नाटक – नेत्रसुखद थरार!

1415

>> क्षितिज झारापकर

महारथीअनुवादित नाटकं ही आपल्या मराठी रंगभूमीची एक वेगळीच समृद्ध बाजू आहे. गुजराती नाटकाचे हे मराठी नाटय़रुपांतर याचे उत्तम उदाहरण.

साधारणपणे समकालीन असलेल्या दोन प्रादेशिक नाटय़संस्कृती म्हणजे मराठी आणि गुजराती भाषेतल्या नाटय़संस्कृती. मराठी रंगभूमी ही कालांतराने अधिक सशक्त आणि प्रगल्भ होत गेली ती तिच्या मायबाप प्रेक्षकांच्या समंजसपणामुळे. दोन्ही नाटय़क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात सारखीच प्रतिभा होती, आहे आणि राहणार. दोन्ही रंगभूमीवर आपसात देवाणघेवाण ही सुरुवातीपासूनच सुरू आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. लं. चं ‘ती फुलराणी’ हे नाटक जॉर्ज बरनार्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या इंग्रजी नाटकाचा भावानुवाद आहे. तसंच आजचं आघाडीचं नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे गुजराती नाटकाचा स्वैर अनुवाद आहे. मराठीतली खूप नाटकं गुजरातीत अनुवाद होऊन सादर केली गेली आहेत. दोन शेजारी साखर, मिठाची देवाणघेवाण करतात तसेच आहे  हे. आता मराठी रंगभूमीवर विजय केंकरे यांनी गुजरातीत दीर्घकाळ गाजलेले एक सुपरहिट नाटक मराठीत आणले आहे. परेश रावल यांनी हे नाटक गुजरातीत सादर केले होते. मराठीत विजय केंकरे नटांची मांदियाळी घेऊन ‘महारथी’ नाटक सादर करताहेत.

उत्तम गाडा लिखित ‘महारथी’ या गुजराती नाटकाचे मराठी रूपांतर श्वेता पेंडसे हिने केले आहे. नाटक हा प्रकार संपूर्णतः शब्दातून, भाषेतून उभा राहत असल्याने, रहस्यनाटय़ भाषा बदलून लिहिण्यात त्यातलं रहस्य, थरार अनुवादात हरवणं सहज शक्य असतं. श्वेताने मात्र हे अजिबात होऊ न देता ‘महारथी’ घडवलंय. नाटकातल्या प्रत्येक प्रसंगाची नाटय़मयता टिकवून प्रेक्षकांची उत्कंठा ताणण्यात श्वेता पेंडसे कमालीची यशस्वी झाली आहे. मूळ नाटक मराठी नसल्याने यातील पात्र मराठी नसूनही नाटक मराठी वाटतं हे श्वेताचं मोठं श्रेय आहे. ‘महारथी’ आपल्याला दर 10-15 मिनिटांनी गांगरून टाकतं. मुळात एक कमर्शियली क्राफ्टेड थरारनाटय़ कसं असावं याचं ‘महारथी’ हे एक सुंदर उदाहरण आहे. हे नाटक व्यावसायिकतेच्या सगळ्या गणितांनी ठासून भरलेलं आहे. एक मरण. ते जगाला कसं पटवून द्यायचं, त्याची कारणं काय, त्यामागची कारस्थानं काय, इप्सित साध्य करत असताना विघ्न कशी येतात, संधी साधून फायदा प्राप्त करण्याच्या खटाटोप काय होतो, या सगळ्यातून ‘महारथी’ कोण निपजतो याचा सगळा खेळ म्हणजे निर्माते विनायक गवांदे आणि निनाद कर्पे यांच्या बदाम राजा प्रॉडक्शन्सचे विजय केंकरे दिग्दर्शित ‘महारथी’ हे नवीन नाटक.

