धुंदुरमास

289

>> शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ

धुंदुरमास. ऐकण्यास अत्यंत नादमयी वाटणारा शब्द. आता आकाशभर विसावलेल्या थंडीसारखाच लयदार… उबदार! रेशमी, आबदार कपडे… भरगच्च खाण्याची मौज हे सारे या उनउनीत दिवसांत अनुभवता येते… त्याची मजा घेता येते. पौष महिन्यात हा धुंदुरमास सुरू होतो. या काळात छान भूक लागते. मुबलक भाज्या, बाजरी, तीळासारखे घटक शरीरात उब आणतात. गूळ रुची वाढवतो. एकंदरीतच प्रसन्न वातावरण असते. पाहुया धुंदुरमासाची गंमत!

सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. धुंदुरमास या महिन्यात सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. थंडी स्थिरावलेली असते. ऋतूनुसार मंडईत भाज्या, फळांची लयलूट असते. थंडीला सामोरे जाण्यास शरीर सज्ज व्हावे म्हणून ऊर्जादायी व पौष्टिक पदार्थ घरोघरी बनतात. ऋतूला योग्य असा आहार खाणं हे नेहमीच फायद्याचे ठरतं. प्रत्येक ऋतूत काय खावे याचे मार्गदर्शन आपल्या पूर्वजांनी केले आहे. त्याचप्रमाणे धुंदुरमासातही विशिष्ट आहार घेतला जातो. अत्यंत पौष्टिक आणि ऊर्जादायी पदार्थ आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीत सामावले आहेत. हे पदार्थ शरीराला आवश्यक घटक पुरवतात, शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात, त्याचबरोबर थंडीला सामोरे जाण्याची शक्ती शरीराला देतात. धुंदुरमासातील आवर्जून केले जाणारे पदार्थ म्हणजे तीळ लावलेली बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, वांग्याचे भरीत, गुळाच्या पोळ्या, तिळगुळाचे लाडू, पौष्टिक लाडू, मिरचीचा ठेचा. हे सर्व पदार्थ खूप ऊर्जादायी व आरोग्यदायी असतात.

tilgul-1

धुंदुरमासाचा कालावधी अगदी थोडा असल्याने हे सर्व पदार्थ या कालावधीत खाल्ले तर शरीराला अधिक फायद्याचे ठरतात. खरं तर हे पदार्थ धुंदुर मासात पहाटेच्या वेळी खायचे असतात. कारण या काळात पहाटेच्या वेळी पचनशक्ती सर्वात तीक्र असते व इतर वेळी पचायला जड असणारे पदार्थ शरीराला या काळात उपयुक्त ठरतात. धुंदुरमासाबरोबर भोगी, संक्रांत हे सणही महत्त्वाचे असतात. या कालावधीत बोरन्हाण व हळदीकुंकूही अनेक जण साजरे करतात. संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ घातले जातात व त्या पाण्याने आंघोळ केली जाते. सूर्याची पूजा केली जाते व तीळ लावलेली बाजरीची भाकरी व वांगे, घेवडा, वाटाणा, गाजर व इतर भाज्या घालून भोगीची भाजी केली जाते. या भाजीत पावटे व हिरवे हरभरेही घातले जातात. भाकरीसोबत तूप घेतले जाते.

दुसऱ्या दिवशी संक्रांत असते. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो व सूर्याचा उत्तरायणाला प्रारंभ होतो. या दिवशी तिळगूळ व गुळाच्या पोळय़ांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर बोरन्हाण व हळदीकुंकू घरोघरी केले जाते. मग या मुलांवर बोरन्हाण घातले जाते. यात मुलांवर बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बत्तासे, हलवा असे पदार्थ घातले जातात व उपस्थित सर्व मुलांना ते वेचायला सांगितले जाते. यात लहान मुलांवर शिशुसंस्कार होतात. हे सर्व पदार्थ एकमेकांच्या नादाने मुले वेचून खातात व त्यामुळे पोषक तत्त्वे त्यांच्या शरीराला मिळतात. थंडीला सामोरे जायला योग्य पोषण मिळते.

संक्रांतीचे हळदीकुंकू घरोघरी बायका साजरे करतात. उपयुक्त वस्तू लुटतात. नवविवाहित स्त्र्ाया हलव्याचे दागिने घालतात व या कौतुक सोहळय़ात सामील होतात. वर्षानुवर्षे सुरू असणाऱया या परंपरेमागे स्त्र्ायांनी एकत्र येण्याचा उद्देश असतो. त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण करीत हळदीकुंकू आनंदाने थाटामाटात पार पाडले जाते.
विविध पदार्थांचे फायदे व पारंपरिक पदार्थ.

मुगाची खिचडी – रात्रीच्या जेवणात हलका आहार म्हणून मुगाची खिचडी आवर्जून खावी. त्यात वाटल्यास वाटाणे किंवा मटार घालावेत किंवा आवडत्या भाज्या घालून पौष्टिक खिचडी करावी. मुगाच्या खिचडीसोबत भोगीची भाजी व लोणचे, पापड असाही एक खास बेत केला जातो.

