रंगरंगोटी – रंगदेवतेशी इमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रदीप पेडणेकर

कोणतेही आव्हान स्वीकारायचे, त्याला पाठ दाखवायची नाही, हे मला रंगभूमीने आणि माझ्या गुरूंनी शिकवले.

रंगभूषाकार जेव्हा एखाद्या कलाकाराची रंगभूषा करतो तेव्हा तो कलाकार त्याच्या पाया पडतो. हा नमस्कार रंगभूषाकारातली रंगदेवतेला असतो. रंगमंचावर कला सादर करणाऱया कलाकारासाठी रंगदेवता ही सगळ्यात श्रेष्ठ देवता आहे, असे मी मानतो. कारण रंगभूषेशिवाय कलाकार आपली कला साकारू शकत नाही.

विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुरुष’ या व्यावसायिक नाटकापासून माझी रंगभूषाकार म्हणून खरी सुरुवात झाली. त्यानंतर बऱयाच नाटकांतील कलाकारांची रंगभूषा केली आहे. हरीश पाटील हे माझे रंगभूषेतील गुरू. एका गुजराती नाटकासाठी एका कलाकाराला टक्कल लावायचं होतं. तेव्हा मी म्हणालो, ‘हे काम मला जमणार नाही.’ असं बोलल्यावर त्यांनी मला एक चापट मारली. त्यांनी हलकंच मारलं होतं, पण ते मला लागलं. त्यांची आज्ञा म्हणून मी त्या कलाकाराला टक्कल लावून दिलं. ते एवढं सुंदर लागलं की, हरीश पाटील यांनी माझं कौतुक केलं आणि मला सांगितलं की, आपल्या कलेतील आव्हानांना स्वीकारत पुढे जायचंय. जमणार नाही असं बोलायचंच नाही. त्या क्षणापासून आजतागायत कायम या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. दाजी भाटवडेकरांच्या ‘स्वामी समर्थ’ या सिनेमासाठी रंगभूषा करायची होती. एवढय़ा मोठय़ा कलाकाराची रंगभूषा करायची म्हणून आदल्या रात्रीपासूनच ताण येऊन माझे हातपाय कापत होते, मात्र त्यांनीच मला रंगभूषा करताना सांभाळून घेतले.

माझं शिक्षण फक्त दहावीपर्यंतच झालं. सुरुवातीला फक्त वेशभूषाकार म्हणून काम करायला आलो होतो. नंतर सई परांजपे यांचे पती अरुण जोगळेकर, पु.ल. देशपांडे यांचे भाऊ रमाकांत देशपांडे यांनी मला या क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिलं. नितीश भारद्वाज यांनी माझी ‘सोयरीक’ नाटकावेळी हरीश पाटील यांच्याशी ओळख करून दिली होती.

बाल कलाकार, एखादी सर्वसामान्य व्यक्ती ते ज्येष्ठ-नवखे कलाकार. मला सगळ्यांची रंगभूषा मनापासून करायला आवडते. ‘अंधायुग’ या हिंदी नाटकासाठी अश्वत्थाम्याची रंगभूषा तीन मिनिटांत साकारलीय. त्याच्या शरीरावरील जखमा तीन मिनिटांत साकारणे हे माझ्यासाठी आव्हान होतं. या नाटकासाठी मला प्रथम रंगभूषेचं पारितोषिक मिळालं. याव्यक्तिरिक्त रंगभूषेकरिता पुरस्कार मिळाले आहेत.

या कलेनं मला स्थैर्य दिलं. माझं राहणीमान बदललं. प्रसिद्ध दिली. रंगभूषाकार, कलाकार म्हणून ओळख दिली. म्हणून या कलेवर माझे मनापासून प्रेम आहे. माझ्या मेकअपचे साहित्य ठेवलेल्या बॅगेला पाय जरी लागला तरी माझा जीव वरखाली होतो. कारण मला ती माझी देवता आहे. शिवाय मेकअपचे सामान रंग, ब्रश इत्यादी सर्व स्वच्छ ठेवणे, कलाकारांशी प्रेमाने, आदराने बोलणे अशा बारीक सारीक गोष्टी ज्यामुळे आपल्यात सकारात्मक बदल होऊ शकतात, त्या मला या कलेने शिकवल्या