विजय केंकरे यांनी ‘महारथी’ चं क्राफ्टिंग संपूर्णतः व्यावसायिक केलेले आहे. नाटक प्रत्येक पात्राला समसमान भागात वाटून दिलं गेलय. ते लिखाणातच तसं आहे. केंकरेंनी हे इतकं प्रभावीपणे प्रयोगात आणलंय की रंगमंचावर नसलेल्या पात्रांचा प्रेक्षकांना विसर पडत नाही. रहस्यप्रधान कथानकात खरंतर खऱया रहस्याच्या पात्राला लपवण्यात यश असतं. इथे मुळात हेच केंकरेंनी टाळलेय आणि पेक्षकांना बुचकळ्यात टाकलेय. त्यामुळे ‘महाराथी’ फारचं इंटरेस्टिंग होत जाते. त्यांच्या गेल्या काही नाटकांतून तर विजय केंकरे हे ओ. पी. रल्हन, विजय आनंद यांच्या पंक्तीत गेले आहेत. रहस्यमय थरारनाटय़ हा त्यांचा हातखंडा झालाय, पण ‘महारथी’मध्ये केंकरे हॅज सरपास्ड हिमसेल्फ असेच म्हणावे लागेल. ‘महारथी’ हे नेत्रसुखद नाटक आहे. हे तीन तांत्रिक विभागांमुळे साध्य होतं. इथे हे तीनही विभाग 100 टक्के योगदान देतात. पहीला नेपथ्य संदेश बेंद्रे हे कमालीच्या वेगाने मराठी नाटय़नेपथ्यात ब्रॅण्डनेम होत चालले आहेत. ‘महारथी’च्या नेपथ्याला पहिला पडदा उघडताना मिळावी इथे मोहन वाघांची आठवण येते. दोन मजली सेट जो शिवाजी मंदिरमध्ये मावू शकतो आणि तरीही प्रभावी होऊ शकतो ही किमया संदेश बेंद्रेंनी  ‘महारथी’मध्ये केली आहे. दुसरी मंगल केंकरे यांची वेशभूषा खूप छान जमली आहे. विषेतः हिरॉइनच्या कॉस्च्यूमची निवड आणि डिझाईन सुरेख आहे. तिसरी बाजू प्रकाश योजनेची. इथे शीतल तळपदे हे ब्रॅण्डनेमचं पुरेसं आहे. नाटकाची गूढता वाढवणारी प्रकाशयोजना  ‘महारथी’ला लाभली आहे.

‘महारथी’मधलं प्रत्येक पात्र महत्त्वाचं आहे. फिल्म डिरेक्टर जयसिंग एडेनवाला म्हणून विवेक गोरे खूप प्रभावी आहे. नाटकभर त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर ठेवण्यात विवेक यशस्वी झालाय. मिसेस एडेनवाला झालेली माधवी निमकर किंचित खलनायिकेची छाप असलेली भूमिका जगते. एकेकाळची नटी असलेल्या या पात्राला त्या प्रकारची वेशभूषा आहे. माधवी ती वेशभूषा कमालीच्या आत्मविश्वासाने कॅरी करते. हे कसब दुर्लभ आहे. सुनील तावडे वकिलाच्या भूमिकेत अचूक प्रगल्भता आणि संशय मिसळून नाटकाचं रहस्य वाढवतो. सुनीलसारखा मोठा नट इतरांवर हावी न होता आपलं पात्र प्रामणिकपणे वठवून परिणामकता साधतो हे खरंच कौतुकास्पद आहे. नर्सच्या भूमिकेत अर्चना निपाणकर भाबडेपणाने गुंता वाढवण्याचे काम चपखलपणे साधते. सुनील जाधव हा सीनियर इन्स्पेक्टरचा योग्य रुबाब राखून वावरतो. हवालदाराच्या भूमिकेत संजय खापरेसुद्धा योग्य परिणाम साधतो. सचित पाटील मूळ नाटकात परेश रावल यांनी साकारलेली भूमिका साकारतो. सचितने ही भूमिका अतिशय संयमाने साकारली आहे. पहिल्या अंकात खूप अंडरप्ले करत सचित दुसऱया अंकात ओव्हर द टॉप ओव्हरप्ले करतो. हे गणित प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याचे एक मस्त तंत्र आहे. यात सचित पाटील पूर्ण यशस्वी होतो. सर्व कलाकारांची नियोजित बॅटिंग यशस्वी झाली की कमालीचा रंजक नाटय़प्रयोग कसा होतो याचे परफेक्ट उदाहरण म्हणजे ‘महारथी.’

नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी आणखीन एक बाजू संगीताची इथे अजित परब पूर्णपणे चोख उतरला आहे. मंदार चोळकरचे गीत आणि अजितचे एकूण संगीत एक सुरेख परिणाम साधून जातात. एकंदरीत ‘महारथी’ हा एक मस्त नाटय़प्रयोग आहे.

नाटक          महारथी

निर्मिती        बदाम राजा प्रोडक्शन,बुक माय शो लाइव्ह

निर्मिती सूत्रधार      नितीन नाईक, दीपक जोशी

लेखक           उत्तम गाडा

मराठी रुपांतर           श्वेता पेंडसे

नेपथ्य             संदेश बेंद्रे

प्रकाश             शीतल तळपदे

संगीत, पार्श्वगायन     अजित परब

गीत                मंदार चोळकर

वेशभूषा          मंगल केंकरे

रंगभूषा           विलास पावस्कर

कलाकार      अर्चना निपाणकर, माधवी निमकर, सजीत पाटील,  सुनील जाधव, आनंद पाटील,  सुनील तावडे, संजय खापरे

दर्जा

आपली प्रतिक्रिया द्या