भोगीची भाजी – भोगीची भाजी ऋतूत पिकणाऱया विविध भाज्यांचा समावेश करून केली जाते. वांगी, बटाटे, पावटे, हिरवे वाटाणे, हिरवे हरभरे, गाजर, घेवडा, फ्लॉवर, भिजवलेले शेंगदाणे या सर्व भाज्यांचा समावेश या भाजीत केला जातो. ही भाजी पौष्टिक व ऊर्जादायी असते.भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, तिळाची चटणी, तूप, मुगाची खिचडी असा बेत केला जातो. हा बेत प्रत्येक घरी आवर्जून केला पाहिजे. त्यामुळे शरीराला या ऋतूत आवश्यक असणारे सर्व घटक पुरवले जातात. त्याचबरोबर नवीन पिढीच्या मुलांना आपल्या परंपरांची ओळख होते. त्याचे महत्त्व कळण्यास मदत होते.

bhogichi-bhaji-1

तिळगूळ व गुळाच्या पोळ्या – ‘तिळगूळ बरोबर ऊर्जादायी व पौष्टिक गुळाच्या पोळय़ा केल्या जातात. या दिवसांत तीळ, गूळ व तूप हे शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात.हे पदार्थ शरीरात ऊब व ऊर्जा निर्माण करतात. त्याचबरोबर या पदार्थांमध्ये अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. तिळगुळाचे लाडू व गुळपोळय़ा खाल्ल्यामुळे शरीराला उपयुक्त कर्बोदके, प्रथिने व उपयुक्त स्निग्ध पदार्थ मिळतात. त्याचबरोबर जीवनसत्त्व, लोह, कॉपर, कॅल्शियम अशी अनेक खनिजेही मिळतात.

gulpoli2

पौष्टिक लाडू – थंडीच्या दिवसांत घरोघरी पौष्टिक लाडू बनवले जातात व सारेच ते आवडीने खातात. या लाडवांचे विविध प्रकार असतात. मेथीचे लाडू, डिंक लाडू, अळिवाचे लाडू व सर्व मिश्रित पदार्थ असलेले पौष्टिक लाडू. या लाडूच्या प्रकारांमध्ये पौष्टिक व ऊर्जादायी साहित्य घातले जाते. कणिक, सुका मेवा, तूप, अळीव, डिंक, खारीक पावडर, मेथी, गूळ असे अनेक उपयुक्त पदार्थ घातले जातात. हे विविध प्रकारचे लाडू सर्वांनीच आवर्जून खाणे गरजेचे आहे. हे दुधाबरोबर न्याहरीच्या वेळी किंवा मधल्या वेळच्या खाण्याला उपयुक्त ठरतात. ऑफिसमध्ये डब्यात हे लाडू घेऊन जावे व चहाबरोबर किंवा संध्याकाळी खाल्ले तर आवश्यक ऊर्जा व स्फूर्ती मिळते.

laddoo

धुंदुरमासातील या विविध आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांशी तुमची ओळख झालीच असेल व त्यांचे फायदेही लक्षात आले असतील. तर मग आवर्जून हे पदार्थ आपल्या आहारात आणा व घरातील सर्वांनाच त्यांचे महत्त्व सांगा. नव्या पिढीला या सर्व पदार्थांचे महत्त्व कळणे व त्यांच्या आहारात या पदार्थांचा समावेश करणे त्यांच्या आरोग्यासाठी व आपली परंपरा पुढे चालत ठेवण्यासाठी गरजेचे आहे.

खारीक खीर
साहित्य – 10 खारका, अर्धा लिटर दूध, 4 चमचे साखर, वेलचीपूड, जायफळ, केशर, चारोळी, 2 चमचे तूप, सुका मेवा.

कृती – प्रथम कपभर दुधात रात्रभर बी काढून खारीक भिजवावी. मग भिजलेल्या खारकांची पेस्ट करावी. दूध उकळवून घ्यावे. त्यात साखर, वेलचीपूड, जायफळ पूड, केशर घालावे व जरा आटवावे.
एका कढईत तुपावर खारीक पेस्ट मंद गॅसवर परतावी. नंतर आटवलेले दूध ओतावे. हे मिश्रण उकळवावे व थंड करावे. सर्व्ह करताना वरून चारोळय़ा व सुका मेवा घालावा.

भोगीची भाजी साहित्य
साहित्य – 1 कप प्रत्येकी – बटाटा फोडी, वांग्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, अर्धा कप ओले चणे, पाव कप दाणे, पाव कप पावटे/ हरभरे, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता, मसाला, काळा मसाला, तिळाचे कूट, चिंचेचा कोळ, गूळ व खोबरे.

कृती – पातेल्यात फोडणी करून (तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, तिखट) त्यात सर्व भाज्या परताव्यात व दोन वाफा काढून भाज्या शिजत आल्या की, चिंचेचा कोळ व गोडा मसाला घालावा. सर्व शिजत ठेवावे व व्यवस्थित शिजले की गूळ, खोबरे व तिळाचे कूट घालावे. भाकरीबरोबर गरम खावी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या