रंगांशी मैत्री

419

घरचा किराणा मालाचा व्यवसाय ते मान्यवरांच्या चेहऱयाचा मेकअप. एक वेगळाच पल्ला आणि वाट किशोर पिंगळेंनी निवडली.

सिद्धिविनायक मंदिराजवळ असलेल्या चाळीमध्ये बालपण गेले. बाबांचा किराणा मालाचा व्यवसाय होता. लहानपणापासून हा व्यवसाय न करता काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी होती. नाटकात काम करणाऱया मनोहर भोगले या मित्राशी माझी गट्टी जमली होती. अचानक एके दिवशी त्याच्या नाटक कंपनीचा असिस्टंट मेकअपमन काम सोडून गेला. स्वतःचे किराणा मालाचे दुकान असल्यामुळे वडील मेकअप करण्याच्या कामास परवानगी देणार नाहीत हे माहीत असल्यामुळे दहा दिवस मित्रांबरोबर फिरायला जातो असे म्हणून घराबाहेर पडले. त्या मित्रासोबत दहा दिवस नाटकाचा दौरा केला आणि मिळालेले पैसे आईच्या हातात ठेवले. आपला मुलगा योग्य मार्गाने चालला आहे असा विश्वास आईला वाटल्याने वडिलांचा विरोध असतानाही आईने मला पाठबळ दिले. यामुळेच पुढे या क्षेत्रात स्थिरावलो.

सुरुवातीच्या काळात रंगपेटी उघडून सर्व सामान व्यवस्थितरीत्या मांडून ठेवायचे काम असायचे. रमेश भाटकर, सविता मालपेकर, मधुकर तोरडमल यांसारखे दिग्गज स्वतः चेहऱयाला मेकअप करायचे. त्यांचं पाहून पाहून हळूहळू रंगांशी माझी मैत्री घट्ट जमली. मग हळूहळू रंगांनी या दिग्गजांना रंगभूषा करू लागलो. खऱया अर्थाने बोलायचे झाले तर या सर्व दिग्गजांनी मला सहकार्य केलं म्हणून तेच माझे गुरू होय.

दिवसेंदिवस रंगभूषे- मध्ये होणारी माझी प्रगती पाहून ‘अरे किशोर, तू स्वतःचा व्यवसाय सुरू कर’ असे प्रोत्साहन मला विक्रम गोखले आणि विनय आपटे सरांनी दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी ‘रंगभूषाकार किशोर पिंगळे’ अशी स्वतःची वैयक्तिक कारकीर्द सुरू केली. अल्पावधीतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मेकअप आर्टिस्ट म्हणून मला बोलावणे येऊ लागले. मराठी चित्रपटसृष्टीत प्रशांत दामले यांचा मी आठ वर्षे पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले. तसेच प्रिया बेर्डे, निशिगंधा वाड, मिलिंद गवळी यांच्या सोबतही पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काही काळ काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीत मेहमूद, प्राण, प्रेम चोपडा, श्रीदेवी, जयाप्रदा, सुनील शेट्टी, अशोक सराफ आदी दिग्गज नट-नटय़ांसोबतही पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्याचे भाग्य मला लाभले.

रंगभूषेबद्दल ठरवताना प्रथम स्क्रिप्ट वाचन करतो आणि दिग्दर्शकांची चर्चा करून मग कथेच्या दृष्टीने कलाकाराचा लूक कसा असावा हे ठरवून त्यादृष्टीने रंगभूषा करतो. या कलेने मला भरपूर काही दिलं. घरसंसार सांभाळण्यासाठी रोजीरोटी दिलीच, पण त्यासोबत मानसन्मान, प्रतिष्ठा, कौतुक आणि मोठमोठय़ा दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधीही दिली. आतापर्यंत शासनाचे चार पुरस्कार मला मिळालेले आहेत. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘बे दुणे पाच’ या नाटकांसाठीही पुरस्कार मिळाले आहेत. माझ्या आईने मला जन्म दिला, तर या कलेने माझे जीवन घडविले असेच मला कायम वाटत आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या