले. अमेरिका आणि कॅनडातील मराठी लोकांसाठी दर दोन वर्षांनी हे अधिवेशन भरवले जाते. पैठणी, नऊवारी, मराठमोळ्या दागिन्यांचा साज, फेटे असा पारंपरिक पेहराव आणि महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती याने इथलं वातावरण मराठमोळं झालं होतं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेजण यात सहभागी झाले होते. मराठी नाटक, संगीत, बिझनेस एक्स्पो, आहार, वधुवर मेळावा अशा अनेक कार्यक्रमांनी संमेलनाची शान वाढवली.

डॅलस, 12 जुलै. अधिवेशनाचा सर्वांसाठी खुला असा हा पहिला दिवस, अर्थात नोंदणी रक्कम भरलेल्यांसाठी. 11 तारखेला बिझनेस सेमिनार झाले. त्याची फी स्वतंत्र होती. यात माय इन्व्हेस्टमेंट, कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन, वेल्थ मॅनेजमेंट, नव उद्योजकांसाठी करीअर डेव्हलपमेंट असे सेमिनार झाले, तर दुसऱया सभागृहात सकाळी 9 पासूनच्या ‘उत्तररंग’ कार्यक्रमांचा आरंभ ‘प्रभात लहरी’ या स्थानिक कलाकारांच्या प्रभात गीतांच्या गायनाने झाला. त्यानंतर, निवृत्तीनंतर कार्यरत राहून समाजासह स्वतःला कसे समृद्ध करावे’ याविषयी पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. ‘वय मोठं गमतीचं’ ही आगळी लघुलेख स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील विजेत्या तीन लघुलेखांचे वाचन झाले. उतारवयातीव गमतीजमती शब्दबद्ध करण्याची संकल्पना यामागे होती. दीपाली केळकर यांनी विनोदाचे प्रकार, विनोदी किस्से, विडंबन काव्य, वात्रटिका, संतसाहित्यातील विनोद असा संवादात्मक कार्यक्रम उत्तम सादर केला. अमेरिकेतील विविध शहरांत ज्येष्ठ नागरिक क्लब कार्यरत आहेत. अशा क्लबचा गौरव त्यापुढच्या कार्यक्रमात झाला. 12 तारखेला अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. अरुणा ढेरे (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष) यांनी आपले विचार मांडताना दहा हजार मैलांवरील डॅलस इथे भरत असलेल्या अधिवेशनात ज्या प्रकारे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार दिसतोय त्याबद्दल इथल्या मंडळींचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असताना. अमेरिकेत 60 मराठी शाळा सुरू आहेत. याबद्दल आनंद व्यक्त केला. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 38 वर्षांच्या या प्रवासाबद्दल हे स्तुत्य आणि प्रेरणादायी असल्याचे म्हटले. इथलीही पुढची पिढी मराठीपासून दूर जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याप्रमाणेच प्रमुख वक्ते डॉ. रवीन थत्ते यांचे उद्बोधक भाषण झाले. 12 तारखेला आषाढी एकादशीचे निमित्त साधून विठ्ठल-रखुमाईच्या उभारलेल्या मंदिरापुढे दणक्यात आरती झाली. या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते डॉ. रवीन थत्ते यांचा ‘ज्ञानेश्वरी’चा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ची सांगड आजच्या आधुनिक जीवनाला घालणारे विचार आपल्या खुसखुशीत शैलीत मांडले.

न्यू जर्सीच्या कलावंतांनी पुलंची ‘बटाटय़ाची चाळ’ सादर केली. दुसऱया सभागृहात पुलंच्या आठवणी त्यांच्या लेखन-किश्शांतून जागवल्या स्पृहा जोशी, अरुणा ढेरे आणि सुबोध भावे यांनी. भल्या मोठय़ा अधिवेशन वास्तूत अनेक सभागृहं आहेत. एकाच वेळी एखाद्या सामाजिक विषयावर चर्चा तर दुसरीकडे बहारदार गायन असे कार्यक्रम रंगत होते. त्यातला महत्त्वाचा कार्यक्रम होता ‘स्वरनक्षत्र’. पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना मानवंदना देणारा हा कार्यक्रम विजय कोपटकर आणि देवकी पंडित यांनी असा खुलवला की, रसिकांना ती पर्वणीच होती. निवेदन दीपाली केळकर यांनी उत्तम केले.

एकूणच तीन दिवस मराठीचा जागर झाला.

विविध विषयांचे उत्तम कार्यक्रम, उपस्थित रसिकांचा उत्साह आणि उत्सवी वातावरण यात निवासी आणि अनिवासी मराठींच्या होणाऱया गळाभेटी वातावरण भारून टाकत होत्या. ‘ग्रंथाली’, ‘बेडेकर ऍण्ड सन्स’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘पु. ना. गाडगीळ’ अशा नामवंत संस्थांचे स्टॉल होते. त्यांना भेट द्यायला संमेलनासाठी कलावंत म्हणून आलेले संजय मोने, अजित भुरे, विशाखा सुभेदार, समीर चौगुले असे कलावंत व विविध क्षेत्रांतील मान्यवर येत होते.
संगीतकारांची सप्तसुरांची मैफल एक वेगळे आकर्षण ठरले. संजय उपाध्ये यांचा ‘मन करा रे प्रसन्न’ हा प्रसन्न कसे राहावे हे सांगणारा कार्यक्रम रसिकांना भावला. ज्ञानेश्वरांपासून अनेक कवींचे दाखले देत त्यावर त्यांनी भाष्य केले. आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही. ज्या वेगाने आपण जगत आहोत आणि भोवतालची जी परिस्थिती आहे तिला जसे सामोरे जात आहोत ते आपण सावज होऊन आपलीच शिकार होऊ देतो आणि त्यातून येणाऱया दुःखाला कवटाळून बसतो. आपल्या जगण्याचा वेग नियंत्रणात ठेवणे म्हणून कसे महत्त्वाचे आहे हे त्यांनी मांडताना मन प्रसन्न ठेवण्याचा मंत्र दिला. चार दिवसांचे हे अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी आम्ही तिथून निघालो होतो. मात्र ते वातावरण, ती आपुलकी सोबत घेऊन!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या