
>> योगेंद्र ठाकूर
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न म्हणजे मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. महाराष्ट्र-कर्नाटक यांतील वादग्रस्त भाग महाराष्ट्रात यावा, महाजन कमिशनने केलेला अन्याय दूर व्हावा यासाठी शिवसेना मनापासून या विषयावर सतत बोलत असते. महाराष्ट्रात मुंबई आल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती हळूहळू निस्तेज होऊ लागली. म्हणून महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या मराठी माणसाला चेतविण्याचे काम आवश्यक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे अचूक ओळखले आणि 1967च्या ऑक्टोबर महिन्यात बेळगाव-कारवारच्या सीमा भागातील जनतेच्या मागणीस पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्रभर ‘काळा दिन’ पाळण्याचे आवाहन मराठी जनतेला केले. त्या दिवशी घराघरांवर काळे झेंडे लावावेत आणि दंडावर व छातीवर काळ्या फिती लावाव्यात असा आदेश शिवसैनिकांना देण्यात आला. अशा तऱ्हेने सर्वप्रथम शिवसेनेने सीमा प्रश्न आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
बाळासाहेबांच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार बेळगाव परिसरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. बेळगावातील दुकाने, बाजारपेठा व कारखाने पूर्णपणे बंद झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमंत्रणावरून शिवसेनाप्रमुख बेळगावात गेले. तिथे त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले. सुमारे चार हजार सायकलस्वारांच्या फेरीत ते मोटारीतून निघाले. त्यावेळी त्यांच्याबरोबर एकीकरण समितीचे नेते सर्वश्री बा. रं. सुंठणकर, बाबूराव ठाकूर, बळवंतराव सायनाक वगैरे मंडळी होती. बारा वर्षे सीमा प्रांतासाठी जिद्दीने लढा देणारे आमदार सायनाक, सुंठणकर आणि बाबूराव ठाकूर या त्रिमूर्तींची भाषणे झाल्यानंतर बेळगाव जनतेला आशेचा दिलासा देणारे आणि लढा चेतवणारे बाळासाहेबांचे भाषण झाले. सीमा प्रश्न लढय़ाची ठिणगी पडली.
फेब्रुवारी 1969 मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार असल्याचे जाहीर झाले आणि शिवसेनेने त्यांची गाडी अडवून त्यांना निवेदन देण्याचे जाहीर केले. 7 फेब्रुवारी 1969 रोजी मोरारजी देसाई यांची मोटार अफाट पोलीस बंदोबस्तात कोठेही न थांबता अक्षरशः भरधाव वेगाने माहीम येथे शांततेने निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांना जबर जखमी करून निघून गेली. छायाचित्रकार अशोक करंबळेकर जबर जखमी झाले. आणखी एक शिवसैनिक सत्यकांत पेणकर याच्या तर अंगावरून गाडी गेली आणि शिवाजी पार्क-दादर भागात तुफान चकमकी होऊन रणकंदन माजले. पोलिसांनी पाशवी लाठीमार केला व अश्रुधूर सोडला. महापौरांच्या घराजवळील एका पोलीस चौकीला आग लावण्यात आली. सिटीलाईट सिनेमाजवळच्या तीन पोलीस चौक्या भस्मसात करण्यात आल्या. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले की, “आमचा पोलिसांनी विश्वासघात केला आहे. मोरारजी देसाई ज्या गुर्मीत भरधाव मोटारी सोडून गेले ती गुर्मी अनपेक्षित आणि चीड आणणारी आहे. संयमाचा कडेलोट झाला. आता मुंबईसाठी जसा उग्र लढा दिला तसाच दिला जाईल आणि परिणामांची जबाबदारी आमची नाही.’’ नंतर ठिणगी पडली. मुंबई, ठाण्यासह सभोवतालच्या परिसरात आंदोलनाचे लोण पसरले. मराठी माणसाच्या अस्मितेला डंख मारल्यानंतर तो चवताळून उठला आणि शिवसेनेच्या सीमा आंदोलनाने उग्ररूप धारण केले होते.
मोरारजी देसाई यांची गाडी अडविली त्याच दिवशी रात्री उशिरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांना पोलिसांनी अटक केली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि नेहमीचे सर्व मार्ग टाळून या तिघांनाही पहाटेच्या सुमारास पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. केवळ या तीन नेत्यांनाच अटक केली होती असे नाही, शेकडो शिवसैनिकांना पकडून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आले होते.
तब्बल 76 दिवसांनी 25 एप्रिल 1969 रोजी बाळासाहेबांची सुटका झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुटकेनंतर मराठी माणसाचे मन उचंबळून आले. शिवसेनेची अत्यंत विराट सभा शिवतीर्थावर झाली. त्या सभेत बोलताना सर्वच नेते भावनाप्रधान झाले. शिवसेनेच्या सीमा भागाच्या या तीव्र आंदोलनामुळे सीमा प्रश्नाला फार मोठी गती मिळाली. 1969 चे वर्ष हे खऱ्या अर्थाने सीमा प्रश्नाला गती देणारे वर्ष ठरले. सीमा प्रश्न शिवसेनाच मार्गी लावील असा विश्वास सीमावासीयांना वाटत आहे तो शिवसेनेचे सीमाप्रश्नी हे जे योगदान आहे त्यामुळेच. 1968-69 मध्ये शिवसेनेने केलेले तीव्र आंदोलन, शिवसेनाप्रमुखांना अटक, शिवसेनेची सीमा परिषद, संसदेत शिवसेना खासदारांनी उठवलेला आवाज, सीमावासीयांसाठी शिवसेनेने दिलेला लढा सीमावासीय आणि महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.





























































