लेख : एका घासासाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

>>दिलीप जोशी<<

[email protected]

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, असं आपण सतत ऐकत असतो. ज्यांच्या या गरजा सहजतेने पूर्ण होतात त्यांना किमान सुखाने जगता येतं, पण ‘पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी’ किंवा ‘तुझ्या भुकेला वरी, नागली आणि कणी-कोंडा’ एवढीसुद्धा माफक अपेक्षा पूर्ण होऊ न शकणारी अनेक माणसं जगात कशीबशी तग धरून असतात. कुपोषणाने त्यांच्या तनमनावर विपरीत परिणाम होत असतो.

माणसांच्या जगाचे रंगढंग अनेक. कुठे डोळे दिपवणारी श्रीमंती, तर कुठे अठराविश्वे दारिद्रय़, कोणाच्या ताटात नकोसं होण्याएवढं अन्न तर कुणाच्या तोंडी दिवसाकाठी एक घास जाणंही मुश्किल. ‘प्रगत’ माणसाच्या विश्वातली ही अवस्था ठायी ठायी दिसते. समृद्धीच्या सावलीतही उपासमार होणारी माणसं संपन्न म्हणवणाऱ्या देशात आहेत. त्यांची संख्या कमी असेल, पण ती नाहीतच असं नाही.

लहानपणी एका गोष्टीत ऐकलं होतं की, एक राजा मध्यान्हीला रोज दवंडी पिटायचा, ‘‘करा रे हाकारा, पिटा रे डांडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.’’ या उपाशी व्यक्तीला जेवण मिळाल्यानंतरच प्रजापालक राजाने अन्न सेवन करायचं असा त्या राजाचा स्वतःचा नियम. कथा काल्पनिक असेल, ते राज्यही खूपच लहान असेल, नगरात कोणी उपाशी राहण्याची शक्यताच नसेल असं सगळं जमेस धरलं तरी कथासार काय सांगतं ते महत्त्वाचं. उत्तम राज्यव्यवस्थेचं गमक म्हणजे प्रजेची काळजी.

संत गाडगेबाबांच्या पारमार्थिक कार्यक्रमातही ‘भुकेल्यांना अन्न’ हा पहिला मुद्दा असायचा. सतत पन्नास वर्षे महाराष्ट्रभर वणवण करून बाबांनी आपलं समाजोद्धाराचं क्रत पाळलं. अपार कष्ट घेताना ते खापराच्या तुकडय़ात एखादी भाकरी आणि कालवण यावर दिवस काढत असत. समाजातल्या कोणत्याही संवेदनशील माणसाला कार्यप्रवृत्त करणारं असं त्यांचं जीवन होतं. आजच्या आधुनिक काळातही अशी माणसं असतात. त्यांना जमेल तशी समाजसेवा ती निष्ठsने करीत राहतात. ‘रॉबिनहूड आर्मी’च्या नील घोषची गोष्ट ‘करोडपती’च्या कार्यक्रमात पाहिली. ठिकठिकाणी वाया जाणारं अन्न गोळा करून भुकेल्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्कार्य ही संस्था करते. अशा इतरही अनेक संस्था किंवा व्यक्ती असतील. त्यांच्या कार्याला सक्रिय दाद द्यायला हवी. आजच्या जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने त्याचा विचार मनात रुजावा.

जगात दरवर्षी जेवढं धान्य शेतकरी कष्ट करून पिकवतो त्यापैकी बरंच धान्य चांगली गोदामं नसल्यामुळे, खराब हवामानामुळे, उंदीर-घुशी, कीटकांमुळे वाया जातं. जे हाती उरतं त्याचं मोल शेतकऱ्याच्या पदरात किती पडतं? हा प्रश्नच आहे, परंतु नंतर जे धान्य बाजारात आणि तिथून घराघरात जातं त्यापैकीही हजारो टन धान्य शिजवलेल्या अन्नाच्या स्वरूपात वाया जातं. हिंदुस्थानात दरवर्षी वाया जाणाऱ्या धान्याचं प्रमाण दशलक्ष टनांच्या घरात जातं. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेतील कोटय़वधी रुपये मातीमोल होतात. संपूर्ण जगाच्या अन्नधान्याचा ढोबळमानाने आढावा घेतला तर जवळपास एक अब्ज टनांहून अधिक धान्य फुकट जातं.

एकीकडे धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला सुखाचे दोन घास मिळत नसताना जगभरच्या श्रीमंत शहरांत वाया जाणाऱ्या अन्नाचं प्रमाण भयावह आहे. घरीदारी, सणसमारंभात आणि हॉटेलांमध्ये निर्माण होणाऱ्या वेस्ट फूडची अनेक कारणं आहेत. लग्नसमारंभात पंक्तीतला अवास्तव ‘आग्रह’ आता बफे पद्धतीने थोडा कमी झाला असला तरी पाहुण्यांच्या संख्येचा अंदाज चुकून अन्न उरतं. तीच गोष्ट हॉटेलांमध्ये होते. शिजवलेलं अन्न टिकवण्यासाठी कोल्ड स्टोरेज किंवा रेफ्रिजरेटर उपलब्ध असले तरी ‘उरणाऱ्या’ अन्नाच्या तुलनेत त्यांची संख्या जगभरच कमी असते. प्रगत जगातल्या मंडयांमधून न विकली गेलेली पॅक्ड भाजी वाया जाते. पावसाळी प्रदेशात धान्याला कीड लागते. अशा अनेक प्रकारे धान्य आणि अन्न मोठय़ा प्रमाणावर टाकून दिलं जातं किंवा द्यावं लागतं.

आता यापैकी तयार, पण उरलेलं अन्न व्यवस्थित टिकवून भुकेल्यांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम जगात जोर धरते आहे. परदेशात तर कोल्ड स्टोरेज असलेल्या गाडय़ा रोज अनेक हॉटेलांना विनंती करून त्यांच्याकडचं ताजं, पण उरलेलं अन्न गोळा करतात. सुके, चार-दोन दिवस टिकणारे पदार्थ वेगळे केले जातात आणि त्या देशातील गरीब वस्ती किंवा शेल्टरमध्ये राहणाऱ्या लोकांना हे अन्न पुरवलं जातं. आरोग्यदृष्टय़ा अन्न खाण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी करूनच त्याचं वितरण होतं.

आता आपल्याकडेही अशा संस्था कार्यरत आहेत. जगात अनेक ठिकाणी काम करणाऱ्या या संस्थांचे सदस्य विनावेतन, स्वयंसेवी काम करीत असतात. आपण करीत असलेलं काम माणुसकीचं आहे या कर्तव्यभावनेने त्यांची ही सेवा चालते. यात तरुणांबरोबर वृद्ध मंडळीही असतात. भुकेल्यांना चार घास अन्न मिळालं की, ते तृप्त होतात आणि देणाऱ्या-घेणाऱ्यांच्या डोळय़ांत समाधान तरळतं. असं काही वाचलं पाहिलं की, आपण माणसांच्या जगात, शहरात राहत असल्याची खात्री पटते.